सध्या आयपीएल २०२० संयुक्त अरब अमिराती देशात सुरु आहे. शनिवार पहिला सामना झाल्यावर आज अर्थात रविवारी दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज ११ पंजाब संघात झाला. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाला ५ विकेट्सने पराभूत केले.
हे सगळे सुरु असताना इंग्लंड देशात सुरु असलेल्या टी२० ब्लास्ट स्पर्धेच्या शेवटच्या साखळी फेरीतील सामन्यात शाहिन आफ्रिदी या खेळाडूने खास कारनामा केला आहे. हँपशायर विरुद्ध मिडलसेक्स सामन्यात खेळताना या खेळाडूने ४ षटकांत केवळ १९ धावा देत ६ विकेट्स घेतल्या.
त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर हँम्पशायर संघाने द रोझ बाऊल येथे झालेल्या सामन्यात मिडलसेक्सवर २० धावांनी शानदार विजय मिळवला. परंतू या ६ विकेट्स घेताना त्याने अजून एक खास कारनामा केला. त्याने या सामन्यात चक्क ४ चेंडूवर मिडलसेक्सच्या ४ खेळाडूंना तंबूचा रस्ता धरायला लावला. विशेष म्हणजे त्याने या चारही फलंदाजांना त्रिफळाचीत केले. गमतीचा भाग म्हणजे त्याने घेतलेल्या ६ पैकी ६ विकेट्स देखील त्रिफळाचीत होत्या.
त्याने १८व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सिम्सनला त्रिफळाचीत केले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर स्टिवन फिनलाही त्रिफळाचीत केले. पाचव्या चेंडूवर त्याने थिलन वालालाविटाला त्रिफळाचीत केले तर मिडलसेक्स सर्वबाद करताना सहाव्या चेंडूवर मुर्ताघला त्रिफळाचीत केले.
https://twitter.com/hantscricket/status/1307695454629629953
पुरुषांच्या टी२० लीग स्पर्धेत तो ४ चेंडूंवर ४ विकेट्स घेणारा ६वा खेळाडू ठरला आहे. यापुर्वी आंद्रे रसेल (२०१३), अल अमिन हुसेन (२०१३), राशिद खान (२०१९), लसिथ मलिंगा (२०१९) व अभिमन्यू मिथून (२०१९) यांनी हा कारनामना केला आहे.