सलामी फलंदाज हे संघाच्या डावाची चांगली सुरुवात करून देण्यास अत्यंत उपयुक्तता ठरतात. एखाद्या संघाचे सलामीवीर फलंदाज त्या संघाचा महत्वाचा भाग असतो कारण जेव्हा सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात दिली तर संघ मोठी धावसंख्या उभारण्याची अपेक्षा करू शकतो. अशा परिस्थितीत जेव्हा संघाकडून जास्त अपेक्षा केल्या जातात तेव्हा सलामीवीरांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढते.
आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय क्रिकेट संघाकडून अनेक सलामीवीर खेळले आहेत. यापैकी बर्याच भारतीय सलामीवीरांनी स्वतःला क्रिकेट विश्वातील महान फलंदाजांमध्ये सामील केले. तसे, भारताच्या क्रिकेट प्रवासात बरेच सलामीवीर होऊन गेले, परंतु या लेखात भारताच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट ५ सलामीवीरांची ओळख करून घेऊ.
भारतीय क्रिकेट इतिहासातील हे ५ सर्वोत्कृष्ट सलामीवीर
५. सुनील गावस्कर (Sunil Gavaskar)
भारतीय क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांचा विचार केला तर माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. सुनील गावस्कर यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी दीर्घकाळ सलामीवीर म्हणून कामगिरी बजावली आणि कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून भारताकडून सर्वाधिक धावा केल्या.
‘लिटल मास्टर’ सुनील गावस्कर यांची अभूतपूर्व कारकीर्द आहे. ज्यामध्ये त्यांनी कसोटी सामन्यात १०,००० पेक्षा जास्त धावा केल्या तसेच त्यात ३४ शतके केली. त्यांनी वनडे सामन्यातही सलामीला फलंदाजी केली पण त्यात त्यांना जास्त यश मिळवता आले नाही. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सुनील गावस्करांचे नाव नेहमीच उंच असेल. त्यांनी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८६ डावात सलामीला फलंदाजी केली. यात त्यांनी १२२५८ धावा केल्या.
४. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)
भारताचा ‘मास्टर-ब्लास्टर’ फलंदाज सचिन तेंडुलकरला जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखले जाते. सचिन तेंडुलकरने २४ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याची एक उत्तम कारकीर्द आहे. क्रिकेट इतिहासात सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके करणारा सचिन तेंडुलकरनेही सलामीवीर म्हणून भारतासाठी एक उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
सचिन तेंडुलकर कसोटी क्रिकेटमध्ये कमी प्रमाणात सलामीला फलंदाजी केली. पण वनडे क्रिकेटमध्ये तो नियमित सलामी फलंदाज म्हणून बराच काळ दिसला. वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून त्याने भरपूर धावा केल्या. त्याने भारतासाठी सलामीवीर म्हणून मोलाचे योगदान दिले आहे, म्हणूनच तो भारतीय संघातील सर्वोत्कृष्ट सलामीवीर आहे. त्याने आंतरराष्ट्री कारकिर्दीत सलामीवार म्हणून ३४२ डावात फलंदाजी केली. यात त्याने १५३३५ धावा केल्या.
३. सौरव गांगुली (Sourav Ganguly)
भारतीय क्रिकेट संघाचा एक महान कर्णधार सौरव गांगुलीचाही महान फलंदाजांमध्ये समावेश आहे. भारतीय क्रिकेटला जबरदस्त यश मिळवून देणारा कर्णधार म्हणून सौरव गांगुलीचे नाव घेतले जाते. भारतीय संघासाठी वनडे स्वरुपात दीर्घ काळ सलामी फलंदाजीची जबाबदारी त्याने सांभाळली आणि सचिन तेंडुलकरबरोबर सलामीवीर म्हणून सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून ओळखला गेला.
सौरव गांगुलीच्या फलंदाजीचा विचार केला तर ऑफ साइडमध्ये खूप आकर्षक शॉट्स तो खेळायचा. म्हणूनच त्याला क्रिकेट विश्वात ‘लॉर्ड ऑफ ऑफ साइड’ म्हटले जाते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून २३७ डावात सलामीला फलंदाजी केली. यामध्ये त्याने ९१५७ धावा केल्या.
२. रोहित शर्मा (Rohit Sharma)
भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माची स्वतःची एक वेगळी शैली आहे. रोहित शर्माने अतिशय स्फोटक सलामीवीर म्हणून स्थान मिळवले आहे. २००७ मध्ये भारतीय संघात पदार्पणानंतर रोहित शर्माचे संघातील स्थान कायम राहिले नाही. पण त्याला २०१३ मध्ये मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये नियमीत सलामीची जबाबदारी देण्यात आल्यानंतर त्याचा फॉर्म पूर्णपणे बदलला. यानंतर रोहित शर्माने मागे वळून पाहिले नाही आणि ‘हिट मॅन’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
सध्या वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून तो भारतासाठी जबरदस्त कामगिरी करत आहे आणि आता त्याला कसोटीतही नियमीत सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून २२१ डावात सलामीला फलंदाजी करताना १००१७ धावा केल्या आहेत.
१. वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)
भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने क्रिकेट विश्वात सलामीवीराची व्याख्याच बदलली. कसोटी आणि वनडे दोन्ही प्रकारांमध्ये तुफानी फलंदाजीचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे.
वीरेंद्र सेहवागने आपल्या फलंदाजीने संपूर्ण क्रिकेट जगातील सर्वात उत्कृष्ट सलामीवीरांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्याने कारकिर्दीची सुरुवात सलामीवीर म्हणून केली नव्हती, परंतु संघातील काही परिस्थितीमुळे तो सलामीवीर बनला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही व तो भारताचा सर्वोत्कृष्ट सलामीवीर ठरला. तो भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर आहे. त्याने ३८८ डावात १५७५८ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२० मध्ये ह्या ५ अष्टपैलू खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष
क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक चर्चा होणारी कसोटी मालिका अर्थातच ऍशेज
या ५ घटनांवेळी भारतीय क्रिकेटपटू आपले अश्रू रोखू शकले नाहीत
महत्त्वाच्या बातम्या –
६ वर्षांपासून आयपीएलमध्ये न खेळणाऱ्या पुजाराच्या नावावर आहे हा मोठा विक्रम; विराट- रोहितही आहेत मागे
दिग्गज म्हणतोय, या गोलंदाजांमध्ये दिसतोय वकार, वसीमची आक्रमकता
५ वर्षांपुर्वी बेन स्टोक्सने टाकलेल्या ‘त्या’ एका चेंडूची जगाने घेतली दखल