आयपीएलच्या 13 व्या हंगामात आतापर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त सामने झाले आहेत. अनेक नावाजलेल्या खेळाडूंना अद्यापही प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. संघात इतर पर्यायी खेळाडू असल्यामुळे किंवा संघात समतोल साधण्याचा प्रयत्नात त्यांना कदाचित संधी मिळाली नसेल. यापैकी असे काही खेळाडू आहेत ज्यांना संघ आयपीएलच्या पुढील हंगामासाठी कदाचित रिटेन करणार नाहीत. अशाच खेळाडूंपैकी ३ असे खेळाडू, ज्यांची या लेखात माहिती घेणार आहोत.
उमेश यादव
यावर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (आरसीबी) आयपीएलमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. संघ गुणतालिकेत दुसर्या क्रमांकावर आहेत. या संघाने गेल्या वर्षी लिलावात काही जबरदस्त खेळाडूंचा समावेश केला होता, ज्याचा संघाला या हंगामात फायदा होत आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट ख्रिस मॉरिस, उदाना, सैनी, डेल स्टेन, सिराज, उमेश यादव, चहल आणि सुंदर यांचा रूपात या संघात अनेक पर्याय आहेत.
केकेआरविरुद्ध नुकत्याच झालेल्या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी चांगलेच आव्हान दिले होते. संघात आता चांगले संयोजन आहे आणि म्हणूनच अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवला संघात स्थान मिळत नाही. उमेश पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळला पण त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत पुढील लिलावात संघ त्याला रिटेन करेल का यात शंका आहे.
मिशेल मॅक्लेनेघन
सन 2015 पासून वेगवान गोलंदाज मिशेल मॅक्लेनेघन हा मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. त्याने आपल्या गोलंदाजीने अनेक सामने जिंकवून दिले आहे. गेल्या काही हंगामात तो मुंबई इंडियन्सकडून सातत्याने खेळत आहे. यावर्षी त्याला अद्यापही संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. मुंबईत बोल्ट, पॅटिन्सन, कुल्टर नाईल यांच्या रूपात इतर परदेशी गोलंदाज आहेत. सध्या मुंबईत त्याची गरज नाही, अशा परिस्थितीत जर मुंबईने त्याला रिटेन केले नाही, तर आश्चर्य वाटणार नाही.
शेन वॉटसन
चेन्नई सुपर किंग्सच्या खराब कामगिरीने यंदा सर्वांचीच निराशा झाली. हा संघ दरवर्षी आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये स्थान मिळवतो पण या हंगामात ते अवघड असल्याचे दिसत आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूंनी निराश केले आहे. संघाचा सलामीवीर शेन वॉटसनकडून मोठ्या आशा होत्या पण यावेळी तो फॉर्ममध्ये दिसला नाही. वॉटसन 39 वर्षांचा आहे आणि आता तो तितका तंदुरुस्त नाही. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन रिटेन करेल असं वाटत नाही.