भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतील दुसरा कसोटी सामना कोलंबो येथे होत असून भारत विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहे. जर भारताने आज विजय मिळवला तर एक संघ म्हणून भारत अनेक विक्रम करणार आहे.
आज भारताच्या नवीन वॉल म्हणून ओळखला जाणारा प्रतिभावान खेळाडू चेतेश्वर पुजारा श्रीलंकेविरुद्ध कारकिर्दीतील ५०वा कसोटी सामना खेळत आहे. अशी कामगिरी करणारा तो सध्याच्या श्रीलंका दौऱ्यावरील संघातील केवळ चौथा खेळाडू ठरणार आहे.
जर आज पुजाराने ३४ धावा केल्या तर त्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये ४००० धावा होतील. विशेष म्हणजे ही कामगिरी त्याने भारताच्या पहिल्या डावात केली तर डावांच्या हिशोबाने भारताकडून सार्वधिक तिसऱ्या वेगवान ४००० धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होऊ शकतो.
यापूर्वी वीरेंदर सेहवागने ७९ डाव तर सुनील गावस्कर यांनी ८१ डावात ४००० धावांचा पल्ला गाठला होता. चेतेश्वर पुजाराकडून नेहमीच द्रविड सारख्या खेळीच्या अपेक्षा ठेवल्या जातात. त्या द्रविडने देखील ८४ डावात ४००० धावा केल्या आहेत.
चेतेश्वर पुजाराने आजपर्यत ४९ कसोटी सामन्यात ८३ डावात ३९६४ धावा केल्या आहेत.