भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील उद्या तिसरा आणि शेवटचा सामना विशाखापट्टणमला खेळवला जाणार आहे. हा या मालिकेतील निर्णायक सामना असेल.
या आधी दोन्हीही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीची केली आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात जो संघ जिंकेल तो मालिकाही जिंकेल.
पहिल्या सामन्यात श्रीलंकन गोलंदाजांनी केलेल्या उत्तम गोलंदाजीमुळे भारताची मजबूत फलंदाजी कोलमडली होती. या सामन्यात ७ बाद २९ अशा धावसंख्येवरुन भारताला सावरत एम एस धोनीने अर्धशतकी खेळी केली होती आणि संघाला ११२ धावांचा टप्पा गाठून दिला होता. परंतु ही धावसंख्या पुरेशी न ठरल्याने भारताला श्रीलंकेकडून ७ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता.
दुसऱ्या सामन्यात मात्र भारताकडून रोहित शर्माने विक्रमी द्विशतकी खेळी करून श्रीलंकेच्या गोलंदाजीला फोडून काढले होते. याचबरोबर श्रेयश अय्यर आणि शिखर धवनने अर्धशतकी खेळी केली होती. तसेच श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने शतकी खेळी केली होती परंतु संघाला यश मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. या सामन्यात भारताने १४१ धावांनी विजय मिळवला होता.
आता उद्या होणाऱ्या सामन्यात पहिल्या दोन सामन्यात संधी न देण्यात आलेल्या अजिंक्य रहाणेला संधी मिळते का हे बघावे लागेल. तसेच दिनेश कार्तिक आणि मनीष पांडेलाही मागील काही सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही त्यामुळे त्यांनाही उद्या संधी मिळाल्यास चांगली कामगिरी करावी लागेल.
या मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा संघाची धुरा सांभाळत आहे.