भारतीय संघात गेल्या कित्येक वर्षात अनेक यशस्वी कर्णधार होऊन गेले आहेत. त्यांपैकी एक म्हणजे, सौरव गांगुली ज्याला सर्वजण ‘दादा’ म्हणून ओळखतात. गांगुली हा त्याच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखला जातो. मैदानावर विरुद्ध संघाची चुकीची वागणुक असो किंवा एखादा चुकीचा नियम असो, गांगुली प्रत्येक ठिकाणी पुढे जाऊन सडेतोड उत्तर द्यायचा. यामुळे बऱ्याचदा त्याला भांडणांचा सामना करावा लागला आहे. गांगुलीला त्याच्या या स्वभावामुळे आक्रमक कर्णधार असेही म्हटले जाते.
भारतीय संघाचा कर्णधार बनल्यानंतर गांगुलीने काही वर्षांतच संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी आणि विश्वचषकाच्या अतिम सामन्यापर्यंत नेले होते. शिवाय त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत मिळून फलंदाजीत महत्त्वाची कामगिरी केली होती.
या लेखात अशा काही घटनांचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यामध्ये गांगुलीने विरुद्ध संघांना दाखवून दिले होते की, मीच भारतीय संघाचा बॉस आहे. तर जाणून घेऊया…
3 Instances Where Sourav Ganguly Showed That He Is The Real Boss
रसेल अर्नोल्डला चेतावणी
ही घटना २००२साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यात झाली होती. यावेळी श्रीलंकाचा फलंदाज रसेल अर्नोल्ड हा अनिल कुंबळेच्या गोलंदाजीवर पाँईन्टकडे कट मारत धावा घेण्याच्या प्रयत्नात होता. परंतु त्याला यश मिळत नव्हते. तो आपल्या फलंदाजीने खेळपट्टीला रफ बनवण्याचा प्रयत्न करत होता.
त्याची ही गोष्ट राहुल द्रविडने नोटीस केली आणि त्याने लगेच जाऊन गांगुलीला सांगितले. हे पाहून गांगुलीला कळून चुकले की, अर्नोल्डच्या या गोष्टीमुळे आपल्या डावात श्रीलंकाच्या फिरकीपटूंना फायदा होऊ शकतो. म्हणून गांगुली अर्नोल्डकडे गेला आणि त्याला म्हणाला की, इथून दूरच रहा. गांगुलीने त्याची चांगलीच झडती घेतली होती आणि त्याला चेतावणीही दिली होती. तो सामना अनिर्णीत राहिला होता.
स्टुअर्ट ब्रॉडला षटकाराने दिले प्रत्युत्तर
२००७साली भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये ७ सामन्यांची वनडे मालिका झाली होती. या मालिकेतील ६व्या सामन्यात भारतीय संघ इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत होता. भारताला ५० षटकात ३१७ धावा करायच्या होत्या. त्यावेळी गांगुली सचिन तेंडुलकरसोबत सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. दोघांनी चांगली सुरुवात केली होती. परंतु, स्टुअर्ट ब्रॉडच्या एका चेंडुवर गांगुलीने ऑफ साइडला शॉर्ट कव्हर खेळण्याचा प्रयत्न केला, पण सीमारेषेजवळ खेळाडू उपस्थित असल्यामुळे त्याचा चेंडू सीमारेषेबाहेर गेला नाही.
त्यामुळे ब्रॉड आणि गांगुलीमध्ये बाचाबाची झाली होती. मात्र, पंच अलीम दारनी त्यांचे भांडण सोडवले. त्यापुढील षटकातही ब्रॉड गोलंदाजी करण्यासाठी आला होता. तेव्हा गांगुलीने मारलेला चेंडू ब्रॉडच्या डोक्यावरुन जाऊन सरळ सीमारेषेबाहेर गेला. अशाप्रकारे दमदार षटकार मारत गांगुलीने त्याची दादागिरी दाखवुन दिली होती.
नेटवेस्ट ट्रॉफीमध्ये शर्ट हवेत फिरवणे
गांगुलीची ही घटना सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींना माहित असेल. २००१मध्ये जेव्हा इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा शेवटच्या आणि ७व्या सामन्यात इंग्लंडने भारताला रोमांचक पद्धतीने पराभूत केले होते. शेवटच्या षटकातील शेवटच्या ३ चेंडूत भारताला विजयासाठी ६ धावांची आवश्यकता होती आणि भारताच्या ८ विकेट्स गेल्या होत्या. परंतु जवागल श्रीनाथ फलंदाजी करत असल्यामुळे विजयाच्या थोड्याफार आशा होत्या. मात्र, अँड्रू फ्लिंटॉफने श्रीनाथला बाद करत शर्ट काढून हवेत फिरवत जल्लोष साजरा केला होता.
या घटनेच्या १५ महिन्यांनतर नेटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात युवराज सिंग आणि मोहम्मद कैफने इंग्लंडविरुद्धचा लॉडर्सवरील अंतिम सामना जिंकवला होता. त्यावेळी स्टेडियमच्या बालकनीमध्ये उभा राहिलेल्या गांगुलीने त्याचा शर्ट काढून हवेत फिरवत बदला पूर्ण केला होता.
ट्रेंडिंग लेख-
टीम इंडियासाठी दिवस रात्र घाम गाळणाऱ्या ‘या’ ३ खेळाडूंना…
हे ‘३’ अंडर-१९ क्रिकेटर्स बनू शकतात भविष्यातील महान भारतीय खेळाडू
भारतीय संघाच्या ‘या’ ५ दारुण पराभवामुळे चाहते झाले होते खूप हताश