वनडे क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलिया संघाने सर्वाधिक वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. ऑस्ट्रेलियाने ५ वेळा विश्वचषक आपल्या खिशात घातला असून हा एक विक्रम आहे. सध्याच्या काळात ऑस्ट्रेलिया वनडे क्रिकेटमधील सर्वात खतरनाक संघांपैकी एक आहे, जो नेहमीच विरोधी संंघांना टक्कर देण्यासाठी ओळखला जातो.
जसं की सर्वांनाच माहिती आहे, की ऑस्ट्रेलिया संघाची ताकद नेहमीच त्यांची घातक गोलंदाजी राहिली आहे, जी कोणत्याही संघाच्या फलंदाजी फळीला पव्हेलियनचा रस्ता दाखवू शकते. याच कारणामुळे ऑस्ट्रेलियाने अनेक वर्षांपासून वनडे क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम केला आहे.
अशामध्ये कोणत्याही गोलंदाजासाठी या संघाविरुद्ध शतकी खेळी करणे नक्कीच सोपे काम नाही. भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) एकमेव असा फलंदाज आहे, ज्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक ९ शतके ठोकली आहेत. विराट कोहली व रोहित शर्मानेही प्रत्येकी ८ शतक केली आहेत.
परंतु क्रिकेटच्या इतिहासात असेही काही दिग्गज फलंदाज होते, ज्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध कधीच १०० धावांचा आकडा पार करता आला नाही.
चला तर मग आज आपण या लेखात जाणून घेऊया त्या ४ फलंदाजांबद्दल, ज्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये एकही शतक ठोकता आले नाही.
वनडेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही शतक ठोकता न आलेले ४ दिग्गज फलंदाज- 4 Batsman Never Scored Century Against Australia ODI
४. सुनील गावसकर (भारत)
भारतीय संघाचे माजी सलामीवीर फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या नावावर क्रिकेट इतिहासात अनेक मोठमोठे विक्रम आहेत. विशेषत: त्यांच्या कसोटी कारकीर्दीत त्यांंच्या नावावर ३४ शतके आहेत. गावसकरांनी एकीकडे कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ शतके ठोकली आहेत. परंतु दुसरीकडे वनडेत त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही शतक ठोकता आले नाही.
गावसकरांनी आपल्या कारकीर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध २७ सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी ३६.५२ च्या सरासरीने ८४० धावा केल्या आहेत. त्यादरम्यान त्यांनी ८ अर्धशतके ठोकली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध गावसकरांची सर्वाधिक धावसंख्या ही नाबाद ९२ धावा आहे.
३. राहुल द्रविड (भारत)
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज राहुल द्रविडला (Rahul Dravid) ‘द वॉल’ या नावाने ओळखले जाते. त्याने अनेकवेळा आपल्या शैलीने भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. द्रविडने वनडेत आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४० सामने खेळताना २५.७७ च्या सरासरीने ९२८ धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत द्रविडने ८ अर्धशतके ठोकली आहेत. परंतु त्याला कधीच शतक ठोकता आले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्रविडची सर्वाधिक धावसंख्या ही ८० धावा आहे.
२. ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड)
न्यूझीलंडचा दिग्गज सलामीवीर फलंदाज ब्रेंडन मॅक्युलमलाही (Brendon McCullum) ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत शतक ठोकता आले नाही. त्याने कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ शतके ठोकली आहेत.
मॅक्युलमने आपल्या वनडे कारकीर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २८.७६ च्या सरासरीने ११२२ धावा केल्या आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६ अर्धशतके ठोकली असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची सर्वाधिक धावसंख्या ही ९६ धावा आहे.
१. मोहम्मद अझरूद्दीन (भारत)
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन (Mohammad Azharuddin) यांनादेखील गावसकर आणि द्रविड या भारतीय फलंदाजांप्रमाणे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत शतक ठोकता आले नाही. आपल्या काळातील स्टार फलंदाज असणारे अझरूद्दीन यांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावसंख्या ही ९४ धावा आहे.
त्यांनी वनडेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४३ सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी २८.२८ च्या सरासरीने ९९० धावा केल्या आहेत. त्यात ६ अर्धशतकांचा समावेश आहे.
अन्य खेळाडूंमध्ये माहेला जयवर्धने (५६), जाॅन्टी रोड्स (५५) व रिची रिचर्डसन (५१) सारख्या दिग्गजांनाही ५० पेक्षा अधिक सामने खेळून ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत शतक करता आले नाही.