क्रिकेट इतिहासाची पाने उलगडली तर एक गोष्ट लक्षात येते; ती अशी की, क्रिकेट बनलेच आहे नवनवे विक्रम नोंदवण्यासाठी आणि जुन्या विक्रमांना मोडण्यासाठी. क्रिकेटजगतात नव्याने पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की, आपण क्रिकेटमध्ये नवीन विक्रमांची नोंद करावी. काही महान खेळाडूंनी असे काही विक्रम केले आहेत, जे खूप वर्षांनंतर मोडले गेले किंवा अजूनही अबाधित आहेत.
रोहित शर्माचा वनडेत ३ द्विशतके करण्याचा विश्वविक्रम अजूनही त्याच्याच नावावर आहे. तर, डॉन ब्रॅडमन यांचा कसोेटीत सर्वाधिक ९९.९४च्या सरासरीने फलंदाजी करण्याचा विक्रम अजूनही त्यांच्याच नावावर आहे. शिवाय, १९७९मध्ये विश्वचषकातील एका सामन्यात इंग्लंडने कॅनडाला २७७ चेंडू राखून ८ विकेट्सच्या फरकाने पराभूत केले होते. त्यांचा हा विक्रम गेल्या ४१ वर्षांपासून अबाधित आहे.
पण प्रत्येक विक्रमाबाबत असे घडत नाही. क्रिकेट इतिहासात असेही काही विक्रम आहेत जे एका दिवसात बनले आणि एकाच दिवसात मोडलेही. तर नजर टाकूया, अशा अनोख्या ४ विक्रमांवरती
4 Records Which Were Broken On The Same Day They Were Created
१. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा
७ जून १९७५ रोजी प्रुडेनशियल विश्वचषकातील साखळी फेरीत अ गट आणि ब गट असे मिळून २ सामने झाले होते. अ गटातील सामना प्रथम झाला होता. हा सामना इंग्लंड विरुद्ध भारत संघात झाला होता. या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज डेनिस एमिसने १४७ चेंडूत सर्वाधिक १३७ धावा केल्या होत्या. यासह वनडेत एका सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदला गेला.
एमिसच्या शतकी खेळीमुळे इंग्लंडने भारताला ३३५ धावांचे आव्हान दिले होते. भारताने त्या आव्हानाचा पाठलाग करताना केवळ १३२ धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडने २०२ धावांनी तो सामना खिशात घातला होता.
परंतु, त्याच दिवशी ब गटात न्यूझीलंड आणि पूर्व आफ्रिका संघात दुसरा सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन टर्नर याने सलामीला फलंदाजी करत नाबाद १७१ धावा केल्या. २०१ चेंडूत त्याने सर्वाधिक धावा करत काही तासांमध्येच एमिसचा वनडेत सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता.
टर्नरच्या ऐतिहासिक खेळीमुळे न्यूझीलंडने पूर्व आफ्रिकाला ३१० धावांचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना पूर्व आफ्रिका फक्त १२८ धावा करु शकली होती. त्यामुळे न्यूझीलंडने तो सामना १८१ धावांनी खिशात घातला होता. परंतु एमिसचा विक्रम टर्नर यांनी एका दिवसातच मोडला होता. आता हाच विक्रम वनडेत २६४ धावा करणाऱ्या रोहित शर्माच्या नावावर आहे.
२. महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा
१६ डिसेंबर १९९७ला हिरो होंडा महिला विश्वचषकातील २ सामने पार पडले होते. यातील पहिला सामना पुणे येथे इंग्लंड महिला संघ विरुद्ध आयर्लंड महिला संघात खेळण्यात आला होता. या सामन्यात इंग्लंडची सलामीवीर फलंदाज शार्लेट एडवर्डसने १५५ चेंडूत नाबाद १७३ धावा करत लिसा केटलीचा महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम मोडला होता.
एडवर्डसच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने आयर्लंडला ३२५ धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंड संघ केवळ ११६ धावांवर सर्वबाद झाला आणि इंग्लंड महिला संघाने तो सामना २०८ धावांनी जिंकला.
त्याच दिवशी मुंबई येथे ऑस्ट्रेलिया महिला संघ विरुद्ध डेन्मार्क महिला संघात सामना झाला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार बेलिंडा क्लार्कने सलामीला फलंदाजी करत द्विशतकी खेळी केली होती. १५५ चेंडूत नाबाद २२९ धावांची ऐतिहासिक खेळी तिने खेळली होती. त्यामुळे एका दिवसाच्या आत शार्लेट एडवर्ड्सचा वनडेत सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम तिने आपल्या नावावर केला होता.
क्लार्कच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने डेन्मार्क महिला संघाला ४०३ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, डेन्मार्क संघ केवळ २५.५ षटकात ४९ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने तब्बल ३६३ धावांनी तो सामना खिशात घातला होता. याचबरोबर बेलिंडा क्लार्क ही जगातील पहिली महिला किंवा पुरुष क्रिकेटर ठरली होती, जीने वनडेत द्विशतक केले होते.
३. टी२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वात जलद अर्धशतक
ऑकलंड येथे १० जानेवारी २०१६ला श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड संघात टी २० सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकत सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे फलंदाजी करताना श्रीलंकाच्या एंजेलो मॅथ्यूजने फक्त ४९ चेंडूत ८१ धावा करत टी२०मध्ये तुफानी फटकेबाजी केली होती.
मॅथ्यूजच्या अर्धशतकी खेळीमुळे श्रीलंकेने न्यूझीलंडला १४३ धावांचे आव्हान दिले होते. श्रीलंकाच्या आव्हानाचा पाठलाग न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिलने सलामीला फलंदाजी करत केवळ १७ चेंडूत अर्धशतक केले होते. पुढे २५ चेंडूत ६३ धावांची तूफानी खेळी करत तो बाद झाला. हे न्यूझीलंडकडून सर्वात जलद टी२० अर्धशतक होते.
मात्र, त्याच सामन्यात गप्टिल बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या कॉलिन मुनरोने फक्त १४ चेंडूत ५० धावांची तूफानी खेळी केली आणि गप्टिलच्या नावावर नोंदला गेलला तो विक्रम काही मिनिटात आपल्या नावावर केला. मात्र, गप्टिल आणि मुनरोच्या खेळीमुळे न्यूझीलंडने ६० चेंडू राखून ९ विकेट्सने तो सामना जिंकला होता. केवळ १४ मिनीटांत मुन्रोने न्यूझीलंडकडून जलद अर्धशतकाचा विक्रम आपल्या नावावर केला होता.
४. वनडे क्रिकेटमध्ये सर्वोच्च टीम स्कोर
१२ मार्च २००६ला दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जोहान्सबर्ग येथे पाचवा आणि शेवटचा वनडे सामना पार पडला होता. त्यापुर्वीच्या सामन्यात दोन्ही संघ २-२ ने बरोबरीवर होते. त्यामुळे हा निर्णायक सामना होता.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदीज करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात कर्णधार रिकी पाँटिंगने १६४ धावांची दीडशतकी खेली केली होती. तसेच, मायकल हसीच्या ८१ धावा, सिमन कॅटीचच्या ७९ धावा आणि ऍडम गिलख्रिस्टने ५५ धावांमुळे ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ४ बाद ४३४ धावांचा भलामोठा स्कोर करत इतिहास रचला होता.
यावेळी ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकाचा कर्णधार ग्रीम स्मिथने ९० आणि हर्शल गिब्जने १७५ धावा केल्या होत्या. त्यामुळे ३२व्या षटकापर्यंत संघाच्या २९९ धावा झाल्या होत्या. मात्र २२.१ षटकात स्मिथची विकेट गेली आणि हर्शल गिब्ज ३१.५व्या षटकात बाद झाला. त्यानंतर मार्क बाउचरने नाबाद अर्तशतकी खेळी केली आणि जोहान वान डेरने ताबडतोब ३५ धावा केल्या म्हणून संघाने ४९.५ षटकात ४३८ धावा करत १ चेंडू राखून १ विकेटने तो सामना जिंकला. तसेच, वनडेत सर्वोच्च स्कोर करणाऱ्या संघाचा विक्रमही केवळ ४ तासांत मोडला. सध्या हा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. त्यांनी २०१८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाॅटिंग्घमला ६ बाद ४८१ धावा केल्या होत्या.
ट्रेंडिंग लेख-
असे क्रिकेटर होणे नाही! जखमी अवस्थेत देशासाठी मैदानावर उतरलेले ५ दिग्गज खेळाडू
शत्रूवरदेखील अशी वेळ येऊ नये! ९ तासांत दोन वेळा बाद होणारे ३ संघ
कोहलीला मैदानावर सतत नडणारे ५ गोलंदाज, एक आहे…