कसोटी क्रिकेटनंतर वनडे आणि त्यानंतर टी२० क्रिकेट अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या ३ स्वरुपांची टप्प्याटप्प्याने सुरुवात झाली. कसोटीत खेळण्यासाठी जशी संयमाची आवश्यकता असते. तशी वनडे आणि टी२०त वेगाने खेळण्याची आवश्यकता असते. त्यामुळे वनडेत षटकार-चौकांराचा वर्षाव होताना पाहणे साहजिक असते.
या लेखात अशाच काही एका-नंतर-एक षटकार मारणाऱ्या फलंदाजांची माहिती देण्यात आली आहे. ज्यांनी वनडे मालिकेतील सर्व सामन्यात मिळून सर्वाधिक षटकार मारण्याचा कारनामा केला आहे.
तर पाहूयात, त्या ५ टॉप फलंदाजंविषयी- 5 Batsman With Most Number Of Sixes In One ODI Series
५. मार्टिन गप्टिल – १९ षटकार
न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिल हा या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. गप्टिलने २०१५-१६मध्ये श्रीलंकाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत सर्वाधिक १९ षटकार मारले होते. गप्टिलने पहिल्या सामन्यात ४, दुसऱ्या सामन्यात ८, तिसऱ्या सामन्यात १, चौथ्या सामन्यात ३ आणि ५व्या सामन्यात ३ असे मिळून एकूण १९ षटकार मारले होते.
वनडेत गप्टिलने आतापर्यंत १८३ सामन्यात ६८४३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १७६ षटकारांचा समावेश आहे.
४. एबी डिविलियर्स – २० षटकार
दक्षिम आफ्रिकाचा माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्स हा २० षटकारांसह या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने २०१५-१६मध्ये भारताविरुद्धच्या ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत हा कारनामा केला होता. डिविलियर्सने अनुक्रमे ६, १, ०, २, ११ षटकार मारत वनडे मालिकेत एकूण २० षटकार मारले होते.
डिविलियर्सने त्याच्या वनडे कारकिर्दीत २२८ सामन्यात ९५७७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २०४ षटकारांचा समावेश आहे.
३. शेन वॉटसन – २० षटकार
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉटसन हा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. वॉटसन हा दमदार अष्टपैलू क्रिकेटपटू होता. त्याने २०११ला बांग्लादेशविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २० षटकार मारले होते. वॉटसनने पहिल्या सामन्यात २, दुसऱ्यात १५ आणि तिसऱ्यात ३ असे मिळून एकूण २० षटकार मारले होते.
वॉटसनने त्याच्या वनडे कारकिर्दीत १९० सामन्यात ५७५७ धावा केल्या होत्या. यात त्याच्या १३१ षटकारांचा समावेश होता.
२. रोहित शर्मा – २३ षटकार
भारताचा हिटमॅन रोहित शर्मा हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजंपैकी एक आहे. त्याने २०१३-१४मद्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ७ सामन्यांच्या वनडे मालिकेत २३ षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. त्याने ७व्या सामन्यात १६ षटकार मारत पूर्ण मालिकेत २३ षटकारांचा आकडा गाठला होता.
रोहितने त्याच्या वनडे कारकिर्दीत २२४ सामन्यात ९११५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २४४ षटकारांचा समावेश आहे.
१. ख्रिस गेल – ३९ षटकार
सिक्सर किंग ख्रिस गेल हा एका वनडे मालिकेत ३९ षटकार मारत अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. त्याने २०१८-१९मधील ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत ४ सामने खेळत हा कारनामा केला होता. गेलने अनुक्रमे १२, ४, १४, ९ षटकार मारत मालिकेत एकूण ३९ षटकार ठोकले होते.
गेलने त्याच्या वनडे कारकिर्दीत ३०० सामन्यात १०४८० धावा केल्या होत्या. यात त्याच्या ३३१ षटकारांचा समावेश आहे.