भारतीय क्रिकेट बोर्डाचे मुख्य संघ निवडकर्ते एमएसके प्रसाद यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यांच्या जागी सुनील जोशी यांना मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणार्या वनडे मालिकेसाठी सुनील जोशी यांनी भारतीय संघाची निवड केली होती.
पण कोरोना विषाणूमुळे ही मालिका रद्द झाली आणि त्यानंतर भारतीय क्रिकेटपटू मैदानात उतरले नाहीत. सुनील जोशी यांनी त्यांच्या खेळाडू म्हणून कारकिर्दीत १५ कसोटी ६९ वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
सध्या जोशी यांचा मुख्य निवडकर्ता म्हणून कार्यकाळ अवघ्या ४ महिन्यांचा आहे. त्यांच्यानंतर हे पद सांभाळण्यासाठी बीसीसीआयकडे काही माजी दिग्गज क्रिकेटपटूंचा पर्याय आहे. या तीन दिग्गजांबद्दल या लेखात जाणून घेऊ.
१. व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman)
भारतीय क्रिकेटच्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत व्हीव्हीएस लक्ष्मणचे नाव घेतले जाते. व्हीव्हीएसने भारताकडून १३४ कसोटी सामन्यात ८७१८ धावा आणि ८६ वनडे सामन्यात २३३८ धावा केल्या आहेत. आकडेवारी आणि भारतीय क्रिकेटमधील लक्ष्मणचे योगदान खूप मोठे आहे.
अशा परिस्थितीत जर व्हीव्हीएसची मुख्य निवडकर्ता म्हणून नेमणूक केली गेली तर ते भारतीय संघासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. कारण व्हीव्हीएस एक उत्तम खेळाडू आहे आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सुद्धा त्याची खूप चांगली पकड आहे. त्याच्या कारकीर्दीत त्याने २६७ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.
त्याच्या अनुभवाचा विचार करता तो जर मुख्य निवडकर्ता झाला तर तरुण खेळाडूंना अधिकाधिक संधी मिळू शकते आणि भारतीय संघाचे भविष्यातील खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमधून निवडले जाऊ शकते. व्हीव्हीएस आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा सल्लागार आहे, तेव्हापासून लिलावात व्हीव्हीएस खेळाडूंची निवड करतानाही दिसतो.
२. अजित आगरकर (Ajit Agarkar)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांचे नावही अशा खेळाडूंच्या यादीत समाविष्ट आहे ज्यांना भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता म्हणून स्थान दिल्यास भारतीय संघाचे भविष्य अधिक उज्वल बनू शकेल.
वास्तविक, मुंबईकर खेळाडू अजित आगरकर याची मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई संघासाठी निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली होती. त्याला या पदाचा अनुभवही आहे. तसेच त्याला आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेटचाही मोठा अनुभव आहे. या अनुभवाचा त्याला तो जर मुख्य निवडकर्ता झाला तर फायदा होऊ शकतो.
आगरकरने २६ कसोटी, १९१ वनडे आणि ४ टी२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
३. वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा भारताच्या सर्वात यशस्वी सलामीवीरांच्या यादीत समावेश आहे. सेहवागने अद्याप बीसीसीआयचे कोणतेही मोठे पद सांभाळलेले नसले तरी भारतीय संघाच्या मुख्य निवड समितीमध्ये राहून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना संधी मिळू शकेल यात शंका नाही.
सेहवाग एक चांगला खेळाडू आहे. त्यालाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आणि देशांतर्गत क्रिकेटचा अनुभव आहे. तो भारतीय क्रिकेटला चांगल्या पद्धतीने ओळखतो. तो वेळोवेळी त्याची मते अनेकदा मांडतानाही दिसतो त्यामुळे मुख्य निवडकर्ता पदावर त्याच्यासारखा एखादा मोठा आणि जाणकार क्रिकेट खेळाडू असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो.
वीरेंद्र सेहवागने भारताकडून १०४ कसोटी सामन्यात ८५८६ धावा, २५१ वनडे सामन्यात ८२७३ धावा आणि १९ टी-२० सामन्यात ३९४ धावा केल्या आहेत.
वाचनीय लेख –
अंधश्रद्धाळू असलेले ५ भारतीय खेळाडू; एकाने तर संपूर्ण कारकीर्दीत नवीन बॅट वापरलीच नाही
धोनीवर लावला जातो या पाच खेळाडूंचे करियर संपविल्याचा आरोप
आपल्या शेवटच्या सामन्यात सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणणारे २ भारतीय कर्णधार