आजघडीला टी-२० क्रिकेट जगभरात अतिशय लोकप्रिय आहे. वेगवान आणि आक्रमक क्रिकेटमुळे चाहते कायमच टी-२० सामने पाहण्यास पसंती देतात. २००७ साली दक्षिण आफ्रिकेत खेळविण्यात आलेल्या पहिल्याच टी-२० विश्वचषकाचं विजेतेपद भारताने पटकावलं होतं. तेव्हापासून आजतागायत ह्या प्रकारात भारताने वर्चस्व गाजवले आहे.
क्रिकेटच्या ह्या नवीन प्रकारात भारताला ऑस्ट्रेलियन संघाने नेहमीच कडवे आव्हान दिले आहे. २०१६ साली भारताने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना त्यांच्याच भूमीवर धूळ चारत टी-२० मालिकेत ३-० असा विजय मिळवला होता. त्यामुळे येत्या ४ डिसेंबरपासून सुरू होणार्या टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ ह्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न करेल. ह्याच पार्श्वभूमीवर या लेखात आपण ३ भारतीय गोलंदाजांची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यांत सर्वाधिक बळी मिळवले आहेत.
३. भुवनेश्वर कुमार
मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार काही काळापासून दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. आयपीएलच्या हंगामाद्वारे ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भुवनेश्वरला स्नायूंच्या दुखापतीमुळे पुन्हा एकदा संघातील स्थान गमवावे लागले आहे. मात्र, आपल्या स्विंग गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या गुणवान खेळाडूने ह्यापूर्वी अनेकदा भारताला टी-२० सामन्यांत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. भुवनेश्वरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या ७ टी-२० सामन्यांत ८ बळी घेत ७ पेक्षाही कमी धावगतीने धावा दिल्या आहेत.
२. आर अश्विन
सन २०१० मध्ये भारतीय संघाकडून पदार्पण केलेल्या आर अश्विनने नावाजलेल्या फलंदाजांनाही आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले आहे. वैविध्यपूर्ण गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तमिळनाडूच्या ह्या ऑफस्पिनरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या ९ टी-२० सामन्यांत १० बळींची कमाई केली आहे. ११ धावांत ४ बळी, ही त्याची ऑस्ट्रेलियाविरूद्धची सर्वोत्तम कामगिरी आहे. मात्र, आगामी दौऱ्यात त्याला केवळ भारताच्या कसोटी संघात स्थान मिळाले आहे.
१. जसप्रीत बुमराह
सन २०१६ साली ऑस्ट्रेलियन भूमीवर खेळवल्या गेलेल्या टी-२० मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियन संघाचा ३-० असा धुव्वा उडविला होता. ह्याच मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पदार्पण केले होते. अल्पावधीतच तो आंतरराष्ट्रीय पातळीवर अव्वल गोलंदाज म्हणून नावारूपाला आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० सामन्यांत सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रमही बुमराहच्याच नावावर जमा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या ११ टी-२० सामन्यांत १५ बळी त्याने पटकाविले असून १६ धावांत ३ बळी, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आगामी मालिकेतदेखील बुमराहच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल.
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच टी२० सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे ३ भारतीय धुरंदर
ऑस्ट्रेलियन भूमीत वनडेमध्ये सर्वाधिक चेंडूचा सामना करणारे ३ भारतीय फलंदाज
वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडणारे ३ भारतीय फलंदाज
महत्त्वाच्या बातम्या-
“यष्टीरक्षकांसाठी धोनी एक आदर्श, भूमिका कशी पार पाडायची हे त्याने दाखवून दिलं“






