पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत तिसऱ्या दिवशी दुसऱ्या लढतीत कर्णधार ऋतुराज गायकवाड(नाबाद ६१धावा)याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर ४ एस पुणेरी बाप्पा संघाने पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स संघाचा २२ धावांनी पराभव करून पहिला विजय मिळवला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत पावसाच्या व्यत्ययामुळे दोन्ही संघातील सामना १४ षटकांचा खेळविण्यात आला. ४ एस पुणेरी बाप्पा संघाने पहिल्यांदा खेळताना १४ षटकात ७बाद १४३धावाचे आव्हान उभे केले. वरच्या फळीतील फलंदाज पवन शहा(०), यश क्षीरसागर(५), साहिल औताडे(६), शुभम तैस्वाल(१०) हे झटपट बाद झाल्यामुळे पुणेरी बाप्पा संघ ४बाद ५२ धावा असा बिकट स्थितीत सापडला. कोल्हापूरचा जलदगती गगोलंदाज निहाल तुसामत(३-४१)ने सुरेख गोलंदाजी करत सलामीचे फलदांज लवकर तंबूत परत पाठवले. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या कर्णधार ऋतुराज गायकवाडने अफलातून खेळी करताना ३५ चेंडूत नाबाद ६१ धावा काढून आपले अर्धशतक साजरे केले. यात त्याने ४ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी केली. ऋतुराज व सूरज शिंदे(२४धावा)यांनी चौथ्या गड्यासाठी २८ चेंडूत २७धावांची संयमी भागीदारी केली. संघाची धावगती वाढवण्याच्या ओघात सूरज शिंदेने आक्रमक फटका मारताना यश खळदकरच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. यानंतर ऋतुराज व राहुल देसाई(१९धावा) या जोडीने सहाव्या गड्यासाठी २२ चेंडूत ४५ धावांची भागीदारी करून पुणेरी बाप्पा संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
१४३ धावांचा पाठलाग करताना पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाला २०षटकात ६बाद १२१धावाच करता आल्या. कोल्हापूरच्या हर्ष संघवी व अंकित बावणे या सलामीच्या जोडीने ३४ चेंडूत ५८धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली. यात हर्ष संघवीने १९चेंडूत ५चौकार व २ षटकारासह ३८धावांची आक्रमक खेळी केली. ही भागीदारी डोकेदुखी बनली असतानाच यश क्षीरसागरने हर्ष संघवीला झेल बाद केले. पाठोपाठ अंकित बावणे(२१धावा)ला पियुश साळवीने पायचीत, तर सचिन धस(१)ला रोशन वाघसरेने आपल्या गोलंदाजीवर यष्टीचित बाद करून कोल्हापूर संघाचे आव्हान आणखी बिकट केले. यावेळी विजयासाठी ३९चेंडूत ७३ धावांची आवश्यकता होती. त्यानंतर अनिकेत पोरवाल नाबाद २८, सिद्धार्थ म्हात्रे १४ यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. पुणेरी बाप्पा संघाकडून पियुश साळवी(२-१८), यश क्षीरसागर(१-९), रोशन वाघसरे(१-२२), विवेक शेलार(१-३०), सचिन भोसले(१-३०) यांनी भेदक गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
संक्षिप्त धावफलक:
४ एस पुणेरी बाप्पा: १४ षटकात ७बाद १४३धावा(ऋतुराज गायकवाड नाबाद ६१(३५,४x४, ४x६), सूरज शिंदे २४(१४,१x४,२x६), राहुल देसाई १९, शुभम तैस्वाल १०, निहाल तुसामत ३-४१, श्रेयश चव्हाण २-२५) वि.वि.पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स: १४ षटकात ६बाद १२१धावा(हर्ष संघवी ३८(१९,५x४,२x६), अनिकेत पोरवाल नाबाद २८(१९,३x४), अंकित बावणे २१, सिद्धार्थ म्हात्रे १४, पियुश साळवी २-१८, यश क्षीरसागर १-९, रोशन वाघसरे १-२२, विवेक शेलार १-३०, सचिन भोसले १-३०);सामनावीर – ऋतुराज गायकवाड.
आजचे सामने:
५ जून रत्नागिरी जेट्स वि. छत्रपती संभाजी किंग्ज दु. २ वा
५ जून पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स वि. ईगल नाशिक टायटन्स सायं. ७ वा