भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात क्रिकेट रसिकांना उत्तम संघर्ष बघायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 369 धावांचा पाठलाग करताना भारताने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 60 धावांवर रोहित शर्माच्या रूपात आपला दुसरा गडी गमावला. रोहित बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजाराने भारतासाठी उत्तम भागीदारी करत आशेचा किरण दाखवला होता. मात्र तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात हेजलवुडच्या एका अप्रतिम चेंडूवर पुजारा बाद झाला. मात्र त्याने एक खास विक्रम केला आहे.
भारताच्या डावातील 39 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या हेजलवुडने षटकातील पाचव्या चेंडूवर पुजाराला यष्टीरक्षक टीम पेन कडे झेल देण्यास भाग पाडले. एका अप्रतिम चेंडूवर पुजारा पूर्णपणे फसला व चेंडू त्याच्या बॅटचा हलकासा स्पर्श घेत टीमपेन कडे गेला. पुजाराने 94 चेंडूत 25 धावांची खेळी केली. याबरोबरच पुजाराने एक खास विक्रम केला आहे.
सन 2017 पासून ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघात 3 कसोटी मालिका खेळवण्यात आल्या आहेत. या तीन मालिकेत मिळून आत्तापर्यंत चेतेश्वर पुजाराने 21 डावात 3000 चेंडूंचा सामना केला आहे. त्यामुळे तो गेल्या 4 वर्षात ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघातील कसोटी सामन्यांमध्ये 3000 चेंडूंचा सामना करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
विशेष म्हणजे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्टीव्ह स्मिथने त्याच्यापेक्षा जवळपास अर्ध्या चेंडूंचा सामना केला आहे. त्यातही स्मिथ २०१८-१९ ची कसोटी मालिका खेळला नव्हता. स्मिथने 15 डावात 1552 चेंडू खेळले आहेत.
दरम्यान ब्रिस्बेन कसोटीत पुजारा बाद झाल्यानंतर भारताने पुढच्या विकेटही झटपट गमावल्या भारताने 65 षटकांच्या आतच 5 विकेट्स गमावल्या होत्या.
1 जानेवारी 2017 पासून ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक चेंडूंचा सामने करणारे क्रिकेटपटू –
3024 – चेतेश्वर पुजारा (21 डाव)
1552 – स्टिव्ह स्मिथ (15 डाव)
1419 – अजिंक्य रहाणे (21 डाव)
976 – विराट कोहली (14 डाव)
957 – शॉन मार्श (15 डाव)
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ संघाचे नेतृत्व करणारा क्रिकेटर ठरला २१ व्या शतकात जन्मलेला पहिलाच भारतीय कर्णधार