क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारामध्ये चौकार आणि षटकार फार महत्वाचे असतात. जर तुम्हाला वेगाने धावा करायच्या असतील तर षटकार ठोकणे आवश्यक असते. अनेक फलंदाजांनी त्यात प्रभुत्व मिळवले आहे, तर अनेक खेळाडूंना तसे षटकार मारता येत नाहीत.
सर डोनाल्ड ब्रॅडमन हे क्रिकेटचे महान फलंदाज मानले जातात. त्यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत ३५००० पेक्षा जास्त धावा केल्या. पण त्यांना त्यांच्या कारकिर्दीत फक्त ६ षटकार मारता आले. हळूहळू काळ बदलल्याने खेळ बदलला आणि खेळाडूंच्या खेळण्याची पद्धतही बदलली. कालांतराने खेळाडू अधिक आक्रमक झाले आणि मर्यादित षटकांच्या खेळांमध्ये षटकार ही एक सामान्य बाब झाली.
या लेखात, आपण भारतीय खेळाडूंच्या ३ उत्कृष्ट षटकारांबद्दल जाणून घेणार आहोत, जे चाहते कधीही विसरू शकत नाहीत. त्यातही या खेळाडूंनी विश्वचषकासारख्या विश्वस्तरीय स्पर्धेत हे षटकार मारल्याने त्यांना वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
३. युवराज सिंगचे डर्बनमधील ६ षटकार
युवराज सिंगने २००७ च्या पहिल्या टी-२० विश्वचषकात ठोकलेले सलग ६ षटकार कोणताही क्रिकेटप्रेमी विसरु शकत नाही. त्याने इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर हे ठोकले होते. युवराज सिंगच्या आधी ३ फलंदाजांनी एका षटकात ६ षटकार ठोकले होते पण, याआधी कोणत्याही फलंदाजाने एका मजबूत संघाच्या अव्वल वेगवान गोलंदाजाविरुद्ध ६ षटकार मारले नव्हते.
युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला अशा पद्धतीने ६ षटकार ठोकले जणू तो एक सामान्य गोलंदाज आहे. त्यावेळी स्टुअर्ट ब्रॉडला कुठे गोलंदाजी करावी हे कळतच नव्हते. युवराजने त्याचा चेंडू स्टेडियमच्या सर्व दिशांमध्ये फटकावला होता.
२. सचिन तेंडुलकरचा सेंच्युरियनमधील अभूतपुर्व षटकार
विश्वचषकात भारतीय संघ कधीही पाकिस्तानकडून हरलेला नाही. पण जेव्हा जेव्हा या दोन संघांमध्ये सामना होतो तेव्हा चाहते उत्साहित होतात. २००३ च्या विश्वचषकातही भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना झाला होता. प्रथम फलंदाजी करताना सईद अन्वरने शानदार शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ५० षटकांत २७३ धावा केल्या होत्या. भारताची फलंदाजी मजबूत होती पण पाकिस्तानची गोलंदाजी तितकीच चांगली होती.
शोएब अख्तरने त्याचा पहिला चेंडू अतिशय वेगाने टाकला पण सचिन तेंडुलकरने शोएबचा चेंडू कट करत आणि त्याला थर्ड मॅनच्या दिशेने टोलावला. हा अदभुत षटकार पाहून आख्खे स्टेडियममधील दर्शक हैराण झाले आणि भारतीय चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
सचिनने त्या सामन्यात शोएब अख्तरचा चांगलाच समाचार घेतला आणि उत्कृष्ट ९८ धावा केल्या. त्याच्या फलंदाजीने त्याने शोएब अख्तरची भीती प्रत्येकाच्या मनातून काढून टाकली होती. शोएब अख्तर त्या सामन्यात खूप महागडा ठरला होता. त्याने १० षटकांत ७२ धावा खर्च केल्या होत्या. भारताने हा सामना २६ चेंडू राखून ६ विकेट्सने जिंकला होता.
१. एमएस धोनीचा वानखेडे स्टेडियमवरील विजयी षटकार
विश्वचषक २०११ चा अंतिम सामना आणि ठिकाण मुंबईचे वानखेडे स्टेडियम. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या त्या उत्कृष्ट शॉटमुळे संपूर्ण भारताला २८ वर्षांपासून वाट पाहत असलेला विश्वचषकासाठी आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. श्रीलंकेच्या २७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धोनीने जबरदस्त खेळी खेळली.
त्या क्षणाचे वर्णन शब्दात करता येणार नाही. धोनीचा तो षटकार कायम लक्षात राहील. जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासाबद्दल चर्चा होईल, तेव्हा तेव्हा धोनीच्या या षटकाराचा नेहमीच उल्लेख केला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘झिरों’मध्ये नंबर १ आहेत रोहित, रायुडूसह ‘हे’ ५ क्रिकेटर; अजून फक्त १ चूक, मग मोडतील नकोसा रेकॉर्ड
सीएसकेविरुद्धच्या मोठ्या लढतीपूर्वी ‘हिटमॅन’ने बदलला गियर, क्वारंटाईन संपवून सुरू केला सराव