आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्यांच्या चाहत्यांना निराश केले. शुक्रवारी(२३ ऑक्टोबर) मुंबईविरुद्धच्या सामन्यात १० विकेट्सने झालेल्या पराभवाने चेन्नईचे या स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आणले आहे.
चेन्नईने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ११ पैकी फक्त ३ सामने जिंकले आहेत आणि ६ गुणांसह गुणतालिकेत सर्वात खालच्या स्थानावर आहे. आता त्यांना उर्वरित ३ सामने खेळायचे आहेत आणि आता जरी संघाने उर्वरित सामने जिंकले तरी त्यांना प्ले ऑफमध्ये सामील होण्यासाठी पात्रता गुण मिळणार नाहीत.
चेन्नई संघाला कर्णधार एमएस धोनीने ३ वेळा आयपीएल चषक जिंकून दिला आणि त्याचबरोबर प्रत्येक हंगामात प्ले ऑफमध्ये असणारा हा संघ यंदा मात्र अपयशी ठरला. यावरूनच या लेखात जाणून घेऊया की चेन्नई सुपर किंग्ज संघाचा इतकी खराब कामगिरी कशामुळे झाली. त्याची प्रमुख ३ कारणे कोणती ती पाहूया.
या ३ कारणांमुळे चेन्नई सुपर किंग्ज झाला फ्लॉप –
१. सुरेश रैना – हरभजन सिंग यांची अनुपस्थिती तर सुरुवातीला खेळाडू दुखापतग्रस्त
आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जला २ मोठे धक्के बसले. संघाचे अनुभवी खेळाडू सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी या स्पर्धेतून माघार घेतली. या दोघांची जागा भरून काढेल असे खेळाडू चेन्नईला मिळाले नाहीत. सुरेश रैना संघाच्या फलंदाजीतील महत्त्वाचा सदस्य होता.
या हंगामात संघाची फलंदाजी खूपच निराशाजनक झाली होती. एक-दोन सामने वगळल्यास चेन्नई संघाची फलंदाजी तितकीशी बहारदार झाली नाही.
त्याचबरोबर, युएईमध्ये होणाऱ्या या आयपीएल स्पर्धेमध्ये हरभजन सिंग संघासाठी मॅच विनर खेळाडू सिद्ध होऊ शकला असता. पण हरभजनने स्पर्धेमधून माघार घेतल्याने चेन्नई संघाची फिरकी गोलंदाजी दुबळी झाली. संघाकडे अनुभवी फिरकी गोलंदाज असले तरी ते संघासाठी मॅच विनर ठरण्यात अपयशी झाले.
एवढेच नाही तर हंगामाच्या सुरुवातीलाच चेन्नई संघातील ड्वेन ब्रावो, अंबाती रायडू हे खेळाडू दुखापतग्रस्त राहिले. त्यामुळे त्यांना काह सामन्यांना मुकावे लागले. तसेच त्यांनी दुखापतीनंतर पुनरागमन केल्यावर देखील सातत्यपूर्ण कामगिरी केली नाही.
२. एमएस धोनीने गमावलाय फॉर्म
जेव्हा जेव्हा जागतिक क्रिकेटमध्ये स्फोटक फिनिशर्स आणि यष्टीरक्षकांचा उल्लेख येतो तेव्हा एमएस धोनीचे नाव चर्चेत असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीचेही आयपीएलचे मोठे नाव आहे. पण या आयपीएल हंगामात धोनीच्या बॅटमधून एकही खेळी साजेशी अशी झाली नाही. संघाचा मुख्य खेळाडू फॉर्ममध्ये नसल्याने संपूर्ण संघावर परिणाम होताना दिसत आहे.
धोनीने या हंगामात ११ आयपीएल सामन्यांमध्ये २५.७१ च्या सरासरीने १८० धावा केल्या आहेत.
३. कर्णधार म्हणून धोनीची निराशाजनक कामगिरी
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी या हंगामात कर्णधार म्हणून अपयशी ठरला. खरं तर, या हंगामात धोनीने कर्णधार म्हणून असे अनेक निर्णय घेतले, ज्यांनी प्रत्येकाला चकित केले पण त्याचे सकारात्मक परिणाम दिसले नाहीत.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असे धोनीला मानले जाते, पण हा हंगाम त्याच्यासाठी अत्यंत वाईट होता. तो फलंदाज म्हणून फ्लॉप होता, तसेच कर्णधार म्हणूनही फ्लॉप ठरला. मागील वर्षी पर्पल कॅप जिंकणार्या इम्रान ताहिरला त्याने पहिल्या १० सामन्यांपैकी एकाही सामन्यात अंतिम अकरामध्ये समाविष्ट केले नाही. त्याच वेळी, तरुण खेळाडूंना फारशी संधी दिली गेली नाही.
आयपीएल २०२० मध्ये धोनीची टीम आता प्ले ऑफमधून बाहेर पडली आहे. आयपीएल इतिहासातील हा पहिलाच हंगाम असेल ज्यात संघ प्ले ऑफमध्ये खेळताना दिसणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल खेळण्यास तयार नसलेल्या मुंबईच्या गोलंदाजानेच मोडलं चेन्नईच कंबरडं, पाहा काय केली कामगिरी
मुंबईच्या गोलंदाजांपुढे चेन्नईच्या फलंदाजांची त्रेधातिरपिट; पहिल्यांदाच झाला १० विकेट्सने पराभव
राहिलेल्या ३ मॅच खेळणार का? पाहा काय होते धोनीचे उत्तर
ट्रेंडिंग लेख –
‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला
तुमच्यात इतकेच कौशल्य असेल तर पोराला क्रिकेटर बनवून दाखवा!






