ईएसपीएन या स्पोर्ट्सच्या संस्थेने जगभरातील १०० प्रसिद्ध खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. गुंतवणूक, सोशल मीडियावरील चाहते आणि सर्च इंजिनवरील लोकप्रियता या वरून ईएसपीएनचे विश्लेषणात्मक संचालक बेन एल्मरयांनी ही १०० खेळाडूंची यादी बनवली आहे. यामध्ये ४ भारतीय खेळाडूंना या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या यादीत स्थान मिळाले आहे. हे सर्व खेळाडू क्रिकेटर्सच आहेत यामध्ये काही नवल नाही.
भारताचा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधार असलेला विराट कोहली तेराव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी तो आठव्या क्रमांकावर होता. त्याच्या पाठोपाठ भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. धोनी या यादीत १५ व्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी तो १४ व्या क्रमांकावर होता. धोनीचा सिनेमा ६१ देशांमध्ये रिलीझ झाला. हा सिनेमा २०१६ मधील सर्वाधिक चाललेल्या सिनेमांपैक्की एक होता.
बाकी दोन भारतीय क्रिकेटर्स जे या यादीत आहेत ते म्हणजे अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणि सुरेश रैना. सुरेश रैना ९५व्या क्रमांकावर आहे तर युवराज ९०व्या क्रमांकावर आहे. भारतासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे. भारतीय उपखंडातील फक्त भारतच या यादीत स्थान मिळवू शकले आहे, बाकी कुठल्याच देशातील क्रिकेटर्सला या यादीत स्थान मिळवता आलेले नाही. भारतीय उपखंडातील बाकी कोणीच या यादीत नाही. विराट त्याच्या गुंतवणुकीतून १७ मिलियन डॉलर्स कमवतो तर त्याच्या सोशल मीडिया वर त्याला ६० मिलियनपेक्षा जास्त चाहते आहेत.
धोनी त्याच्या गुंतवणुकीतून १६ मिलियन डॉलर्स एवढे कमवतो तर त्याच्या सोशल मीडिया वर ३० मिलियनहुन अधिक चाहते आहेत. युवराजच्या सोशल मीडिया वर २० मिलियन चाहते आहेत तर तो १. ३ मिलियन एवढे पैसे गुंतवणुकीतून कमवतो. सुरेश रैनाचे सोशल मीडिया वरील चाहते १० मिलियनच्या घरात आहे तर तो गुंतवणुकीतून ३३९ हजार डॉलर्स कमवतो . रैना आणि युवराज या यादीत नवीन आहेत तर सानिया मिर्झाला या यादीत स्थान मिळवता आलेले नाही.
बाकी खेळाडू
पोर्तुगालच्या स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तो गुंतवणुकीतून ३२ मिलियन कमवतो आणि २५० मिलियन चाहते त्याच्या सोशल मीडियावर आहे. त्यानंतर अमेरिकेचा बास्केटबॉलपट्टू लिबोर्न जेम्स हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोनाल्डोचा प्रतिस्पर्धी मानला जाणारा मेस्सी तिसऱ्या क्रमांकावर आहे. तो दर वर्षी २८ मिलियनची गुंतवणूक करतो.