मुंबई । ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या ५ एकदिवसीय सामन्यांपैकी पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा आज झाली. श्रीलंका दौऱ्यातील संघ बऱ्यापैकी कायम ठेवून उमेश यादव आणि मोहम्मद शमी या खेळाडूंनी भारतीय संघात कमबॅक केले आहे.
या संघातून मुंबईकर शार्दूल ठाकूरला जरी वगळण्यात आले असले तरी ४ महाराष्ट्रीयन खेळाडू या मालिकेत खेळताना दिसतील. या संघात श्रीलंका दौऱ्यात विश्रांती दिलेल्या उमेश यादवला संधी देण्यात आली आहे. नागपूर उमेश यादव हा विदर्भ रणजी संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.
मुंबई रणजी संघातून खेळणारे अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा हे दोन खेळाडू श्रीलंकेपाठोपाठ याही मालिकेत खेळणार आहे. रोहित शर्माची जागा सलामीला निश्चित असून कर्णधार कोहली रहाणेला किती संधी देतो हे लवकरच कळेल.
पुणेकर केदार जाधव हा महाराष्ट्राच्या रणजी संघाचा अविभाज्य भाग आहे. ज्या भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूंसाठी मोठी चढाओढ आहे तेथे हा खेळाडू आपलं स्थान गेले ८-९ महिने राखून आहे. त्यालाही या दौऱ्यात संधी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या सर्व खेळाडूंची वये ही २९च्या पुढे असून रोहित शर्माने यांच्यात सार्वधिक वनडे सामने तर अजिंक्य रहाणेने सार्वधिक कसोटी सामने खेळले आहेत.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघ
विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक फलंदाज), शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, अक्सर पटेल, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहमंद शमी, भुवनेश्वर कुमार