ऑस्ट्रेलिया दौर्यावरील भारतीय संघाच्या वनडे मालिकेला सुरुवात व्हायला आता काहीच तास उरले आहेत. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा आहे. दौऱ्याची सुरुवात ३ वनडे सामन्यांचा मालिकेने होणार असून त्यानंतर ३ टी-२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येईल.
ह्या दीर्घ कालावधीच्या दौऱ्याची सुरुवात विजयाने करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. दुखापतींच ग्रहण लागलेल्या भारतीय संघाचं मनोधैर्य उंचावण्यासाठी हा विजय नक्कीच महत्वपूर्ण ठरेल. त्यामुळे संघ व्यवस्थापन देखील मैदानात उतरण्यापूर्वी भक्कम योजना आखण्याचा प्रयत्न करेल.
त्याच अनुषंगाने आपणही अशा ३ गोष्टी या लेखात पाहणार आहोत, ज्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरूद्ध विजय मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील.
१) तीनही सामन्यात अंतिम ११ जणांचा संघातील खेळाडूंमध्ये व्हावा कमी बदल
आगामी वनडे मालिकेच्या केवळ १ दिवस आधी भारतीय संघ क्वारंटाईनमधून बाहेर आला असल्याने खेळाडूंना वातावरणाशी जुळवून घ्यायला कमी वेळ मिळणार आहे. त्याचप्रमाणे सगळेच खेळाडू अनेक महिन्यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहेत. अशावेळी अंतिम अकराच्या संघात वारंवार बदल केल्यास संघासाठी ते अडचणीचे ठरेल. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने खेळाडूंवर अधिक विश्वास दाखवत एकच संघ संपूर्ण मालिकेत कायम ठेवण्याची गरज आहे.
२) सलामीवीराच्या जागेवर केएल राहुलला द्यावी संधी
भारताचा नियमित सलामीवीर आणि आयसीसीच्या वनडे क्रमवारीतील दुसर्या स्थानावर असलेला स्टार फलंदाज रोहित शर्मा स्नायूंच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे शिखर धवनसह सलामीला कोण उतरणार, हा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर आहे. केएल राहुल हा ह्या स्थानासाठीचा उत्तम पर्याय ठरू शकतो. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेला राहुल सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. तीनही सामन्यांत राहुलला सलामीवीर म्हणून संधी मिळाल्यास तो शिखर धवनसह संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकतो.
३) तीन वेगवान गोलंदाज खेळवणे
ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरणाऱ्या असतात. वेग आणि उसळी मिळणार्या या खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांची भूमिका निर्णायक ठरू शकते. भारतीय संघाकडे वेगवान गोलंदाजांची मजबूत फळी उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या वनडे मालिकेत भारतीय संघ ३ वेगवान गोलंदाजांना घेऊन खेळल्यास ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.
दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने आगामी वनडे मालिका रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
Video – पालकत्व रजा घेतल्याबद्दल अखेर विराटने सोडले मौन, म्हणाला…
आश्चर्यकारक! ‘करोडपती’ मलिंगा आई-वडिलांना दहा वर्षे भेटलेलाच नाही
भारत-ऑस्ट्रेलिया संघ फिलीप ह्युजेसला देणार श्रद्धांजली; डोक्याला चेंडू लागून झाला होता मृत्यू
ट्रेंडिंग लेख –
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत सर्वाधिक जास्त वेळा नाबाद राहणारे ३ भारतीय फलंदाज
ऑस्ट्रेलियन फलंदाजांना टी२०त सर्वाधिक वेळा तंबूचा रस्ता दाखवणारे टीम इंडियाचे ३ गोलंदाज
या पाच सामन्यात भारतीय अष्टपैलू खेळाडूंनी गाजवली होती ऑस्ट्रेलियाची मैदाने