आयपीएल २०२१ चा हंगाम सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू डेव्हिड वॉर्नरसाठी खूप खराब राहिला आहे. या हंगामात त्याला केवळ संघाच्या कर्णधारपदावरूनच काढून टाकण्यात आले नाही, तर त्याला प्लेइंग इलेव्हन मधूनही वगळण्यात आले. डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील संघाने २०१६ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. याशिवाय त्याने आयपीएलच्या इतिहासात तीन वेळा ऑरेंज कॅप देखील मिळवली आहे. पण या वर्षी या खेळाडूला संघाबाहेर जास्त वेळ घालवावा लागला.
सनरायझर्स हैदराबादने वॉर्नरला बाहेर बसवून आधीच स्पष्ट केले आहे की पुढील वर्षी होणाऱ्या मेगा लिलावात ते या स्टार खेळाडूला कायम ठेवणार नाही. अशा स्थितीत पुढील वर्षी अनेक संघांच्या नजरा या स्फोटक फलंदाजावर असतील. पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये दोन नवीन संघही जोडले जाणार आहेत, त्यामुळे वॉर्नर पुढच्या वर्षी एखाद्या संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो.
आज आपण पुढील वर्षी होणाऱ्या मेगा लिलावात कोणते ३ संघ वॉर्नरला त्यांच्या संघात समाविष्ट करू शकतात, याबाबत चर्चा करणार आहोत.
३. राजस्थान रॉयल्स
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल २०२१ चा प्रवास अत्यंत निराशाजनक होता. या वर्षी त्यांनी खेळलेल्या १४ सामन्यांपैकी त्यांचा संघ केवळ ५ सामने जिंकू शकला. या हंगामात त्यांचा संघ सातव्या स्थानावर राहिला.
राजस्थानची फलंदाजी गेल्या दोन सामन्यांमध्ये फ्लॉप ठरली होती. त्यांचा संघ १०० धावांचा टप्पाही पार करू शकला नव्हता. अशा परिस्थितीत, राजस्थान रॉयल्स संघ पुढील वर्षी होणाऱ्या मेगा लिलावात डेविड वॉर्नरच्या रूपात स्फोटक सलामीवीराचा समावेश आपल्या संघात करण्याचा विचार करू शकतो. वॉर्नरचा राजस्थान संघात समावेश झाल्यास त्यांची फलंदाजी अधिक मजबूत होईल.
२. पंजाब किंग्स
आयपीएल २०२१ चा हंगाम पंजाब किंग्जसाठी समाधानकारक राहिला आहे. यावर्षी संघाने खेळलेल्या आपल्या १४ सामन्यांपैकी फक्त ६ सामने जिंकले आणि त्यांना गुणतालिकेत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या वर्षी पंजाब किंग्सने अनेक सामने अगदी कमी फरकाने गमावले आहेत. याच कारणामुळे संघ शेवटी प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नव्हता.
संघाचा कर्णधार केएल राहुलने या वर्षी दमदार कामगिरी केली आणि संघाला त्याच्या बळावर अनेक सामने जिंकूनही दिले. पण त्याच्याशिवाय संघाचे अन्य फलंदाज सातत्याने धावा करू शकले नाही. अशा स्थितीत पुढील वर्षी होणाऱ्या मेगा लिलावात पंजाब संघ डेविड वॉर्नरचा संघात समावेश करू शकतो. डेव्हिड वॉर्नरच्या रूपात एक स्फोटक सलामीवीर संघाला मिळू शकते, ज्यामूळे उर्वरित संघांसाठी तो मोठी समस्या ठरू शकतो.
१. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीने यावर्षी चांगली कामगिरी केली आणि संघाने सलग दुसऱ्या वर्षी प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले होते. यावर्षी संघाने १४ पैकी ९ सामने जिंकून प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले. आरसीबीचा एलिमिनेटर सामन्यात केकेआरकडून पराभव झाला. त्यामुळे त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
यावर्षी संघाचा कर्णधार विराट कोहलीने हे आधीच स्पष्ट केले आहे की कर्णधार म्हणून संघासोबत हे त्याचे शेवटचे वर्ष असेल. पण तो एक फलंदाज म्हणून संघात कायम राहणार आहे. अशा परिस्थितीत, पुढील वर्षी होणाऱ्या मेगा लिलावात, आरसीबीला कर्णधाराची सर्वात जास्त गरज असेल. या परिस्थितीत डेविड वॉर्नर आरसीबीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. वॉर्नरच्या रूपात, संघाला एक स्फोटक सलामीवीर तसेच एक चांगला कर्णधार देखील मिळू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्लीविरुद्ध ‘अशी’ असेल केकेआरची रणनिती, सलामीवीर शुबमन गिलचा खुलासा
आयपीएल खेळणे उपयुक्त ठरले; टी२० विश्वचषकात फायदा होईल, पंजाब किंग्सच्या क्रिकेटरचा विश्वास
‘तो स्वत:ला एक अपयशी कर्णधार समजेल’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराने विराटच्या जखमेवर चोळले मीठ