इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये शुक्रवार २७ मे रोजी रात्री रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाने आरसीबीचे विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. हा संघ सलग ३ वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. परंतु, अंतिम फेरीपर्यंत त्यांना प्रवास करता आलेला नाही.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातही संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. पाटीदार वगळता एकाही फलंदाजाने ताकद दाखवली नाही, तर गोलंदाज जोस बटलरचे वादळ रोखू शकले नाहीत.
बेंगलोरने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रजत पाटीदारच्या ५८ धावांच्या जोरावर २० षटकांत ८ बाद १५७ धावा केल्या आणि राजस्थानला १५८ धावांचे आव्हान दिले. राजस्थानकडून गोलंदाजीत ओबेड मॅकॉय आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर राजस्थानकडून १५८ धावांचा पाठलाग करताना जोस बटलरने नाबाद १०६ धावा करताना राजस्थानला १९ व्या षटकातच विजय मिळवून दिला. बेंगलोरकडून जोस हेजलवूडने २ विकेट्स घेतल्या या सामन्यात आरसीबीला पराभव मिळण्याची पाच प्रमुख कारणे काय असू शकतात, याचा आढावा घेऊ.
१. सलामीवीर अयशस्वी
आरसीबीला अपयश येण्यामागे संघाच्या सलामीवीरांचे अपयश मुख्य कारणं आहे. वरिष्ठ खेळाडूंनी प्लेऑफसारख्या मंचावर कामगिरी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. संघात जर सलामीवीर म्हणून फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली असतील तर संघाला चांगल्या सुरुवातीची आशा असते. परंतु या दोन्ही फलंदाजांनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध निराशा केली. तिसऱ्या षटकात कोहली पॅव्हेलियनमध्ये परतला असताना डु प्लेसिसने २७ चेंडूत २५ धावांची संथ खेळी खेळली. सलामीवीर हा संघाचा आधार मानला जातो, जर त्यांनी धावा करून संघाला चांगली सुरुवात करून दिली नाही तर विजय मिळवणे कठीण होऊन बसते. असंच काहीसं घडलं आरसीबीच्या बाबतीत.
२. दिनेश कार्तिकवर दाखवलेला अविश्वास
दिनेश कार्तिकने या हंगामात आरसीबीसाठी फिनिशरची भूमिका चांगली बजावली आहे. या कामगिरीचे फळ कार्तिकला भारतीय संघात निवडीच्या रूपाने मिळाले. पण राजस्थानविरुद्धच्या १४ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मॅक्सवेल बाद झाला, त्यानंतर ६ षटके बाकी होती आणि संघाची धावसंख्या १११ धावा झाली. दिनेश कार्तिकचा अनुभव इथे वापरण्याऐवजी आरसीबीने युवा प्रतिभावंत महिपाल लोमरोरला फलंदाजीला पाठवले. पण या फलंदाजाला १० चेंडूत केवळ ८ धावा करता आल्या. कार्तिक लोमरोरच्या आधी मैदानात उतरला असता, तर कदाचित आरसीबीची फलंदाजी कोसळलेली दिसली नसती. पहिल्या १३ षटकांमध्ये संघाने फक्त २ विकेट गमावल्या होत्या, परंतु, अखेरच्या काही षटकांमध्ये आरसीबीच्या ६ विकेट पडल्या, ज्यामुळे संघ मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला नाही.
३. गोलंदाजांची खराब कामगिरी
आरसीबीच्या फलंदाजांनी निराशा केल्यानंतर गोलंदाजांनीही खराब कामगिरी केली. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये बेंगलोरच्या गोलंदाजांनी १ विकेट घेत तब्बल ६७ धावा दिल्या होत्या. यात एकट्या मोहम्मद सिराजने ३१ धावा दिल्या होत्या. त्यामुळे सुरुवातीला गमावलेली लय आरसीबीच्या गोलंदाजांना परत मिळवता आली नाही, त्यामुळे सामना संपेपर्यंत जोस बटलरने बाद न होता ६० चेंडूत १०६ धावा चोपल्या आणि राजस्थानला विजय मिळवून दिला.
या सामन्यात सिराज व्यतिरिक्त शाहबाज अहमदने २ षटकांत ३५ धावा दिल्या. म्हणजेच सिराज आणि शाहबाज या दोघांनी टाकलेल्या ४ षटकांतच राजस्थानने ६६ धावा काढल्या होत्या. त्यामुळे खराब गोलंदाजी ही आरसीबीच्या पराभवाचे एक मोठे कारण ठरले.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL Final । ‘उद्या रॉयल संघच जिंकेल फायनल’, राजस्थानच्या गोटातील दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
बटलरने विलियम्सनला मागे टाकलेच, पण आता वॉर्नरचा ६ वर्ष जुना ‘हा’ विक्रमही धोक्यात





