शाळेत प्रवेश घेताना काही आई- वडील आपल्या पाल्याचे खरे वय लपवतात. यामुळे त्या मुलाला भविष्यात फायदा मिळतो. क्रिकेटमध्येही खूपवेळा वय लपवण्याच्या घटना झालेल्या आहेत. क्रिकेट जगतात बरेच खेळाडू आहेत, ज्यांच्यावर वयात फेरफारीचे आरोप लागले आहेत.
वयात फेरफार प्रकरणाचा विषय चर्चेला येतो, तेव्हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद अाफ्रिदीचे नाव सर्वात अगोदर येते. विनोदाने असे म्हटले जाते, की आफ्रिदी अजून सोळाच वर्षांचा आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का?, की भारताच्या खेळाडूंवर वय लपवण्याचे आरोप लागले आहेत.
आपण आज या लेखात त्या ५ भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्यावर वयचोरीचे आरोप लावण्यात आले आहेत.
वयात फेरफार करणारे ५ भारतीय खेळाडू- 5 Indian Cricketers Age Fraud
१. नितीश राणा
भारतीय क्रिकेट चाहत्यांना नितीश राणा (Nitish Rana) ओळखीचे नाव आहे. राणाचे नाव वय लपवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आले. राणाच्या चाहत्यांना तेव्हा धक्काच बसला, जेव्हा २०१५ साली वयात फेरफार केल्याप्रकरणी २३ खेळाडूंच्या यादीत त्याचेही नाव आले होते. दिल्ली क्रिकेट संघाचा नियमित सदस्य असणाऱ्या राणाला याप्रकरणी बंदीला सामोरे जावे लागले होते. अजून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
राणा मधल्या फळीतील फलंदाज आहे. राणाने ३८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २२६६ धावा केल्या आहेत. अ दर्जाच्या ५१ सामन्यांमध्ये १५४२ धावा राणाच्या नावावर आहेत.
राणाने बंदीनंतर आकर्षक फलंदाजीच्या जोरावर संघात पुनरागमन करून भारतीय संघाचे दरवाजे ठोठावले. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा राणा नियमित सदस्य आहे. सध्या त्याचे वय २६ वर्ष आहे.
२. मनजोत कालरा
पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. विजयी संघातील स्टार खेळाडू मनजोत कालराने (Manjot Kalra) आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. मनजोतने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध नाबाद शतकी खेळी केली होती. यानंतर २०१८ च्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सने मनजोतला संघात सामील केले. पण अंतिम अकरात त्याला एकदाही संधी मिळाली नाही.
मनजोत वयात फेरफार केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. त्याने जी जन्मतारीख सांगितली आणि पोलिस तपासात निष्पन्न झालेली जन्मतारीख यामध्ये एका वर्षाची तफावत आहे. मनजोतला बीसीसीआयने २०१७ मध्ये सूट दिली होती. पण अन्य नाराज क्रिकेटपटूंच्या पालकांनी हे प्रकरण लावून धरल्याने व पोलिस तपासातही दोषी आढळल्याने दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) मनजोतला वयोगटातील क्रिकेट खेळण्यास बंदी घातली आहे.
मनजोतच्या आई- वडिलांनी जन्मतारखेबाबत चुकीची माहिती दिल्याने त्यांच्यावरही दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. सध्या मनज्योतचे वय २१ वर्ष आहे.
३. अंकित बावणे
भारताने २०१२ साली उन्मुक्त चंदच्या नेतृत्त्वाखाली अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारत १९ वर्षांखालील विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी देशभरात सर्वत्र उन्मुक्तच्या नावाची चर्चा होती.
महाराष्ट्राचा अंकित बावणे (Ankit Bawne) उन्मुक्तऐवजी १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व करणार होता. पण सप्टेंबर २०११ मध्ये वयात फेरफार केल्याप्रकरणी त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. अंकितच्या पासपोर्टवरील जन्मतारीख आणि जन्म प्रमाणपत्रावरील जन्मतारीख व बीसीसीआयकडे नोंद असलेल्या तारखेत तफावत होती, तेव्हा ही फसवणूक उघडकीस आली. अंकितची अधिकृत जन्मतारीख १७ डिसेंबर १९९२ आहे, तर पासपोर्टवरील जन्मतारीख १ सप्टेंबर १९९२ होती.
एजंटच्या चुकीमुळे हे प्रकरण घडल्याचे अंकितने सांगितले. पण निवडसमिती कोणताही धोका स्वीकारण्यास तयार नव्हती. अंकितला संघातून वगळून उन्मुक्तकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. अंकित विरोधात कोणतीही बंदीची कारवाई करण्यात आली नाही. सध्या अंकितचे वय २७ वर्ष असून हा प्रतिभावान क्रिकेटपटू टीम इंडियाकडून संधीची वाट पाहत आहे.
४. रसिख सलाम
जम्मू- काश्मीरचा जलदगती गोलंदाज रसिख सलामला (Rasikh Salam) आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने गेल्या हंगामात संघात सामील केले होते. २० लाख रूपयांची बोली लावून संघात केलेल्या रसिखला फक्त एकाच सामन्यात संधी मिळाली होती. वय फक्त १७ वर्ष असल्याने रसिख थोड्याच काळात प्रकाशझोतात आला होता. पण त्याच्या वयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
काही दिवसांनंतर रसिखची दोन वेगवेगळी जन्मप्रमाणपत्रे समोर आली. यात त्याचे वय २१ वर्ष असल्याचे समोर आले. रसिखवर बीसीसीआयकडून वय चोरीचा ठपका ठेवण्यात आला.
बीसीसीआयने दोषी आढळल्यानंतर रसिखवर २ वर्षांची बंदी घातली. इएसपीएन वेबसाईटनुसार रसिखचे सध्याचे वय १९ वर्ष आहे.
५. प्रिंस राम निवास यादव
दिल्लीचा १९ वर्षांखालील क्रिकेटपटू प्रिंस राम निवास यादववर (Prince Ram Niwas Yadav) वयात फेरफार केल्याप्रकरणी बीसीसीआयने दोन वर्षांची बंदी घातली आहे. दिल्ली क्रिकेट वर्तुळातील हे दुसरे प्रकरण होते.
बीसीसीआयने सीबीएसईकडून प्राप्त केलेल्या जन्मप्रमाणपत्रानुसार प्रिंसची जन्मतारीख १० जून १९९६ आहे. प्रिंसने सादर केलेल्या जन्मप्रमाणपत्रानुसार त्याची जन्मतारीख १२ डिसेंबर २००१ होती.
ट्रेंडिंग लेख-
-२० जून का आहे भारतीय क्रिकेटसाठी सर्वात खास? घ्या जाणून
-जेव्हा १७ वर्षांपुर्वी दु:खात आख्खा देश झाला होता लाॅकडाऊन
-गोष्ट अशा व्यक्तीची, ज्याने सचिनला एका रात्रीत बनवले करोडपती