इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमद्ये आपल्याला जगभरातील मोठ-मोठे खेळाडू खेळताना दिसतात. कदाचित या कारणामुळेच आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग मानली जाते. पण, जेवढी ही प्रतिष्ठित आहे, तेवढीच ती अवघडदेखील आहे. २०-२० षटकांच्या या स्वरुपात फलंदाज विस्फोटक फलंदाजी करतात. तर, त्यांना अडवण्यासाठी गोलंदाज चतुरतेने गोलंदाजी करतात. अशा संघर्षामुळेच आयपीएलला जगातील सर्व आंतरराष्ट्रीय लीगपैकी सर्वात स्पर्धात्मक लीग म्हटले जाते.
आयपीएलमध्ये अनेक रोमांचक किस्से पाहायला मिळतात. कधी-कधी गोलंदाज फलंदाजाला अडचणीत टाकत असतो. तर, कधी-कधी फलंदाज गोलंदाजांवर भारी पडत असतात. या लेखात अशाच ५ फलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे. जे गोलंदाजांवर इतके भारी पडले की, त्यांनी एका षटकात षटकार-चौकारांचा वर्षाव करत ३० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या. सलग ६ षटकार मारत एखादा फलंदाज एका षटकात जास्तीत जास्त ३६ धावा करु शकतो. पण एका फलंदाजाने तर चक्क एका षटकात ३७ धावा केल्या आहेत.
तर जाणून घेऊया त्या ५ फलंदाजांविषयी- 5 Batsman Who Scored 30 Or More Runs In One Over Of IPl
५. विरेंद्र सेहवाग – (४, ६, ४, ६, ४, ६ – एकूण ३० धावा)
आयपीएलच्या पहिल्याच हंगामात म्हणजे २००८मध्ये हैद्राबाद येथे २२ एप्रिलला डेक्कन चार्जर्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स संघात सामना झाला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डेक्कन चार्जर्सने २० षटकात ८ बाद १४२ धावा केल्या होत्या.
त्यानंतर डेक्कन चार्जर्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली डेअरडेविल्सचा फलंदाज विरंद्र सेहवाग तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. यावेळी त्याने फलंदाजी करताना १३व्या षटकात एकूण ३० धावा केल्या होत्या. ते षटक एंड्रयू सिमंड्स टाकत होता. सेहवागने सिमंड्सच्या ६ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकार मारत या ३० धावा केल्या होत्या. पुढे फलंदाजी करताना सेहवागने फक्त २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.
सेहवागने त्या सामन्यात ४१ चेंडूत ९४ धावा केल्या होत्या. त्यामुळे दिल्ली डेअरडेविल्सने तो सामना ४२ चेंडू राखून ९ विकेट्सने जिंकला होता.
सेहवागने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १०४ सामन्यात २७.५६च्या सरासरीने २७२८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ शतकांचा आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याच्या आयपीएलमधील सर्वाधिक धावा १२२ इतक्या आहेत.
४. शॉन मार्श – (६, ६, ४, ४, ४, ६ – एकूण ३० धावा)
आयपीएल २०११मध्ये धरमशाला येथे १७ मेला किंग्स इलेव्ह पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना झाला होता. या सामन्यात किंग्स इलेव्हन प्रथम फलंदाजी करत असताना, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या शॉन मार्शने सामन्यातील १५व्या षटकात एकूण ३० दावा केल्या होत्या. यात त्याच्या ३ चौकारांचा आणि ३ षटकारांचा समावेश होता. जोहान वान डेर वाथ यावेळी गोलंदाजी करत होता.
शॉनने या सामन्यात ४९ चेंडूत ७९ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर त्याचा संघसहकारी ऍडम गिलख्रिस्टने ५५ चेंडूत १०६ धावा केल्या होत्या. त्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला एकूण २३३ धावांचे भलेमोठे आव्हान दिले होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या आव्हानाचा पाठलाग करताना १७ षटकात १२१ धावांवर सर्वबाद झाला आणि पंजाबने तो सामना १११ धावांनी जिंकला.
शॉनने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ७१ सामन्यात ३९.९५च्या सरासरीने २४७७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या आयपीएलमधील सर्वाधिक धावा ११५ इतक्या आहेत.
३. विराट कोहली – (६, ४, ६, ६, ६, २ – एकूण ३० धावा)
आयपीएल २०१६मध्ये बेंगळुरु येथे १४ मेला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात लायन्स संघात सामना झाला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदाजी केली होती. दरम्यान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शिविल कौशिक सामन्यातील १९ वे षटक टाकत होता. त्याच्या १९व्या षटकातील ६ चेंडूत विराट कोहलीने ४ षटकार, एक चौकार आणि २ धावा घेत एकूण ३० धावा केल्या होत्या.
पुढे विराट ५५ चेंडूत १०९ धावा करत बाद झाला. त्याच्यानंतर फलंदाजी करताना एबी डिविलियर्सने ५२ चेंडूत नाबाद १२९ धावा केल्या होत्या. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने गुजरात लायन्सला २४९ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात लायन्स १८.४ षटकात केवळ १०४ धावांवर सर्वबाद झाला. म्हणून बेंगलोरने तो सामना १४४ धावंच्या फरकाने जिंकला होता.
विराटने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १७७ सामन्यात ३७.८५च्या सरासरीने सर्वाधिक ५४१२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५ शतकांचा आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक ११३ धावा केल्या आहेत.
२. सुरेश रैना – (६, ६, ४, ४, नो बॉल+४, ४, ४ – एकूण ३३ धावा)
३० मे २०१४ला मुंबई येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात क्वालिफायर राउंडमधील दूसरा सामना झाला होता. या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ६ बाद २२६ धावां केल्या होत्या. यात विरेंद्र सेहवागने सलामीला फलंदाजी करताना केलेल्या १२२ धावाचा समावेश होता.
पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा सुरेश रैना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. दरम्यान रैनाने ६व्या षटकात परविंद्र आव्हानाच्या गोलंदाजीवर ३३ धावा केल्या होत्या. यात त्याच्या २ षटकारांचा आणि ४ चौकारांचा समावेश होता. तर, ५व्या चेंडू नो बॉल ठरला होता. त्या चेंडूवरही रैनाने चौकार मारला होता.
मिस्टर आयपीएल रैनाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १९३ सामन्यात ३३.३४च्या सरासरीने ५३६८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे. तर त्याच्या सर्वाधिक धावा या १०० इतक्या आहेत.
१. ख्रिस गेल – (६, नो बॉल+६, ४, ४, ६, ६, ४ – एकूण ३७ धावा)
युनिवर्सल बॉस ख्रिस गेलने ८ मे २०११ बेंगलोर येथे कोची टस्कर्स केरळविरुद्ध खेळताना एका षटकात ३७ धावा करण्याचा कारनामा केला होता. या सामन्यात कोची टस्कर्स केरळने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १२५ धावा केल्या होत्या.
कोची टस्कर्स केरळच्या १२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा ख्रिस गेल सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. यावेळी तिसऱ्या षटकात प्रशांत परमेश्वरमच्या गोलंदाजीवर गेलने हा कारनामा केला होता. त्याने ३ षटकार आणि ३ चौकार मारले होते. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू नो बॉल ठरला आणि त्याच चेंडूवर गेलने षटकार मारला. अशा प्रकारे गेलने एका षटकात सर्वाधिक ३७ धावा केल्या.
गेलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १२५ सामन्यात ४१.१४च्या सरासरीने ४४८४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ६ शतकांचा आणि २८ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, आयपीएलमध्ये त्याचे सर्वश्रेष्ट प्रदर्शन हे १७५ धावा इतके आहे.
ट्रेंडिंग लेख-
क्रिकेटमधील निवृत्तीनंतर देशाचे पंतप्रधान झालेले ५ खेळाडू
एकाच दिवसात बनलेले आणि मोडलेले क्रिकेट इतिहासातील ४ विक्रम, एक तर…
बॅड बाॅय ते क्रिकेटमधील प्रीमियम ऑलराऊंडर, जाणून घ्या ‘बड्डे…