कसोटी क्रिकेट काहिसे रटाळवाणे होऊ लागल्यानंतर ६०-६० षटकांचे एकदिवसीय सामने सुरू करण्यात आले. पुनश्च त्यात बदल करून ५०-५० षटक, नंतर २०-२०, नव्याने सुरू झालेले टी१० आणि इंग्लंड & वेल्स क्रिकेट बोर्डाची (ECB) प्रस्तावित ‘द हंड्रेड’ असा क्रिकेटचा प्रवास झाला. या सर्व प्रारूपांत सर्वाधिक लोकप्रियता ही टी २० ला मिळाली असली तरी जाणकार कसोटी क्रिकेटच खरे क्रिकेट असल्याचे ठासून सांगतात. परंतु, खेळाडू आणि चाहते अजूनही एकदिवसीय क्रिकेटला सर्वाधिक पसंदी देतात.
एकदिवसीय क्रिकेट सुरू झाल्यावर जवळपास पूर्ण एक तप विंडीजने त्यावर एकछत्री वर्चस्व गाजवले. विंडीजच्या साम्राज्याला पहिला सुरूंग भारताने १९८३ चा विश्वचषक जिंकून भारताने लावला आणि एकदिवसीय क्रिकेटचे हे बाळ भारतीय उपखंडात तरूण झाले. भारतापाठोपाठ पाकिस्तान आणि श्रीलंकेने विश्वचषक जिंकल्याने वन डे क्रिकेटची लोकप्रियता शिगेला पोहचली. त्यानंतर २१व्या शतकाच्या सुरूवातीपासून पूर्ण दशकात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कोणाला नाक वर काढू दिले नाही. सध्या एकदिवसीय क्रिकेटचा मुकुट अलटून-पलटून संघ आपआपल्या शिरावर ठेवत असतात.
वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच आशिया चषक सारख्या स्पर्धांमुळे एकदिवसीय क्रिकेटची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. क्लाईव्ह लॉईड, कपिल देव, इम्रान खान, सचिन तेंडुलकर, मुरलीधरन, वसिम अक्रम, रिकी पॉन्टींग,महेंद्रसिंग धोनी ते विराट कोहली या खेळाडूंनी विक्रमाचे इमले रचले. आजच्या लेखात आपण अशा, तीन संघांची माहिती घेऊ ज्यांनी वन डे क्रिकेटमध्ये दोन लाखाहून अधिक धावा जमविल्या आहेत.
३) पाकिस्तान-
पाकिस्तान क्रिकेट संघाने एकदिवसीय सामने खेळायला १९७३ मध्ये सुरूवात केली. वन डे क्रिकेट खेळणारा पहिल्या आशियाई संघाचा मान पाकिस्तान कडेच जातो. १९७३ पासून आजपर्यंत या संघाने ९२७ सामने खेळून २०२८४१ धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघात पाकीस्तानचा तिसरा क्रमांक लागतो. पाकिस्तानसाठी सर्वात जास्त धावा इंजमाम उल हक (११७३९) याच्या नावावर आहे. सर्वाधिक शतकांचा मान सईद अन्वर (२०) याच्याकडे जातो.
२) ऑस्ट्रेलिया-
आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनविणाऱ्या संघात ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहेत. १९७१ ला पहिला वन डे खेळण्यापासून ऑस्ट्रेलियाने ९४९ सामने खेळत तब्बल २१४७६७ धावा आपल्या नावावर जमा केल्यात. ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार, सलग दोन वेळा विश्वचषक जिंकून देणारा रिकी पॉन्टींग हाच त्या देशासाठी वन डे क्रिकेटचा बादशहा आहे. त्याच्या नावे १३७०४ धावा आणि ४१ शतके आहेत.
१) भारत-
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम भारतीय संघाचे नावे आहे. १९७४ पासून भारतीय संघाने ९८७ सामने खेळत २१९७०२ धावांचा एवरेस्ट उभारला आहे. भारताच्या पाच फलंदाजांनी दहा हजाराहून जास्त धावा बनविल्या आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर (१८४२६ धावा, ४९ शतके), विराट कोहली (११६०९, ४३ शतके), सौरव गांगुली (११२२१ धावा, २२ शतके), राहुल द्रविड (१०७६८ धावा, १२ शतके), महेंद्रसिंग धोनी (१०५९९ धावा, ९ शतके) यांचा समावेश होतो.