सोनिपत, हरयाणा । २२ नोव्हेंबर पासून इराणची राजधानी तेहरान शहरात होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्रातील कबड्डीपटूंची निवड झाली आहे. त्यात ३५ जणांच्या संभाव्य पुरुषांच्या संघात ३ महाराष्ट्रीयन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर महिलांच्या संभाव्य संघातही ३ महिला कबड्डीपटुंचा समावेश करण्यात आला आहे.
यात पुरुष खेळाडूंमध्ये सचिन शिंगाडे, काशिलिंग आडके आणि रिशांक देवाडिगा यांचा तर महिला खेळाडूंमध्ये पूजा शेलार, सायली जाधव आणि अभिलाषा म्हात्रे यांचा समावेश आहे.
हरयाणा राज्यातील सोनिपत येथे संभाव्य संघाचे सराव शिबीर सुरु आहे. हे शिबीर ३० ऑक्टोबरला सुरु झाले असून १९ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. १८ नोव्हेंबर रोजी १२ खेळाडूंचा पुरुष आणि महिला संघ निवडण्यात येईल.
१९ नोव्हेंबर रोजी संघ दिल्लीवरून तेहरानला रवाना होईल तर २६ नोव्हेंबर रोजी दिल्ली शहरात परतेल.
सूत्रांनुसार निवड समितीला या स्पर्धेत युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे. त्याचमुळे महाराष्ट्राच्या रिशांक देवाडिगाचे संघातील स्थान बऱ्यापैकी निश्चित मानले जात आहे.
भारतीय संघाला या स्पर्धेत विजयाचे प्रमुख दावेदार समजले जात आहे. दक्षिण कोरिया आणि यजमान इराण संघ तरीही भारतीय संघाला बऱ्यापैकी आव्हान देऊ शकत असल्याचं बोललं जात आहे.