आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सातव्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील सुपर-१२ फेरीत काही संघांनी चांगली कामगिरी केली आहे. तर काही मोठे संघ चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत, ज्यामध्ये भारत, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड सारख्या संघांचा समावेश आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघावर १० गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे येणाऱ्या सामन्यांमध्ये भारतीय संघाला चांगली कामगिरी करून विजय मिळवावा लागणार आहे. या सामन्यांमध्ये भारतीय संघातील फलंदाजांना ३ मोठे विक्रम करण्याची संधी असणार आहे. कुठले आहेत ते विक्रम चला जाणून घेऊया.
टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा
टी-२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धनेच्या नावे आहे. त्याने १०१६ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या स्थानी ख्रिस गेल आहे, ज्याने ९४५ धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानी दिलशान आहे, ज्याने ८९७ धावा केल्या आहेत. तसेच भारतीय कर्णधार विराट कोहली या यादीत चौथ्या स्थानी आहे. विराट कोहलीच्या नावे ८३४ धावांची नोंद आहे. जर त्याला येणाऱ्या सामन्यांमध्ये १८२ धावा करण्यात यश आले. तर तो या यादीत सर्वोच्च स्थानी पोहचू शकतो. विराट कोहलीसह ख्रिस गेल देखील ही स्पर्धा खेळतोय. त्यामुळे कुठला खेळाडू हा विक्रम मोडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार
टी-२० क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला जातो. त्यामुळे प्रत्येक फलंदाज मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात असतो. टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, मार्टिन गप्टील या यादीत अव्वल स्थानी आहे. मार्टिन गप्टीलने आतापर्यंत १४७ षटकार मारले आहेत. तर दुसऱ्या स्थानी भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आहे, ज्याने आतापर्यंत एकूण १३३ षटकार मारले आहेत. मार्टिन गप्टीलला मागे टाकण्यासाठी रोहित शर्माला आणखी १४ षटकार मारावे लागणार आहेत.
टी२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या नावे सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. यासह तो अवघे १० षटकार मारताच युवराज सिंगला देखील मागे टाकणार आहे. युवराज सिंगने टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात ३३ षटकार मारले आहेत. तर रोहित शर्माने आतापर्यंत टी -२० विश्वचषक स्पर्धेत २४ षटकार मारले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्याच्याशी बोलणं म्हणजे स्वतःवर चिखल उडवून घेण्यासारखे’; भज्जी आमीरवर पुन्हा बरसला
ऑस्ट्रेलिया-श्रीलंका संघांमध्ये कोणाची कामगिरी सरस? कशी असेल उभयंताची प्लेइंग इलेव्हन? वाचा सर्वकाही
नामबिया संघाची गुणतालिकेत मोठी उडी, भारत अन् न्यूझीलंडला पछाडत टॉप-३ मध्ये धडक