भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्याने त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याने भारतीय १९ वर्षाखालील संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर तो आयपीएलच्या पहिल्याच हंगामात राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामील झाला होता. पुढे जाऊन तो या संघाचा कर्णधारही झाला
तो आयपीएलमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे आणि राॅयल चॅलेंजर बेंगलोर मागील अनेक वर्षांपासून कर्णधार आहे. त्याला आयपीएलमध्ये पहिल्यांदा कर्णधारपदाची संधी २०११ मध्ये मिळाली होती आणि आता तो भारतीय संघाचा आणि आरसीबीचा नियमित कर्णधार आहे.
विराट मागच्या बऱ्याच काळापासून आरसीबीचे नेतृत्व करत असून आतापर्यंत १३२ सामन्यांमध्ये तो आरसीबीचे कर्णधार राहिला आहे. मात्र, त्याच्या नेतृत्वात संघाने अजून एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. असे असले तरी, संघाचा त्याच्यावरील विश्वास कायम आहे.
आरसीबी संघात काही दुसऱ्या आंतरराष्ट्रीय संघांचे कर्णधारही खेळत असले, तरीदेखील संघाने विराटवरचा विश्वस कमी केला नाही आणि त्यालाच नेहमी संघाचे नतृत्व करण्याची संधी दिली. या लेखात आपण अशाच तीन आंतरराष्ट्रीय कर्णधारांची माहिती घेणार आहोत, जे आरसीबीमध्ये विराटच्या नेतृत्वात खेळले आहेत.
तीन आंतरराष्ट्रीय कर्णधार जे आयपीएमध्ये विराटच्या नेतृत्वात खेळले
३. ऍराॅन फिंच
आयपीएल २०२० मध्ये आरसीबीने ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार ऍराॅन फिंचला संघात सामील केले होते. फिंच एक आक्रमक फलंदाज आहे आणि आरसीबीने त्याच्या याच कारणामुळे संघात सामील केले होते. आरसीबीने जरी त्याला दमदार फलंदाजीसाठी संघात सामील केले असले, तरी तो मागच्या पूर्ण हंगामामध्ये काही खास करू शकला नाही आणि त्याचा स्ट्राइक रेटही खूप कमी होती. मागच्या हंगामात फिंचने १२ सामन्यांमध्ये १११.२० च्या स्ट्राईक रेटने २६८ धावा केल्या आहेत.
२. डॅरेन सॅमी
डॅरेन सॅमीने त्याच्या कारकिर्दीत वेस्टइंडीजला दोन टी२० विश्वचषक जिंकवून दिले आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमात्र कर्णधार ठरला आहे. त्याने वेस्तइंडीज संघाला त्याच्या नेतृत्वात २०१२ आणि २०१६ मध्ये विश्वचषक जिंकवून दिला आहे. आरसीबीने त्याला २०१५ मध्ये पहिल्यांदा संघात सामील केले होते. त्या हंगामामध्ये सॅमीला केवळ दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि तो सामन्यांमध्येही काही खास प्रदर्शन करू शकला नाही. खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये तो अवघ्या १३ धावा करू शकला आणि गोलंदाजीत एकही विकेट घेऊ शकला नाही.
१. एबी डिव्हिलियर्स
दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलीअर्स आयपीएलमध्ये राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासोबत २०११ मध्ये पहिल्यांदा जोडला गेला होता. तो आरसीबीचा सर्वात महत्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याने अनेकदा संघासाठी आक्रमक आणि महत्वाची खेळी केली आहे. त्याने दक्षिण अफ्रिका संघाचे अनेक वर्ष नेतृत्व केले आहे, त्याला आरसीबीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही.