पुणे । तायक्वांदो फेडरेशन आॅफ इंडिया आणि तायक्वांदो असोसिएशन आॅफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ३४ व्या स्पारिंग व ८ व्या पुमसे राष्ट्रीय सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आहे.
गुरुवार दिनांक २३ मार्च ते रविवार दिनांक २५ मार्च दरम्यान खराडी येथील राजाराम भिकू पठारे स्टेडियम येथे स्पर्धा होणार आहे. तब्बल ९ वषार्नंतर ही स्पर्धा महाराष्ट्रात होत आहे, अशी माहिती स्पर्धेचे चेअरमन संदीप ओंबासे यांनी दिली.
महाराष्ट्र,कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, राजस्थान यांसह देशातील एकूण २९ राज्यातील १४ वर्षाखालील १५०० खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मुले आणि मुलींच्या पुमसे आणि स्पारिंग या दोन प्रकारात सबज्युनियर गटात ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकास मेडल आणि प्रशस्तीपत्रे देण्यात येणार आहे. तसेच सांघिक विजेतेपद, उपविजेतेपद, तृतीय क्रमांक दिले जाणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यावेळी राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे ,भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे उपाध्यक्ष आर. के. आनंद , तायक्वांदो फेडरेशनचे अध्यक्ष चेतन आनंद, सचिव प्रभात शर्मा उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २५ मार्च रोजी दुपारी ४ वाजता होणार असून यावेळी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार , खासदार सुप्रिया सुळे, पालकमंत्री गिरीशजी बापट, खासदार नाना पाटोळे, रामपुरी गोस्वामी, दिनेश शिर्के, सुवास नायर, तसेच राजेश कांबळे, अजय पांडे उपस्थित राहणार आहेत.
डॉ, प्रसाद कुलकर्णी, तुषार औटी, सुरेश चौधरी, परवेझ खान, सुभाष नायर, नितीन गुंडा, गफार पठाण, पद्माकर कांबळे यांनी स्पर्धेचे संयोजन केले आहे