पुणे। प्रेम शहाने २५ ते २७ किलो वजनी गटात तर, अभय मोरेने १८ ते २१ किलो वजनी गटात चमकदार कामगिरी बजावताना कै. राजाराम भिकू पठारे स्टेडियम, खराडी येथे होरांगी तायक्वांदो अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या ‘खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिप’ स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले.
फाईटस प्रकारात १४ वर्षांखालील गटाच्या १८ ते २१ किलो वजनी गटात अभय मोरेने रुद्र गोडबोलेला १०-५ अशा गुणांच्या फरकाने पराभूत करताना या गटाचे विजेतेपद पटकावले. १४ वर्षांखालील गटाच्या २५ ते २७ किलोवजनी गटात प्रेम शहाने तनिष्क शेंडेला १४-९ अशा गुणफरकाने पराभूत करताना स्पर्धेतील विजेतेपदाला गवसणी घातली. २१ ते २५ या वयोगटाच्या अंतिम लढतीमध्ये प्रथमेश पेनशेट्टी यांने वेदांत रानहोरे याला ९-२ असे एकतर्फी पराभूत करतना तर २७ ते ३० किलो वजनी गटात आदित्य दळवीने पृथ्वीराज पेनशेट्टीला ८-४ अशा फरकाने पराभूत करताना स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे, नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेविका संजिला पठारे, सुमन पाठारे, नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद राजगुरू, स्पर्धा आयोजक आयोजक बाळकृष्ण भंडारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मणिपूर, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा अशा विविध राज्यातील सुमारे एक हजार स्पर्धक सहभागी झाले असून स्पर्धेत सुवर्णपदक आणि रौप्य पदक जिंकणाऱ्या शंभर खेळाडूंना साऊथ कोरियातील चोसन विद्यापीठाद्वारे तायक्वांदोचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच या खेळाडूंना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती देखील दिली जाणार आहे.