क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारात शतक करणे हे फलंदाजासाठी खास असते. पण अनेकदा कसोटीपेक्षा वनडेमध्ये मधल्या फळीतील फलंदाजांसाठी शतक करणे अवघड असते. कारण वनडेमध्ये षटकांची मर्यादा असते. अनेकदा फलंदाज नव्वदीच्या घरात पोहचून नाबाद राहतात. आत्तापर्यंत वनडेमध्ये १५ खेळाडू वनडेमध्ये ९९ धावांवर नाबाद राहिले आहेत. त्यांच्यातील काही नावाजलेल्या फलंदाजांचा घेतलेला हा आढावा –
वनडेत ९९ धावांवर नाबाद राहणारे ५ फलंदाज –
१. डिन जोन्स –
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डिन जोन जोन्स वनडे क्रिकेटमध्ये एकदा ९९ धावांवर नाबाद राहिले होते. ते १९८५ ला श्रीलंंकेविरुद्ध विश्वचषकातील सामना खेळताना ९९ धावावंर नाबाद राहिले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली होती. त्यावेळी जोन्स तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आले होते. त्यांनी ७७ चेंडूत नाबाद ९९ धावा केल्या होत्या. या खेळीत त्यांनी ४ चौकार आणि ३ षटकार मारले होते.
ऑस्ट्रेलियाकडून या सामन्यात कर्णधार ऍलेन बॉर्डरने ८८ चेंडूत नाबाद ११८ धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला ३२४ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव ९१ धावांवर संपुष्टात आला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने २३२ धावांनी विजय मिळवला होता.
२. अँडी फ्लॉवर –
झिम्बाब्वेचे सर्वाधिक धावा करणारे फलंदाज अँडी फ्लॉवर त्यांच्या वनडे कारकिर्दीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध ९९ धावांवर नाबाद राहिले आहेत. ते २४ ऑक्टोबर १९९९ ला हरारे येथे झालेल्या वनडे सामन्यात १११ चेंडूत ९९ धावा करुन नाबाद राहिले होते. त्यांनी या खेळीत ७ चौकार आणि २ षटकार मारले होते.
या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी केली होती. फ्लॉवर त्यावेळी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आले होते. त्या सामन्यात फ्लॉवर यांच्या खेळीमुळे झिम्बाब्वेला २०० ची धावसंख्या गाठता आली होती. त्यानंतर २०१ धावांचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने १ विकेट गमावत यशस्वी केला होता.
३. मोहम्मद युसुफ –
पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद युसुफही या यादीत सामील आहे. तो २००७ ला पाकिस्तानने केलेल्या भारत दौऱ्यातील चौथ्या वनडे सामन्यात ९९ धावांवर नाबाद राहिला होता. ग्वाल्हेर येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २५५ धावा केल्या होत्या.
त्यांच्याकडून युसुफने १०४ चेंडूत नाबाद ९९ धावा केल्या होत्या. पाकिस्तानच्या डावातील ही सर्वाधिक धावांची खेळी होती. भारताने या सामन्यात २५६ धावांचा पाठलाग ४६.३ षटकात यशस्वी पार केला होता. त्या सामन्यात सचिन तेंडुलकर ९७ धावांवर बाद झाला होता.
४. मायकल क्लार्क –
ऑस्ट्रेलियाला २०१५ च्या विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार मायकल क्लार्कही त्याच्या कारकिर्दीत वनेडेमध्ये एकदा ९९ धावांवर बाद झाला आहे. तो इंग्लंडविरुद्ध २०१० ला द ओव्हल मैदानावर खेळताना १०६ चेंडूत ९९ धावा करुन नाबाद राहिला होता.
या सामन्यात क्लार्कबरोबरच पाँटिग ९२ धावांवर बाद झाला होता. या दोघांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला २९१ धावांचे आव्हान दिले होते. पण इंग्लंडला २१२ धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ७८ धावांनी विजय मिळवला होता.
५. विरेंद्र सेहवाग –
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागही वनडेत ९९ धावांवर नाबाद राहणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आहे. ऑगस्ट २०१० ला डम्बुला येथे श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात तो ९९ धावांवर नाबाद राहिला होता. त्यावेळी तो १०० चेंडूत ९९ धावांवर नाबाद राहिला होता. त्यावेळी हा सामना थोडा वादग्रस्त ठरला होता.
झाले असे की श्रीलंकेने भारताला १७१ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करत असताना भारताला १ धावांची गरज होती आणि सेहवाग ९९ धावांवर खेळत होता. तसेच जवळजवळ १४ षटके बाकी होती. त्यावेळी सुरज रणदीवने पुढचा चेंडू नो बॉल टाकला. सेहवागनेही षटकार खेचला. मात्र नो बॉल असल्याने भारत तर जिंकला मात्र सेहवागचे शतक हुकले. याबद्दल सेहवाग प्रचंड चिडला. त्याने रणदीववर मुद्दाम नो बॉल टाकला असल्याचा आरोप केला होता. पुढे रणदीवला दिलशानने नो बॉल टाकायला सांगितलं असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर आयसीसीकडून कारवाई देखील केली गेली होती. (5 batsmen not out for 99 in ODIs)
ट्रेंडिंग घडामोडी –
धोनी होण्याची स्वप्न घेऊन आलेले ३ भारतीय क्रिकेटपटू
पाकिस्तानचा महान गोलंदाज म्हणतोय, हा भारतीय क्रिकेटपटू मला मोठ्या भावासारखा
नसंल जमतं तर किराणा मालाची दुकान टाका, पण क्रिकेट सोडा