भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील 4 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे सुरू होणार आहे. मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत असल्याने तिसऱ्या कसोटी सामन्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. मात्र अशातच सिडनी कसोटीत पावसाची शक्यता वर्तवली जात आहे .
सिडनीत गुरुवारी(7 जानेवारी) सकाळी काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तापमान 19 ते 23 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. यानंतरच्या काही दिवसात थोड्याफार प्रमाणात ऊन व काही प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे.
सिडनीतील वातावरणामुळे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर देखील चिंतेत आहे. काही दिवसांपूर्वीच वॉर्नरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सिडनीतील हवामाना संदर्भातला फोटो शेअर केला होता. सिडनीत सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता 60 टक्के इतकी जास्त आहे.
सिडनी कसोटीवर जरी पावसाचे सावट असले तरी क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेत दोन्ही संघ 1-1ने बरोबरीत असल्याने तिसऱ्या कसोटी सामन्यात जो संघ विजयी होईल तो संघ मालिका गमावणार नाही. भारतीय संघाला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. पहिल्या कसोटीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघ जोरदार पुनरागमन करेल अशी शक्यता फारच कमी होती. मात्र अजिंक्यसेनेने आपल्या खेळाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. भारतीय क्रिकेट चाहत्यांना आशा असेल की, भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यातही उत्तम कामगिरी करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
बापरे…! तब्बल ११ खेळाडूंनी अजिंक्यच्या नेतृत्वात केले आहे आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण
का दिलं जातय स्मिथ आणि लॅब्यूशानेतील नात्याला ब्रोमान्सचं नाव? वाचा
“मला फोन करून सांगितले की सामना मुंबईत होईल तरी मला काही फरक पडणार नाही”