आयपीएलसह जगभरातील टी२० स्पर्धांमध्ये फलंदाजांचेच वर्चस्व राहिले आहे. परंतु टी२० सारख्या स्पर्धेत गोलंदाजांनीही आपली जबरदस्त कामगिरी केली आहे. जसे फलंदाज एखाद्या संघाला जिंकण्यासाठी जितकं महत्त्वाचे योगदान देतो तितकेच योगदान एक गोलंदाज देखील देतो. परंतु जर संघाची फलंदाजी चांगली असेल आणि गोलंदाजी चांगली नसेल, तर त्या संघाला सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागते.
इंडियन प्रीमियर लीगमधील गोलंदाजांबद्दल विचार केला, तर फ्रँचायझी फलंदाजांव्यतिरिक्त गोलंदाजांवरही तितकीच मोठी बोली लावतात. जेव्हा गोलंदाजांना अनुकूल परिस्थिती नसते, तेव्हा एक चांगला गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून विकेट मिळवतो.
आयपीएलच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत जेव्हा प्रतिकूल परिस्थितीतही गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आणि नियमित अंतराने विकेट घेतल्या.
या लेखात आयपीएलमध्ये १५० किंवा त्याहून अधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंबद्दल चर्चा करूया, तर मग या यादीमध्ये कोणते गोलंदाज आहेत ते जाणून घेऊया.
आयपीएलमध्ये १५० बळी घेणारे हे आहेत ४ गोलंदाज
४. हरभजन सिंग
चेन्नई सुपर किंग्जचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. हरभजन सिंग भारतीय क्रिकेट इतिहासातील दिग्गज फिरकीपटूंपैकी एक आहे.
हरभजन सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रमाणेच आयपीएलमध्येही चमकदार कामगिरी केली आहे. हरभजनचा २००८ ते २०१७ या कालावधीत मुंबई इंडियन्स संघात समावेश होता. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले. यानंतर हरभजन सिंगला तीन वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या संघात स्थान दिले.
हरभजन सिंगने आयपीएलमध्ये आतापर्यंत १६० सामने खेळले असून ७.०५ च्या इकॉनॉमी रेटने त्याने १५० बळी घेतले आहेत. यावेळी २००८ ते २०१७ या वर्षात मुंबईकडून खेळताना त्याने १३६ सामन्यात १२७ बळी तर मागील २ वर्षात चेन्नईकडून खेळताना २४ सामन्यात २३ बळी घेतले आहेत. यावर्षी तो आयपीएलमध्ये काही वयक्तिक कारणामुळे खेळताना दिसत नाही.
३. पीयूष चावला
पीयूष चावला चेन्नई सुपर किंग्जमधील सर्वोत्कृष्ट फिरकीपटू आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या काळापासून चावलाने चमकदार कामगिरी केली आहे. वयाच्या १७ व्या वर्षी बांगलादेशविरूद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा पीयूष चावला आतापर्यंत आयपीएलमध्ये १५० हून अधिक विकेट्स घेणयात यशस्वी झाला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेटच्या बाबतीत चावला तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत १६२ सामने खेळले असून १११.४५ च्या इकॉनॉमी रेटने १५६ बळी घेतले आहेत. यात त्याची सर्वोत्कृष्ठ गोलंदाजी ४/१७ अशी आहे. यंदाही त्याने आतापर्यंत ५ सामन्यातच्या ५ सामन्यात ६ बळी मिळवले आहेत.
२. अमित मिश्रा
अमित मिश्रा आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. त्याने आयपीएल कारकिर्दीत ३ हॅटट्रिक विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये अमित मिश्रा सर्वाधिक विकेटच्या बाबतीत दुसर्या क्रमांकावर आहे.
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्राने आतापर्यंत १५० सामने खेळले आहेत आणि यात १६० बळी घेतले आहेत. त्याने फक्त दिल्ली कॅपिटल्स कडून खेळताना १०० बळी घेतले आहेत. यंदाच्या हंगामात त्याने आतापर्यंत ३ सामन्यात ३ बळी मिळवले आहेत.
१. लसिथ मलिंगा
मुंबई इंडियन्सचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. तो फक्त मुंबई इंडियन संघाचा नाही तर संपूर्ण आयपीएलचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. मलिंगाने आयपीएलमध्ये आतापर्यंत १२२ सामन्यात १९.८० च्या सरासरीने १७० बळी घेतले आहेत. यात त्याची सर्वोत्कृष्ठ गोलंदाजी ५/१३ अशी आहे. तसेच त्याने एका सामन्यात ५ बळी एक वेळा तर ४ बळी ६ वेळा घेतले आहेत. यंदाच्या १३ व्या हंगामात तो काही वयक्तिक कारणास्तव आयपीएलमध्ये खेळताना दिसत नाही.