नवी दिल्ली – दोन वेळा विश्वचषकाला गवसणी घालणारा भारतीय संघ हा एकदिवसीय सामन्यांमध्ये दादा संघ म्हणून ओळखला जातो. भारतीय संघात असलेले अनेक दिग्गज फलंदाज देशोदेशीच्या गोलंदाजांना धडकी भरवतात. त्याचप्रमाणे भारतीय गोलंदाजांपुढेही अनेक देशातील खेळाडूंची अक्षरशः भंबेरी उडत असते.
भारताच्या या प्रतिभावान खेळाडूंनी आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. भारत हा नेहमीच फलंदाजांचा संघ मानला जातो. याचे कारण सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दिन, राहुल द्रविड, वि.वि.एस. लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, विराट कोहली यांसारखे दिग्गज खेळाडू भारताने क्रिकेट जगताला दिले आहे.
मात्र, भारतीय संघात आजपर्यंत अनेक महान गोलंदाज देखील होऊन गेले आहेत किंवा अद्याप संघात आहेत, ज्यांच्या पुढे इतर संघातील फलंदाज नांग्या टाकतात.
भारतीय संघात कपिल देव, बिशन सिंह बेदी, झहीर खान, जसप्रीत बुमराह, हरभजन सिंह, अनिल कुंबळे यांसारखे दिग्गज गोलंदाज होते. तसेच काहीजण आजही क्रिकेट खेळत आहेत. यातील अनेक गोलंदाजांनी आपल्या नावावर काही विक्रम केलेले आहेत. त्यातचे गोलंदाजांना नेहमीच आकर्षण असणाऱ्या ‘हॅट्रिक’ देखील यापैकी अनेकांनी आपल्या खात्यावर जमा केल्या आहेत.
या लेखात आपण महास्पोर्टस् च्या प्रेक्षकांना एकदिवसीय संघातील गोलंदाजांनी केलेल्या अद्भुत कामगिरीची माहिती देणार आहोत. आजवर भारताच्या चार गोलंदाजांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये हॅट्रिक (सलग तीन चेंडूंवर तीन खेळाडूंना बाद करणे) साधण्याची किमया केली आहे. यातील काही खेळाडू हे आता क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. तर काहीजण अद्याप देशासाठी क्रिकेट खेळत आहेत.
१. चेतन शर्मा
एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताकडून हॅट्रिक घेणारा पहिला खेळाडू म्हणून चेतन शर्माचे नाव घेतले जाते. चेतन शर्मा याने 1987 च्या विश्वचषक स्पर्धेत न्युझीलंड संघाविरुद्ध खेळताना हॅट्रिक घेतली होती. विशेष म्हणजे चेतन शर्मा याने ही कामगिरी आपल्याच मायभूमीवर केली आहे. नागपूर येथे झालेल्या या सामन्यात चेतन शर्माने न्युझीलंडच्या केन रुदरफोर्ड, इयान स्मिथ, इवेन चैटफील्ड यांना सलग तीन चेंडूवर तंबूत माघारी धाडले होते.
चेतन शर्मा याने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये एकूण ६५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने ६७ बळी टिपले आहे. २२ धावांवर ३ बळी, ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी राहिली आहे.
२. कपिल देव
भारतीय संघाचे पुर्व कर्णधार कपिल देव यांनी देखील एकदिवसीय सामन्यांमध्ये एक हॅट्रिक आपल्या नावावर केली आहे. 1991 मध्ये श्रीलंकाविरुद्ध कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर झालेल्या सामन्यात कपिल देव यांनी हि कामगिरी केली. रोशन महानमा, रमेश रत्नायके आणि सनथ जयसुर्या या श्रीलंकेच्या तीन मुख्य फलंदाजांना कपिल देव यांनी माघारी धाडले होते. कपिल देव हे त्यावेळी भारतीय संघाकडून हॅट्रिक घेणारे दुसरे गोलंदाज होते.
कपिल देव यांनी आपल्या क्रिकेट करिअरमध्ये एकूण 225 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी एकूण 253 बळी मिळवले आहेत. ४३ धावांच्या मोबदल्यात ५ बळी, ही त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी राहिलेली आहे.
३. कुलदीप यादव
एकदिवसीय सामन्यात भारताकडून दोनवेळा हॅट्रिकची कामगिरी करणारा कुलदिप यादव हा एकमेव खेळाडू आहे. यादवने सर्वात अगोदर २०१७ मध्ये ईडन गार्डन मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात हॅट्रिक घेतली होती. त्यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेड, एश्टन एगर आणि पैट कमिन्स यांना सलग तीन चेंडूत बाद करत तंबूत माघारी धाडले होते. त्यानंतर कुलदीप यादनवे 2019 च्या डिसेंबर महिन्यात अशीच कामगिरी पुन्हा एकदा केली. विशाखापट्टनम येथे वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात यादवने कॅरेबियन संघाच्या शाई होप, जोसन होल्डर आणि अल्जारी जोसेफ यांना बाद केले होते.
कुलदीप यादव हा अजूनही भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. त्याने आतपर्यंत 60 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 104 विकेट आपल्या नावावर जमा केल्या आहेत. तसेच 25 धावा देत 6 गडी बाद, ही त्याची अद्याप सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.
४. मोहम्मद शमी
भारतीय संघात अजूनही खेळत असलेला परंतु एकदिवसीय सामन्यात हॅट्रिकची किमया साधलेला दुसरा खेळाडू म्हणजे मोहम्मद शमी. शमीने 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान संघाविरुद्ध ही विक्रमी कामगिरी केली. अफगाणिस्तान संघाच्या मोहम्मद नबी, आफताब आलम आणि मुजीब र रहमान या खेळाडूंना शमीने सलग तीन चेंडूंवर तंबूची वाट दाखवली होती.
मोहम्मद शमीने आतापर्यंत 77 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 77 सामन्यांमध्ये या जलदगती गोलंदाजाने तब्बल 144 बळी टिपले आहेत. तसेच 69 धावांच्या मोबदल्यात 5 बळी, ही सध्या त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी राहिली आहे.