काही दिवसांपूर्वीच २०१९-२० चा रणजी हंगाम पार पडला. या हंगामातील अंतिम सामन्यात जयदेव उनाडकट कर्णधार असणाऱ्या सौराष्ट्र संघाने बंगाल विरुद्ध पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीमुळे विजेतेपद मिळवले.
हे विजेतेपद मिळवण्यात उनाडकटने मोठा वाटा उचलला आहे. त्याने १३.२३ च्या सरासरीने या रणजी मोसमात सर्वाधिक ६७ विकेट्स घेतल्या. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका वेगवान गोलंदाजाने एका मोसमात घेतलेल्या या सर्वाधिक विकेट्स आहेत.
उनाडकट मागील काही मोसमांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करत आहे. २०१८-१९ च्या रणजी मोसमातही त्याच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्र संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. पण त्यावेळी त्यांना विदर्भाकडून पराभव स्विकारावा लागला होता.
उनाडकट देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत असला तरी त्याला मागील काही वर्षांपासून भारतीय संघात प्रवेश करण्यात अपयश येत आहे. त्याने २०१० ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्यूरियनला झालेल्या कसोटी सामन्यातून आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण त्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ हा १ कसोटी सामना, ७ वनडे सामने आणि १० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळता आले.
पण आता या ३ कारणांमुळे उनाडकटला भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते.
सध्याचा फॉर्म –
उनाडकटचा सध्याचा फॉर्म शानदार आहे. तो २०१९-२० रणजी मोसमातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. तसेच मागील मोसमातही त्याने चांगली कामगिरी करताना ८ सामन्यात ३९ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याचा हा सध्याचा फॉर्म पहाता आणि सौराष्ट्र संघाचे नेतृत्व करताना त्याच्यात आलेली परिपक्वता पहाता त्याला भारतीय संघात संधी मिळू शकते.
गोलंदाजीतील विविधता –
२८ वर्षीय उनाडकट डावकरी वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्या या गोलंदाजी शैलीचा भारतीय संघाला फायदा होऊ शकतो. सध्या भारतीय संघात खलील अहमद व्यतिरिक्त डावकरी वेगवान गोलंदाज नाही.
याआधी भारताकडे झहीर खान, आरपी सिंग, इरफान पठाण आणि आशिष नेहरा हे डावकरी वेगवान गोलंदाज होते. या सर्वांनी भारताकडून खेळताना यश मिळवले होते. पण खलीलला अजूनही म्हणावे तसे यश मिळालेले नाही. त्यामुळे उनाकटला संधी दिली जाऊ शकते.
मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी –
उनाडकटने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. त्याने अ दर्जाच्या सामन्यांमध्ये ९४ सामन्यात १३३ विकेट्स तसेच ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये १३४ सामन्यात १६८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने भारताकडून खेळताना ७ वनडेत ८ विकेट्स घेतल्या आहेत. तर टी२०मध्ये १० सामन्यात १४ विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच २०१७मध्ये श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेत तो मालिकावीरही ठरला होता. तो भारताकडून शेवटचे २०१८ ला झालेल्या निदाहास टी२० ट्रॉफीमध्ये खेळला आहे. त्या मालिकेत त्याने ४ सामन्यात ७ विकेट्स घेतल्या होत्या. पण त्यानंतर तो भारताकडून खेळलेला नाही. पण त्याचा हा अनुभव पहाता त्याला पुन्हा भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते.
ट्रेंडिंग घडामोडी-
–यावरुन कळते गांगुली टीम इंडियासाठी किती कष्ट घेत आहे
-दक्षिण आफ्रिकेचा स्टार डेल स्टेन पाकिस्तानच्या हाॅटेलमध्ये होता अरेस्ट
-टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू कधीही वापरत नाही फोन