कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक दुहेरी शतके ठोकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन (१२) यांच्या नावावर आहे. त्याच्यापाठोपाठ श्रीलंकेचा महान कुमार संगकारा (११) आणि वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लारा (९) आहे. परंतु जर आपण दुहेरी शतक ठोकणाऱ्या सर्वात युवा फलंदाजाबद्दल बोललो तर हा विक्रम पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू जावेद मियाँदादच्या नावावर आहे. त्यांचे वय १९ वर्ष १४० दिवसांचे असताना त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध द्विशतक झळकावले होते.
वयाच्या २४ व्या वर्षाच्या आधी कोणत्या फलंदाजांनी दुहेरी शतक झळकावले याची यादी केली तर हा विक्रम आतापर्यंत २६ फलंदाजांनी केला आहे, परंतु २० वर्षांपेक्षा कमी वयात हा विक्रम फक्त जावेद मियाँदाद यांनी केला आहे. भारतीय संघाबद्दल विचार केला तर २४ फलंदाजांनी कसोटी किमान एकदा तरी २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. त्यातील सर्वात जलद कसोटी द्विशतक करणाऱ्या ३ भारतीय फलंदाजांबद्दल या लेखात जाणून घेऊ.
भारताकडून दुहेरी शतक झळकाविणारे ३ युवा फलंदाज
३. मंसूर अली ख़ान पतौडी (पतौडी नबाब)
भारतीय संघाचे माजी कर्णधार मंसूर अली ख़ान पतौडीने १९६४ मध्ये दिल्ली कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध वयाच्या २३ वर्षे ३४ दिवसांत दुहेरी शतक झळकावण्याचा विक्रम केला होता. हा त्या काळाचा भारतीय विक्रमही होता. त्यांनी नाबाद २०३ धावांची खेळी केली होती. त्यांनी आपल्या कसोटी कारकीर्दीत ६ शतके ठोकली आणि हे एकमेव दुहेरी शतक होते.
२. सुनील गावस्कर
भारतीय संघाचा महान फलंदाज सुनील गावस्करने १९७१ मध्ये ऐतिहासिक वेस्ट इंडीज दौऱ्यात वयाच्या २१ व्या वर्षी म्हणजे २१ वर्ष २२७ दिवसांचे वय असताना प्रथम दुहेरी शतक झळकावत मंसूर अली ख़ान पतौडी यांचा विक्रम मोडला. सुनील गावस्करने पोर्ट ऑफ स्पेन कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात १२४ धावा तर दुसऱ्या डावात २२० धावा केल्या होत्या. गावसकरने आपल्या कारकीर्दीत ३४ शतके ठोकली होती, त्यामध्ये चार दुहेरी शतकांचा समावेश आहे.
१. विनोद कांबळी
विनोद कांबळीने १९९३ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मुंबई कसोटीत २१ वर्ष ३२ दिवसांचे वय असताना दुहेरी शतक झळकावले होते. कांबळी हा कसोटी क्रिकेटमधील दुहेरी शतक ठोकणारा भारताचा सर्वात युवा फलंदाज आहे. आजही हा विक्रम कोणी मोडीत काढला नाही.
कांबळीने आपल्या कारकीर्दीत चार शतके केली असून यामध्ये दोन दुहेरी शतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही दोन दुहेरी शतकं त्याने १९९३ मध्ये इंग्लंड आणि झिम्बाब्वेविरुद्ध सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये केली आहेत.




