यावर्षी मार्चमध्ये भारताचा दिग्गज फलंदाज वसिम जाफरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. जाफर देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले. भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या जाफरने अनेक वर्षे मुंबईकडून क्रिकेट खेळले. तो मागील काही मोसम विदर्भाकडून खेळला.
जाफरने भारताकडूनही २००० ते २००८च्या दरम्यान ३१ कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्त्व केले होते. यावेळी त्याने ५ शतके आणि ११ अर्धशतके ठोकत १९४४ धावा केल्या. तसेच त्याने रणजी ट्रॉफी या मानाच्या स्पर्धेतही १२ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील या दिग्गज खेळाडूच्या नावावर असलेले हे ३ खास विक्रम –
१. रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा –
रणजी ट्रॉफीमध्ये जाफरने जवळजवळ २३ वर्षे खेळताना १२०३८ धावा केल्या आहेत. त्यामुळे तो रणजीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. विशेष म्हणजे त्याच्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही फलंदाजाला रणजी ट्रॉफीमध्ये १० हजार धावांचा टप्पाही ओलांडता आलेला नाही.
रणजीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये जाफरच्या पाठोपाठ अमोल मुजुमदार आहे. त्याने मुंबई, आसाम आणि आंध्रप्रदेशकडून खेळताना ९२०२ धावा केल्या आहेत. तर मध्येप्रदेशचा देवेंद्र बुंदेला तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने ९२०१ धावा केल्या आहेत.
२. रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके –
जाफरने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दित एकूण ५७ शतके केली आहेत. त्यातील ४० शतके त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना केले आहेत. त्यामुळे तो रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके करणारा क्रिकेटपटू आहे. त्याच्या या विक्रमाच्या आसपासही सध्या कोणी नाही.
रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत जाफर पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली आणि हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व केलेला अजय शर्मा आहे. त्याने ३१ शतके केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर अमोल मुजुमदार आणि हृषिकेश कानिटकर प्रत्येकी २८ शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
३. रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक सामने –
डिसेंबर २०१९ ला जाफर १५० रणजी ट्रॉफीचे सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू ठरला होता. त्याने हा टप्पा विदर्भकडून आंध्रप्रदेशविरुद्ध खेळताना गाठला होता. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक १५६ सामने खेळले आहेत.
त्याच्यापाठोपाठ रणजीमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे बुंदेला आणि मुजुमदार आहे. बुंदेलाने १४५ सामने आणि मुजुमदारने १३६ सामने रणजी ट्रॉफीमध्ये खेळले आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
रोहित शर्मावर झाला मोठा अन्याय, लक्ष्मणही झाला यामुळे नाराज
आयसीसीने सांगितली अशी एक गोष्ट की भारतीय चाहते झाले आनंदाने वेडे
धोनीच्या निवृत्तीवर पाकिस्तानी क्रिकेटरने केले भाष्य, चाहत्यांनी वाहिली शिव्यांची लाखोली