भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार आणि जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जाणारे राहुल द्रविड यांन वरिष्ठ भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे. 1995 ते 2011 पर्यंतच्या आपल्या 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत द्रविड यांनी 164 कसोटी आणि 344 एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी एकूण 24000 पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत.
द्रविड भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असताना संघाने 2018 साली विश्वचषक आपल्या नावे केला. तर एकदा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या सर्व बाबींचा विचार केला असता भविष्यात भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड हे बीसीसीआयची पहिली पसंत असण्याची शक्यता याआधीच वर्तवली जात होती. आता ही शक्यता खरी ठरली आहे. यासोबतच आपण या लेखात बघणार आहोत अशी प्रमुख 3 कारणे, ज्यामुळे द्रविड हे भारतीय संघासाठी उत्तम प्रशिक्षक ठरतील.
ज्यूनियर स्तरावर आहे कोचिंगचा शानदार अनुभव
द्रविड यांनी 2011 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला राम राम रोखण्याचा निर्णय घेतल्यानंतर, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. द्रविड यांनी भारताच्या 19 वर्षांखालील आणि भारत अ संघाच्या प्रशिक्षकपदी काम केले आहे. त्यामुळे त्यांना ज्यूनियर स्तरावर प्रशिक्षक म्हणून उत्तम अनुभव आहे. याशिवाय ते बंगळुरुमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख म्हणून देखील काम करत आहेत.
खेळाची उत्तम समज
आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये द्रविड यांनी जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना केला आहे. तसेच त्यांना क्रिकेटचे सूक्ष्म ज्ञान आहे. 16 वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीमुळे द्रविड यांना क्रिकेटची पूर्ण जाण आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी देखील मागील काळात द्रविड यांच्या खेळाबद्दल असलेल्या माहितीचे कौतुक केले आहे. त्यामुळे द्रविड जर भारतीय संघाचे प्रशिक्षक झाले तर याचा भारतीय क्रिकेटला निश्चितच फायदा होईल.
अतिशय शांत व संयमी स्वभाव
द्रविड हे आपल्या पूर्ण कारकिर्दीमध्ये आपल्या शांत स्वभाव व दबावाच्या परिस्थितीत उत्तम निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध होते. द्रविड सारखे प्रशिक्षक असल्यास खेळाडूंना देखील त्याचा फायदाच होतो. द्रविड यांना आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये अनेक महत्त्वाच्या प्रसंगी आपल्या शांत स्वभावाचा फायदा झाला व जर ते भारतीय संघाचे प्रशिक्षक असले तर संघालाही त्याचा फायदा होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
द्रविड टीम इंडियाचे २६ वे महागुरू, आतापर्यंत ‘या’ दिग्गजांची लागलीय वर्णी; वाचा संपूर्ण यादी
टीम इंडियाचा नवा हेडकोच बनल्यावर काय म्हणाला द्रविड? वाचा सविस्तर
राहुल द्रविडने मानद डॉक्टरेट घेण्यास दिला होता नकार, कारण ऐकून कराल कौतुक