यंदाचा आयपीएल हंगाम आतापर्यंत बऱ्यापैकी रोमांचक ठरला आहे. या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे, तर अनेक अनुभवी खेळाडूंची कामगिरीही चांगली आहे.
मयंक अगरवाल, केएल राहुल, देवदत्त पाडीक्कल, संजू सॅमसन आणि सॅम करन या खेळाडूंनी या हंगामात आत्तापर्यंत चांगला खेळ दाखविला आहे. दुसरीकडे रवी बिश्नोई, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, अब्दुल समद आणि राहुल तेवतिया या युवा खेळाडूंनी सर्वांना प्रभावित केले.
पण या हंगामात असेही अनेक दिग्गज खेळाडू आहेत जे फ्लॉप झाले आहेत. या खेळाडूंनी गेल्या हंगामात जबरदस्त कामगिरी केली होती, परंतु या मोसमात आतापर्यंत त्यांच्या नावाप्रमाणे त्यांना कामगिरी करता आलेली नाही.
या लेखामध्ये आपण अशा ३ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ ज्यांनी आयपीएलच्या शेवटच्या हंगामात जबरदस्त खेळ दाखवला परंतु या हंगामात त्यांना अद्याप सूर गवसला नाही. चला जाणून घेऊया ते ३ खेळाडू कोण आहेत.
आयपीएलच्या शेवटच्या सत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे हे ३ खेळाडू जे या हंगामात फ्लॉप
३. जसप्रीत बुमराह
आयपीएलच्या या हंगामात मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची कामगिरी तितकी चांगली होताना दिसत नाही. मागील मोसमात त्याने १६ सामन्यांत १९ गडी बाद केले होते. परंतु या आयपीएल हंगामामध्ये जसप्रीत बुमराह आतापर्यंत महागडा गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंतच्या ५ सामन्यांत ८.८० च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत, तर यावेळी त्याने ७ बळी मिळवले आहेत. बुमराहसारखा गोलंदाज अशा पद्धतीने महागडा ठरतो हे आश्चर्यकारक आहे.
२. क्विंटन डी कॉक
या यादीमध्ये मुंबई इंडियन्सच्या आणखी एका दिग्गज खेळाडूचे नाव आहे. संघाचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने गेल्या आयपीएल हंगामात १६ सामन्यांत ३६.२६ च्या सरासरीने ४ अर्धशतकांच्या मदतीने ५२९ धावा केल्या होत्या. परंतु या हंगामाबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यांमध्ये क्विंटन डी कॉकची कामगिरी तितकी चांगली झालेली नाही. त्याने या हंगामात ५ सामन्यात ११५ धावा केल्या आहेत. यात हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यातील ६७ धावांच्या खेळीचा समावेश आहे. परंतु या सामन्याआधीची त्याची कामगिरी खास राहिलेली नाही.
१. शिखर धवन
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवनला यंदा अजून तरी मोठी खेळी खेळण्यात अपयश आले आहे. तो चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी उभारण्यात अयशस्वी ठरत आहे. आयपीएलमध्ये यंदा त्याने आत्तापर्यंत ५ सामने खेळले असून त्याला १२७ धावाच करता आल्या आहेत. ३५ धावा ही त्याची यंदाची सर्वोत्तम खेळी आहे. मागीलवर्षी त्याने १६ सामन्यात ५२१ धावा केल्या होत्या. तो त्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज होता. पण यंदा मात्र त्याला अजून फॉर्म सापडलेला दिसत नाही.