दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसऱ्या कसोटी दरम्यान जो चेंडू छेडछाडीचा प्रकार घडला. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट जगतात खळबळ उडाली. या प्रकरणाचे पडसाद सगळीकडेच उमटलेले दिसून आले आहेत.
तसेच चेंडू छेडछाड प्रकरणात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि सलामीवीर फलंदाज कॅमेरॉन बॅनक्रोफ्ट यांना आयसीसीने दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई देखील केली आहे. तसेच या प्रकरणात स्मिथ, बॅनक्रोफ्ट बरोबरच उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरही या प्रकरणात सहभागी असल्याचे वृत्त आहे.
शनिवारी उशिरा जेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला त्यानंतर रविवारी स्मिथला कर्णधारपदावरून तर वॉर्नरला उपकर्णधार पदावरून पायउतार व्हावे लागले होते. तसेच स्मिथला राजस्थान रॉयल्स या आयपीएल संघाचेही कर्णधारपद सोडावे लागले.
त्याचप्रमाणे वॉर्नरही सनरायझर्स हैद्राबादचा कर्णधार आहे. त्यामुळे त्यालाही चेंडू छेडछाड प्रकरणामुळे हैद्राबादच्या कर्णधार पदावरून काढून टाकले जाऊ शकते किंवा त्यालाच हे कर्णधारपद सोडावे लागू शकते. जर असे झाले तर हैद्राबाद संघाकडे नेतृत्वासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत. ते असे
#शिखर धवन: भारताचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज शिखर धवन हा कर्णधारपदासाठी एक महत्वाचा पर्याय आहे. त्याला आयपीएलचा अनुभवही आहे. तसेच तो २०१२ पासून हैद्राबाद संघातून खेळत असून २०१६ च्या विजेत्या हैद्राबाद संघातही शिखरचा समावेश होता.
हैद्राबादने यावर्षी वॉर्नरबरोबरच शिखरलाही संघात कायम ठेवले होते. शिखरचाही मागील काही दिवसांपासून फॉर्म उत्तम आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १२७ सामन्यात ३२.३७ च्या सरासरीने ३५६१ धावा केल्या आहेत.
#शाकिब अल हसन: बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन हासुद्धा हैद्राबाद संघाच्या नेतृत्वासाठी आणखी एक पर्याय आहे. सध्या शाकिब आयसीसीच्या कसोटी आणि वनडे क्रमवारीत अष्टपैलू यादीत अव्वल क्रमांकावर आहे. तर टी २० क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
तसेच शाकिब अल हसनकडे बांग्लादेश संघाच्या नेतृत्वाचा अनुभवसुद्धा आहे. त्याचमुळे त्याला हैद्राबाद संघाचेही नेतृत्व करण्यास मिळू शकते. त्याने याआधी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आजपर्यंत आयपीएलमध्ये ४३ सामने खेळले असून यात त्याने २१.६५ च्या सरासरीने ४९८ धावा केल्या आहेत. तर २६.६ च्या सरासरीने ४३ विकेट्सही घेतल्या आहेत.
#केन विलियम्सन: न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन हा वॉर्नरच्या ऐवजी कर्णधारपदाची प्रबळ दावेदार आहे. कारण तो सध्या त्याच्या देशाचेही नेतृत्व करत असून त्याच्याकडे कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे.
तसेच त्याने मागीलवर्षी आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केली होती. त्याने मागील वर्षी ७ सामन्यात २५६ धावा केल्या होत्या. तसेच तो मागील ३ वर्षे आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १५ सामन्यात ३१.६२ च्या सरासरीने ४११ धावा केल्या आहेत.