लीड्स। मंगळवारी (17 जुलै) इंग्लंडने भारताविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांची वनडे मालिकाही 2-1 ने जिंकली.
इंग्लंडकडून कर्णधार इयान मॉर्गन आणि जो रुटने अनुक्रमे अर्धशतक आणि शतक करत इंग्लंडला सहज विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड समोर विजयासाठी 257 धावांचे आव्हान ठवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीर जॉनी बेअरस्टो(30) आणि जेम्स व्हिन्स(27) यांनी आक्रमक सुरुवात केली होती.
पण या चांगल्या सुरवातीनंतरही ते लवकर बाद झाले. त्यामुळे इंग्लंडची मॉर्गन आणि रुट ही जोडी मैदानावर आली. या दोघांनीही इंग्लंडचा डाव संभाळला.
सामना इंग्लंडच्या बाजूने झुकलेला असतानाच भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने नो बॉल टाकला. त्यामुळे त्या चेंडूवर यष्टीचीत झालेल्या जो रुटला जीवदान मिळाले. त्याचा त्याने फायदा घेत इंग्लंडचा विजय जवळजवळ निश्चित केला.
अखेर 45 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रुटने मिड विकेटला चौकार ठोकत वनडे कारकिर्दीतील 13 वे शतक साजरे करताना इंग्लंडच्या विजयावरही शिक्कामोर्तब केले.
रुटने 120 चेंडूत 10 चौकारांच्या सहाय्याने नाबाद 100 धावा केल्या. तर मॉर्गनने 108 चेंडूत नाबाद 88 धावा केल्या. यात त्याने 9 चौकार आणि 1 षटकार मारला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 186 धावांची भागिदारी रचली.
भारताकडून फक्त शार्दुल ठाकुरला विकेट घेण्यात यश मिळाले. त्याने बेअरस्टोला बाद केले. तर व्हिन्स धावबाद झाला.
तत्पुर्वी, भारताकडून कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक केले. त्याने 72 चेंडूत 71 धावा करताना 8 चौकार मारले. हे विराटचे वनडे कारकिर्दीतील 48 वे अर्धशतक आहे. त्याने केलेल्या 71 धावा या भारताच्या डावातील सर्वोच्च धावा ठरल्या.
भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवननेही चांगली सुरवात केली होती. परंतू त्याला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. त्याला 44 धावांवर असताना बेन स्टोक्सने धावबाद केले.
भारताच्या विकेट्स नियमित कालांतराने जात असताना माजी कर्णधार एमएस धोनीने सावध खेळ करत एक बाजू संभाळली होती. मात्र त्याला डेविड विलीने 42 धावांवर असताना बाद केले.
अखेरच्या काही षटकात शार्दुल ठाकुरने(22) केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताने 50 षटकात 8 बाद 256 धावांचा टप्पा गाठला. शार्दुलला भुवनेश्वर कुमारने(21) चांगली साथ दिली होती. मात्र तो डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला.
भारताकडून अन्य फलंदाजांना मात्र खास काही करता आले नाही. भारताच्या बाकी फलंदाजांपैकी रोहित शर्मा(2), दिनेश कार्तिक(21), सुरेश रैना(1) आणि हार्दिक पंड्या(21) यांनी धावा केल्या.
तसेच इंग्लंडकडून डेविड विली(3/40), आदिल रशीद(3/49) आणि मार्क वूड(1/30) यांनी विकेट घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या:
–कर्णधार विराट कोहलीने केला विश्वविक्रम
–आज कुलदीप यादवला हा मोठा विक्रम करण्याची संधी