क्रिकेट हा खेळच असा आहे, ज्यामध्ये कधी काय घडेल हे सांगता येत नाही. कसोटी क्रिकेटविषयी बोलायच झालं तर, पहिल्या डावात शून्यावर बाद झालेला फलंदाज दुसऱ्या डावात शतक मारताना दिसू शकतो. तर, एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला दुसऱ्या डावात मात्र एकही विकेट घेण्यात यश येत नाही.
पण, जसे वेळेनुसार सर्व गोष्टींमध्ये हळूहळू बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तसे, क्रिकेट क्षेत्रातही वेळेनुसार अनेक बदल अनुभवायला मिळाले आहेत. पुर्वी काही फलंदाज फक्त फलंदाजीत माहीर असायचे. तर काही गोलंदाजही फक्त गोलंदाजीत आपला जलवा दाखवत असायचे. यष्टीरक्षक फलंदाजही फक्त त्यांची यष्टीमागील जबाबदारी सांभाळण्यात आणि धावा घेण्यात व्यस्त असायचे. पण, हळूहळू फलंदाजानी चेंडूवर आपला हात साफ करायला सुरुवात केली. तर, गोलंदाजानी बॅट घेत सामना जिंकवण्यात आपले योगदान दिले.
एवढेच नव्हे तर, काही यष्टीरक्षकांनी नेहमी यष्टीमागे बाद करणाऱ्या फलंदाजांची यष्टी समोरुन (गोलंदाजी करत) विकेट घेतली. या लेखात अशाच, अनोखा कारनामा करणाऱ्या निवडक यष्टीरक्षकांचा आढावा घेण्यात आला आहे.
तर जाणून घेऊयात, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट्स घेणाऱ्या ३ यष्टीरक्षकांविषयी
मार्क बाउचर (दक्षिण आफ्रिका) –
दक्षिण आफ्रिका संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज मार्क बाउचर याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठ्या आकडी धावा करण्यासाठी ओळखले जात होते. परंतु, बाउचरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. २००५मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात बाउचरने ड्वेन ब्रावोला बाद केले होते. परंतु, तो सामना अनिर्णित राहिला होता. ब्रावोची विकेट ही बाउचरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिली आणि एकमेव विकेट ठरली.
ततेंदा तैबू (झिम्बाब्वे) –
झिंबाब्वेचा माजी कर्णधार असलेल्या ततेंदा तैबूने २ सामन्यात गोलंदाजी केली. श्रीलंका संघ २००४मध्ये झिंबाब्वे दौऱ्यावर गेला होता. तेव्हा २० एप्रिल २००४ रोजी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात तैबूने गोलंदाजीत ४ षटकांत केवळ १९ धावा दिल्या होत्या. पण, विकेट घेण्यात त्याला यश आले नाही. मात्र, त्याच मालिकेतील शेवटच्या सामन्यात २९ एप्रिल २००४ रोजी तैबूने थिलीना कदांबी व उपुल चंदना यांना बाद केले होते. १० षटकात ४२ धावा देत तैबूने त्या २ विकेट घेतल्या होत्या.
एवढेच नव्हे तर, तैबूने वनडेतील गोलंदाजी कामगिरीच्या एका आठवड्यानंतर म्हणजे मे २००४मध्ये श्रीलंकाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सनथ जयसूर्याची विकेट घेतली होती. ती विकेट तैबूच्या कसोटी कारकर्दीतील अविस्मरणीय विकेट ठरली. कारण त्याने त्या सामन्यात तब्बल १५७ धावा करणाऱ्या जयसूर्याला बाद केले होते.
एमएस धोनी (भारत)
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला त्याच्या यष्टीरक्षण आणि फलंदाजीसाठी ओळखले जाते. पण धोनीने वनडेत गोलंदाजी करत २ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. धोनीने आयसीसी चॅंम्पियन्स ट्राॅफीमध्ये ३० सप्टेंबर २००९ रोजी पहिल्यांदा गोलंदाजी केली होती. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना धोनीने ट्रॅविस डाॅवलिन या खेळाडूला बाद केले होते. धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ही एकमेव विकेट आहे. यात धोनीने २ षटकांत १४ धावा देत १ विकेट घेतली होती. भारताने तो सामना १०७ चेंडू राखून ७ विकेट्सने जिंकला होता.
क्रिकेट जगतात हे तीन यष्टीरक्षक पकडून एकूण १२ यष्टीरक्षकांनी एकतरी आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतली आहे. भारताचे माजी यष्टीरक्षक सईद किरमाणी यांच्या नावावरही विकेट आहे.
ट्रेंडिंग लेख-
टी२० सामन्यांत २५० धावांचा टप्पा पार करणारे जगातील ५ संघ
रहस्यमय कारणामुळे मृत्यू झालेले जगातील ३ क्रिकेटपटू, एक होता भारतीय
पहिल्या फलंदाजापासून ते १०व्या फलंदाजाबरोबर एकाच सामन्यात फलंदाजी करणारे ४ भारतीय






