टी20 विश्वचषक 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाची कामगिरी शानदार राहिली आहे. ‘मेन इन ब्लू’नं आपल्या पहिल्या सामन्यात आयर्लंडवर 8 गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. आता टीम इंडियाला सुपर 8 मध्ये जागा मिळवण्यासाठी फक्त एका विजयाची आवश्यकता आहे. भारतीय संघ आता ग्रुप स्टेज मधील आपले उर्वरित सामने अमेरिका आणि कॅनडाविरुद्ध खेळेल.
या विश्वचषकात भारतीय संघानं शानदार कामगिरी केली असली तरी काही खेळाडूंनी आपल्या कामगिरीनं चाहत्यांना निराश केलं आहे. यापैकी एक खेळाडू म्हणजे शिवम दुबे. दुबेला आयपीएलमधील फॉर्मच्या आधारे विश्वचषक संघात निवडण्यात आलं, मात्र तो आतापर्यंतच्या 2 सामन्यांमध्ये पूर्णपणे फ्लॉप झाला आहे. फॅन्स आता त्याला प्लेइंग 11 मधून बाहेर काढण्याची मागणी करत आहेत. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशा 3 खेळाडूंबद्दल सांगू, जे शिवम दुबेच्या जागी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये खेळू शकतात.
(3) कुलदीप यादव – चायनामन गोलंदाज कुलदीप यादव शिवम दुबेच्या जागी प्लेइंग 11 मध्ये खेळू शकतो. भारतीय संघ दोन्ही सामन्यांमध्ये 2 फिरकीपटूंसह उतरला होता. तर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेच्या रुपात दोन वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू होते. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये शिवम दुबेनं गोलंदाजी केली नाही. तर फलंदाजीत त्यानं पाकिस्तानविरुद्ध केवळ 3 धावा केल्या. अशा परिस्थितीत कुलदीप यादवला त्याच्या जागी प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते. कुलदीपच्या समावेशानं भारतीय गोलंदाजी आक्रमणात विविधता येईल. याशिवाय तो खालच्या फळीत फलंदाजीतही योगदान देऊ शकतो.
(2) संजू सॅमसन – यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन देखील दोन्ही सामन्यांमध्ये बेंचवर बसला होता. भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंतला संधी मिळाली आहे. रिषभनंही त्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत पाकिस्तानविरुद्ध शानदार फलंदाजी केली होती. अशा परिस्थितीत संजू सॅमसनला शिवम दुबेच्या जागी पूर्ण फलंदाज म्हणून संघात संधी मिळू शकते. संजूनं नुकत्याच झालेल्या आयपीएल 2024 मध्ये शानदार फलंदाजी केली होती. त्यानं स्पर्धेत 500 पेक्षा अधिक धावा ठोकल्या होत्या. शिवाय अमेरिकेतील उसळत्या खेळपट्टींवर तो उपयोगी ठरू शकतो.
(1) यशस्वी जयस्वाल – शिवम दुबेच्या जागी प्लेइंग 11 मध्ये जागा मिळण्यासाठी यशस्वी जयस्वाल प्रमुख दावेदार आहे. सध्या विराट कोहली रोहित शर्मासोबत सलामीला येत आहे. त्यामुळे यशस्वीला संघात स्थान मिळालेलं नाही. दुबेच्या जागी यशस्वी प्लेइंग 11 मध्ये आला तर तो रोहित शर्मासोबत सलामीला येऊ शकतो. अशा परिस्थितीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना विराट कोहलीचे आकडे खूप चांगले आहेत. याशिवाय यशस्वीचा सध्याचा फॉर्मही खूप चांगला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूनं केलं लग्न! सोशल मीडियावर पार्टनरसोबतचे फोटो केले शेअर
टी20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेनं केला अद्भूत पराक्रम, टीम इंडियाचा विक्रम मोडून रचला इतिहास
“तुला लाज वाटली पाहिजे”, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनं शिख धर्माची खिल्ली उडवल्यानंतर हरभजन सिंग भडकला