- मुलींची २० वी सबज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेचे देखील आयोजन
- श्री स्वामी समर्थ ज्ञानपीठ संचलित, सह्याद्री नॅशनल स्कूल व सह्याद्री कुस्ती संकुल आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आयोजन
पुणे । श्री स्वामी समर्थ ज्ञानपीठ संचलित, सह्याद्री नॅशनल स्कूल व सह्याद्री कुस्ती संकुल आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने ३७ व्या सबज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धा आणि मुलींची २० वी सबज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे.
भारतीय कुस्ती संघाच्या मान्यतेने म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा नगरी येथे दिनांक १३ ते १५ मार्च दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड, आयोजक आणि भारतीय कुस्ती संघाचे उपाध्यक्ष (संलग्न)विजय बराटे यावेळी उपस्थित होते.
बाळासाहेब लांडगे म्हणाले, ३० राज्यातील ३०० मुली व ६०० मुले स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यामध्ये ेिफ्रस्टाईल,ग्रिकोरोमन आणि मुलींच्या गटात या स्पर्धा होणार आहेत. महाराष्ट्रातील ५० मल्ल स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
दिनेश गुंड म्हणाले, स्पर्धा गादी विभागात प्रत्येकी १० गटात होणार आहे. ग्रिकोरोमन आणि फ्रिस्टाईल गटात ४५,४८, ५१, ५५, ६०, ६५, ७१, ८०, ९२, ११० वजनी गट असतील, तर मुलींच्या गटात ४०, ४३, ४६, ४९, ५३, ५७, ६१, ६५, ६९, ७३ हे वजनी गट असणार आहे. सोमवार दिनांक १२ मार्च रोजी पंचाचा उजळणी वर्ग आणि वैद्यकीय तपासणी होणार आहे.
आयोजक विजय बराटे म्हणाले, स्पर्धेसाठी ३ मॅटचे आखाडे असणार आहेत. महाराष्ट्रात प्रथमच सबज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे त्या चांगल्या पद्धतीने पार पडाव्यात यासाठी सर्व आयोजक काम करीत आहेत. विविध राज्यातून स्पर्धक येत असल्याने त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये याकडे विशेष लक्ष दिले जाईल.
सर्व विजेत्या स्पर्धकांना मेडल, प्रमाणपत्र आणि ५ किलो बदाम दिले जाणार आहेत. तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार, दिनांक १३ मार्च रोजी होणार आहे. यावेळी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूूषण शरण सिंग उपस्थित राहणार आहेत. तसेच गुरुवार, दिनांक १५ मार्च रोजी स्पर्धेचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
विजेतपदासाठी लढणारे मल्ल – फ्रिस्टाईलमध्ये सौरभ ईगवे, आकाश माने, सुमीत गुजर, संकेत ठाकूर, रमेश इंगवले, हे मल्ल तर ग्रिकोरोमनमध्ये विश्वजीत पाटील, विपुल थोरात, वैभव पाटील, हे मल्ल विजेतेपदासाठी लढतील. मुलींच्या गटात विश्रांती पाटील, भाग्यश्री फंड, महिमा राठोड, हर्षदा जाधव, श्रद्धा भोर, वैष्णवी कुशप्पा या विजेतेपदासाठी लढणार आहेत