वर्ल्ड् अँटिंडोपिंग एजन्सी अर्थात वाडाने त्यांच्या पुस्तकात डोपिंगची व्याख्या अतिशय विस्तृत स्वरुपात लिहीली आहे. यात स्टेराॅईड किंवा अन्य औषधे ज्यांच्यामुळे कामगिरीत सुधारणा होते याची भलीमोठी यादी दिली आहे.
याचमुळे वाडा कधीही कोणत्याही खेळाडूची डोपिंग टेस्ट घेत असते. डोपिंग टेस्टमध्ये फेल झालेल्या अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीची पुढे वाट लागली आहे तर खूपच कमी खेळाडू त्यातून बंदीचा काळ पुर्ण करुन पुढे चांगले खेळले आहेत.
क्रिकेटला कायमच सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून जगभरात ओळखले जाते. परंतु काही असेही खेळाडू आहेत जे डोपिंगमध्ये आजपर्यंत फेल ठरले आहेत. काही खेळाडूंनी यात खेळात सुधारणा करण्यासाठी ड्रग्ज घेतल्याचे समोर आले होते. या लेखात अशाच खेळाडूंची आपण माहिती करुन घेणार आहोत.
५. मोहम्मद असिफ
एकेवेळी पाकिस्तानमधून आलेला मोहम्मद असिफ हा गोलंदाज जागतिक क्रिकेटमध्ये राज्य करेल असे बोलले जात होते. परंतु चांगल्या कामगिरीबरोबर त्याचे नाव पुढे अनेक चुकिच्या गोष्टींसाठी घेतले गेले.
पहिल्यांदा २००६मध्ये शोएब अख्तरसह त्याच्यावर बंदी आली होती. तेव्हा त्यावर १ वर्षांचा छोटी बंदी टाकण्यात आली होती. कारण तेव्हा एक बंदी घातलेले औषध घेण्यापासून त्याला संघाचे फिजीओ यांनी थांबवले होते.
त्यानंतर त्याला २००८मध्ये पाकिटात ड्रग्ज घेऊन जाताना दुबई विमानतळावर पकडले होते. त्यानंतर दुबईवरुन पाकिस्तानला आल्यावर लगेच आयपीएल कमिटीने तो डोपिंगमध्ये सापडल्याचे सांगितले व त्यावर स्पर्धेत खेळण्यावर बंदी घातली होती.
४. उपुल थरंगा
जे खेळाडू अतिशय कमी सुविधा किंवा डोपिंगबद्दल जनजागृती असलेल्या देशांमधून येतात, त्यांच्याबद्दल डोपिंगच्या अनेक समस्या उभ्या राहतात. याचाच फटका श्रीलंकेचा माजी कर्णधार उपुल थरंगाही बसला होता. २०११मध्ये पाठीच्या दुखण्यामुळे त्याने काही हर्बल औषधे घेतली होती.
जेव्हा त्याची डोपिंग चाचणी झाली तेव्हा त्याच्या शरीरात prednisone व prednisolone ही बंदी असलेली औषधे सापडली. तेव्हा २६ वर्षांच्या असलेल्या थरंगाने हे मान्य करताना आपण पाठदुखीसाठी केल्याचे कबूल केले होते.
त्यावेळी अँटीडोपिंग समितीने थरंगाने सांगितलेल्या गोष्टी मान्य केल्या. परंतु तो अँटीडोपिंग समितीने त्यावर ऑगस्ट २०११पर्यंत ३ महिन्यांची बंदी घातली होती.
३. स्टिफन फ्लेमिंग
जर क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ असेल तर त्यात स्टिफन फ्लेमिंगचे नाव बरेच वर येते. त्याने न्यूझीलंड संघाला घडविताना घेतलेले कष्ट सहसा विसरता येणार नाही. न्यूझीलंडचा एक यशस्वी कर्णधार म्हणूनही त्याकडे पाहिले जाते.
या यादीत जरी त्याचे नाव असले तरी त्याने कामगिरी सुधारण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी ड्रॅग्ज घेतले नव्हते. मोकळ्या वेळेत काही संघसहकाऱ्यांबरोबर स्मोकिंग पाॅट (गांजा घेताना) त्याला पकडले होते. १९९३-९४ हंगामादरम्यान ही घटना घडली होती. या घटनेमुळे फ्लेमिंगची कारकिर्द धोक्यात आली होती.
त्यानंतर फ्लेमिंगला १७५ डाॅलरचा दंड केला होता. त्याबरोबर असलेल्या डायन नॅश व मेथ्थ्यु हार्टलाही हा दंड ठोठविण्यात आला होता. परंतु ही कायदेशीर लढाई लढताना फ्लेमिंगचे १० हजार डाॅलर तर गेलेच परंतु त्याला काही स्पाॅंन्सरशीपपासूनही हात धुवावा लागला होता. तेव्हा त्या तीनही खेळाडूंवर तीन सामन्यांची बंदी घालण्यात आली होती.
२. शोएब अख्तर
अनेक वेळा खेळाडू हे दुखापत किंवा कामगिरी वाढविण्यासाठी स्टेराॅईड किंवा ड्रग्ज घेतात. वेगवान गोलंदाजांच्या तर दुखापत पाचवीलाच पुजलेली असते.
क्रिकेट जगतातील आणखी एक ‘बॅड बाॅय’ म्हणून ओळख असलेला खेळाडू म्हणजे शोएब अख्तर. याच शोएब अख्तरवर २०१६ चॅम्पियन्स ट्राॅफी दरम्यान बंदी आली होती. तो अॅनाबोलिक स्टेराॅईड घेतल्यामुळे चाचणीत दोषी आढळला होता. त्यामुळे त्याला पाकिस्तानच्या संघातून काढून टाकण्यात आले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या तीन सदस्यीय समितीने त्यावर दोन वर्षांची बंदी घातली होती.
यातील एका समिती सदस्याने सांगितले होते की, शोएबने समितीपुढे सांगितले की त्याने हाय पोंटेंशियल डायट घेतले होते, ज्यामध्ये बीफ, चिकन व अन्य डायट सप्लिमेंट होत्या. शिवाय त्याने हकिम (वैद्याकडून)कडून काही हर्बल औषधेही घेतली होती. परंतु तो हे सगळं सिद्ध करु शकला नाही.
१. शेन वाॅर्न
महान फिरकीपटू म्हणून ओळख असलेला शेन वाॅर्न हा ऑस्ट्रेलिया संघातील एकेकाळचा सर्वात मोठा तारा होता. तो आपल्या फिरकीवर जगभरातील कोणत्याही गोलंदाजांना अक्षरशा नाचवत असे. वाॅर्नची आकडेवारी ही त्याची महानता सांगणारी आहे.
परंतु एकेवेळी या खेळाडूला क्रिकेट विश्वातील ‘बॅड बाॅय’ म्हणून ओळखले जात होते. तो सतत वादाच्या भोवऱ्यात सापडतं असे. अगदी आताही शेन वाॅर्न काही ना काही वादात असतोच.
२००३ क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेसोबत होणार होता. परंतु या सामन्यापुर्वीच वाॅर्नला मायदेशी पाठविण्यात आले होते. तेव्हा तो एक बंदी घातलेलं औषध घेतल्यामुळे दोषी ठरला होता.
त्याच्या आईने त्याला वजन कमी करण्यासाठी हे औषध दिल्याचे तेव्हा वाॅर्नने सांगितले होते. त्यानंतर त्याने २००४मध्ये क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याच्यावर तब्बल १२ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. २००७ मध्ये त्याने क्रिकेटला अलविदा केला.