भारतीय संघाचा सर्वकालीन महान फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने काही दिवसांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती (Harbhajan Singh Retire) घेतली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून त्याने एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती. २०१६ पासून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नव्हते. परंतु तो जगप्रसिद्ध टी२० लीग, आयपीएलमध्ये सक्रिय होता. मात्र आता त्याने क्रिकेटच्या सर्व स्वरुपांना रामराम ठोकला आहे.
हरभजनच्या निवृत्तीसह भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ समजल्या जाणाऱ्या १९९९ ते २०१२ या काळातील सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत. २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ विश्वचषक विजेत्या संघांचा तो प्रमुख सदस्य राहिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटव्यतिरिक्त आयपीएलमध्येही त्याने आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला आहे. या लीगमध्ये १६३ सामने खेळताना त्याने तब्बल १५० विकेट्स घेतल्या आहेत. याच हरभजनच्या आयपीएल कारकिर्दीत बरीचशा रोमांचक गोष्टीही घडल्या आहेत. त्यातीलच काही रोमांचक तथ्यांचा येथे लेखाजोखा घेण्यात आला आहे. (Harbhajan’s IPL Career 3 Lesser Known Facts)
हरभजन राहिलाय मुंबई इंडियन्सचा पहिला कर्णधार
खूप कमी लोकांना माहिती असेल की, हरभजन आयपीएलची सर्वात यशस्वी फ्रँचायझी, मुंबई इंडियन्सचा पहिला कर्णधार होता. तो आयपीएलच्या पहिल्या हंगामात मुंबई संघाचा भाग होता आणि या हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये कर्णधार सचिन तेंडूलकर अनुपस्थित होता. त्यामुळे संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी हरभजनच्या खांद्यावर होती. अशाप्रकारे तो मुंबई संघाचा पहिलावहिला कर्णधार बनला होता. मात्र कर्णधाराच्या रुपात त्याचा पहिला सामना चांगला राहिला नव्हता. याा सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मुंबई इंडियन्सला ५ विकेट्सने पराभूत केले होते.
हरभजनने त्याचा पहिला आणि शेवटचा आयपीएल सामना आरसीबीविरुद्ध खेळलाय
वरती सांगितल्याप्रमाणे हरभजनने २००८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध (आरसीबी) आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. या सामन्यात त्याने २ विकेट्स घेतल्या होत्या आणि नाबाद २ धावांचे योगदानही दिले होते. पुढे १३ वर्षांच्या अंतरानंतर त्याने याच आरसीबीविरुद्ध आयपीएल कारकिर्दीचा शेवटही केला आहे. २०२१ मध्ये आरसीबीविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सकडून त्याने शेवटचा सामना खेळला आहे. अशाप्रकारे योगायोगाच का म्हणा, पण त्याने आयपीएल कारकिर्दीची सुरुवात आणि शेवट एकाच आरसीबी संघाविरुद्ध केला आहे.
हेही वाचा- राजकारणाच्या पिचवर उतरणार का हरभजन? स्वतः दिले उत्तर; म्हणाला…
आयपीएल इतिहासात सातव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागिदारी
आपणा सर्वांना माहिती आहे की, हरभजन एक मातब्बर ऑफ स्पिन गोलंदाजाबरोबरच चांगला फलंदाजही आहे. त्याने बऱ्याचदा याचा प्रत्ययही दिला आहे. त्याच्या नावे आयपीएलमध्ये ८३३ धावांची नोंद आहे. याच हरभजनने २०१५ मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध सातव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागिदारी रचली होती. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने १०० धावांची शानदार भागिदारी केली होती. ५९ धावांवर मुंबईने ६ विकेट्स गमावल्या होत्या. यावेळी जगदीशन सुचिथसोबत मिळून त्याने १०० धावा जोडल्या होत्या. ही आयपीएल इतिहासातील सातव्या विकेटसाठीची आतापर्यंतची सर्वात मोठी भागिदारी राहिली आहे. या भागिदारीदरम्यान त्याने २४ चेंडूंमध्ये ६ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
SAvsIND, Live: भारताच्या सलामीवीरांची दमदार सुरुवात, १८ षटकांत संघाच्या ५० धावा पार
वनडेत कोहली, टी२०त आझम अन् कसोटीत रूट; धावांच्या ‘मोठ्या’ विक्रमांत हे कर्णधारच राहिलेत नंबर १
हेही पाहा-