भारतीय संघ आज, 23 जूनला आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाला आहे. भारताचा इंग्लंड दौरा जुलै महिन्यात 3 तारखेपासून सुरु होणार आहे.
या आधी भारत आयर्लंड विरुद्ध अनुक्रमे 27 आणि 29 जूनला दोन टी20 सामने खेळणार आहे.
मागील काही महिन्यांपासुन भारतीय संघाला वनडे क्रिकेटमध्ये 4 क्रमांकावर कोणाला खेळवायचे हा प्रश्न सतावत आहे. या क्रमांकावर अनेक फलंदाजांना संधी मिळाली आहे.
त्यामुळे आता इंग्लंड दौऱ्यात होणाऱ्या वनडे मालिकेत भारत 4 क्रमांकावर कोणाला खेळवणार हे पहावे लागेल. यासाठी भारताकडे 4 पर्याय उपलब्ध आहेत.
1 सुरेश रैना: भारताच्या वनडे संघात जवळ जवळ 3 वर्षांनी पुनरागमन करणारा सुरेश रैना 4 क्रमांकावर खेळण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. अंबाती रायडू फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरल्याने रैनाला भारताच्या वनडे संघात संधी मिळाली.
रैनाने दक्षिण आफ्रिकेतही चांगली कामगिरी करुन टीकाकारांना चांगले प्रत्युत्तर दिले होते. याआधी 2014 मध्ये इंग्लंडला झालेल्या वनडे मालिकेत भारताने विजय मिळवला होता. या विजयात रैनाचा मोलाचा वाटा होता. त्याने 4 सामन्यात 53.33 च्या सरासरीने 160 धावा केल्या होत्या.
यात त्याच्या 1 शतकाचाही समावेश होता. तसेच तो त्या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करण्यामध्ये तो दुसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे त्याला चौथ्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी संधी मिळू शकते.
2 दिनेश कार्तिक: आपल्या चांगल्या कामगिरीने दिनेश कार्तिकने पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन केले आहे. मागील काही महिन्यांपासून त्याची वनडे मध्ये चांगली कामगिरी झाली आहे.
मात्र त्याला आत्तापर्यंत इंग्लंडमध्ये यश मिळालेले नाही. त्याने इंग्लंडमध्ये 7 सामने खेळले आहेत. यात त्याला 11.60 च्या सरासरीने 58 च धावा करता आल्या आहेत. त्यामुळे त्याचा हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न असणार आहे.
तसेच त्याच्या मागील काही सामन्यामच्या चांगल्या कामगिरीमुळे 4 क्रमांकावर खेळण्याची त्याला संधी मिळू शकते.
3 केएल राहुल: यावर्षीचे आयपीएल गाजवणारा केएल राहुलला सलामीला खेळायला मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण शिखर धवन आणि रोहित शर्मा हे मागील काही वर्षांपासून सलामीला खेळत आहेत.
त्यामुळे राहुलला मधल्या फळीत फलंदाजीसाठी संधी मिळू शकते. मागील काही महिन्यांपासून त्याच्याही कामगिरीत सातत्य आहे. यामुळे तोही चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.
4 एमएस धोनी: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा सुद्धा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी चांगला पर्याय आहे. गेल्या एक वर्षापासून त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी असे बऱ्याच क्रिकेट जाणकारांचे मत आहे.
सामना फिनिश करण्यासाठी सध्या भारतीय संघात हार्दीक पंड्या हा अष्टपैलू खेळाडू आहे. तसेच जर धोनी 4 क्रमांकावर खेळायला आला तर त्याला खेळपट्टीनर स्थिर होण्यास वेळ मिळू शकतो. ज्यामुळे भारताची मधली फळी मजबुत होईल. यामुळे त्याचाही चौथ्या क्रमांकासाठी विचार होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या:
–कबड्डीवरुन सेहवाग आणि पाकिस्तानी चाहत्यांचे ट्विटरवर घमासान!
–भारताचा माजी कर्णधार म्हणतो इंग्लंडमध्ये चालणार फिरकीची जादू
–त्या खेळाडूने वनडेत केलीत ११ शतके परंतु कसोटीत एक सामनाही नशिबात नाही!