क्रिकेट या खेळाला सभ्य लोकांचा खेळ म्हणून ओळखले जाते. परंतु या खेळात प्रत्येक खेळाडूने सभ्य लोकांप्रमाणे वर्तन करावे हे गरजेचे नाही. त्याचबरोबर या खेळासोबत जोडला गेलेला स्लेजिंग हा शब्द या सभ्य लोकांच्या खेळासोबत शोभत नाही. तरीही स्लेजिंग हा क्रिकेटचा भाग आहे.
त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर स्लेजिंग ही गोष्ट सामान्य समजली जाते. क्रिकेट या खेळात स्लेजिंग हा प्रकार खूप काळापासून चालत आला आहे. याची सुरुवात तेव्हा झाली होती, जेव्हा इंग्लंडच्या ग्रेसला एकदा पंचांनी लवकर बाद दिले होते. त्यावेळी डब्ल्यू जी ग्रेस पंचाला म्हणाले होते, “प्रेक्षक येथे माझी फलंदाजी बघायला आले आहेत तुमचे बोट नाही, समजले.” आणि पुन्हा फलंदाजी करू लागले. परंतु पुन्हा एकदा फलंदाजी करताना ते त्रिफळाचीत झाले, तर पंचाला म्हणाले, “आज हवा खूपच जास्त आहे, बघितले बेल्स सुद्धा पडल्या.” पंचही काही कमी नव्हते, ते म्हणाले, “हो, हवा खूपच जास्त आहे, आणि तंबूत जाताना तुम्हाला लवकर जाण्यासाठी मदत करेल.”
तसेच भारतीय खेळाडूंसोबत बर्याचदा स्लेजिंग करण्यात आले आहे. काहीवेळा खेळाडूंनी त्याचे प्रत्युत्तर सुद्धा दिले आहे. आज आपण या लेखामधून अशाच तीन घटनांबद्दल जाणून घेणार आहोत, जेव्हा भारतीय खेळाडूंनी स्लेजिंगचे दमदार प्रत्युत्तर दिले आहे.
1. एस श्रीसंत विरुद्ध आंद्रे नील
भारतीय संघाचा 2006 साली दक्षिण आफ्रिकेचा दौरा होता, जो बर्याच लोकांना माहित आहे. या दौऱ्याच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने 249 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 84 धावसंख्येवर गारद झाला होता. त्यामुळे भारतीय संघाने 163 धावांनी आघाडी घेतली होती. या पहिल्या डावात एस श्रीसंतने 5 विकेट्स घेतल्या होत्या.
या सामन्याच्या दुसर्या डावात श्रीसंत जेव्हा फलंदाजीला आला, तेव्हा 9 विकेट्स गेल्या होत्या आणि भारतीय संघ 219 धावा करून अडचणी सापडला होता. श्रीसंत मैदानावर येताच त्याच्याविरुद्ध आंद्रे नीलने स्लेजिंग करायला सुरुवात केली. तो विकेट मिळविण्यासाठी स्लेजिंग करत होता. मात्र, श्रीसंतने पुढच्या चेंडूवर षटकार खेचत जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय संघाने हा सामना 123 धावांनी जिंकला.
2. युवराज सिंग विरुद्ध ऍंड्र्यू फ्लिंटॉफ
भारतीय संघाने 2007 साली दक्षिण आफ्रिकेत टी-20 मध्ये विश्वचषक जिंकला होता. या स्पर्धेतच भारताचा अष्टपैलू युवराज सिंगने एका षटकात 6 षटकार मारण्याची किमया केली होती. मजेदार गोष्ट म्हणजे हे सहा षटकार सुद्धा स्लेजिंगच्या कारणामुळे लगावले होते.
या सामन्यात 17 व्या षटकात युवराज सिंगने फ्लिंटॉफच्या गोलंदाजीवर दोन चौकार लावले होते. त्यामुळे फ्लिंटॉफ युवराज सोबत स्लेजिंग करू लागला. त्याने युवराजने लावलेल्या शॉटबद्दल वाईट वक्तव्य केले. त्यामुळे युवराजला राग आला. युवराजनेही फ्लिंटॉफबद्दल वाईट वक्तव्य केले. त्यानंतर युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकातील प्रत्येक चेंडूवर षटकार मारून या स्लेजिंगला प्रत्युत्तर दिले.
3. शोएब अख्तर विरुद्ध हरभजन सिंग
भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यात स्लेजिंग म्हणजे सामान्य गोष्ट आहे. कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा खूपच चुरशीचा असतो. त्यामुळे या सामन्यात स्लेजिंग झाले नाही, असा खूपच दुर्मिळ क्षण असेल. 2010 मध्ये आशिया चषकमध्ये हरभजन सिंग आणि शोएब अख्तर यांच्यात स्लेजिंग झाली होती.
पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 267 धावांचे लक्ष्य भारताला दिले होते. विजयासाठी या सामन्यात भारतीय संघाला शेवटच्या षटकात 7 धावांची गरज होती. फलंदाजी करण्यासाठी हरभजन आणि गंभीर मैदानावर होते. 49 वे षटक टाकल्यानंतर पाकिस्तानचा गोलंदाज शोएब अख्तर हरभजन सिंगविरुद्ध स्लेजिंग करू लागला. या स्लेजिंगचे प्रत्युत्तर देताना हरभजन सिंगने जोरदार षटकार खेचला आणि भारताला विजय मिळवून दिला.
ट्रेंडिंग लेख-
यावर्षी फक्त तुमचीच हवा! आंतराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ३ गोलंदाज
वाढदिवस विशेष: विश्वचषकात भल्याभल्या क्रिकेटर्सला न जमलेला विक्रम करणारी ‘ती’ पहिलीच
गुडबाय २०२०: दिग्गज ५ खेळाडू ज्यांनी यावर्षी जगाचा निरोप घेत क्रीडा जगताला हेलावून सोडले
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! आयपीएल २०२२ मध्ये दोन नवे संघ होणार सामील, बीसीसीआयने दिली माहिती