2024 हे क्रिकेटपटूंच्या निवृत्तीचं वर्ष राहिलं आहे. या वर्षात अनेक दिग्गजांनी या सुंदर खेळाला कायमचा रामराम ठोकला. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा सारख्या खेळाडूंनी टी20 क्रिकेटला अलविदा केला. तर काही खेळाडूंनी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा भारतीय क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी यावर्षी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे.
(1) शिखर धवन – भारताचा दिग्गज सलामीवीर शिखर धवन यानं 24 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. धवनला ‘मिस्टर आयसीसी’ म्हणून ओळखलं जायचं. आयसीसी स्पर्धांमध्ये नेहमीच त्याची कामगिरी शानदार राहिली आहे. या डावखुऱ्या सलामीवीरानं भारतासाठी 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी20 सामने खेळले. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्यानं एकूण 10,867 धावा ठोकल्या आहेत.
(2) केदार जाधव – उजव्या हाताचा फलंदाज आणि कामचलाऊ फिरकीपटू केदार जाधव यानं यावर्षी त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला पूर्णविराम दिला. त्यानं जूनमध्ये निवृत्तीची घोषणा केली होती. 39 वर्षीय केदारनं भारतासाठी 73 एकदिवसीय आणि 9 टी20 सामने खेळले आहेत.
(3) दिनेश कार्तिक – दिनेश कार्तिकचं आंतराष्ट्रीय पदार्पण महेंद्रसिंह धोनीच्या आधी झालं होतं. मात्र धोनीच्या उपस्थितीमुळे त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत. कार्तिकनं 1 जून रोजी आपल्या वाढदिवशी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. या यष्टीरक्षक फलंदाजानं भारतासाठी 26 कसोटी, 94 एकदिवसीय आणि 60 टी20 सामने खेळले.
(4) वरुण ॲरोन – वेगवान गोलंदाज वरुण ॲरोन एकेकाळी त्याच्या वेगानं विरोधी फलंदाजांना हैराण करण्यासाठी ओळखला जायचा. मात्र दुखापतींमुळे तो जास्त क्रिकेट खेळू शकला नाही. ॲरोननं यावर्षी फेब्रुवारीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानं आपल्या कारकीर्दीत 9 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामने खेळले.
(5) सौरभ तिवारी – सौरभ तिवारीची तुलना एकेकाळी महेंद्रसिंह धोनीशी केली जायची. मात्र त्याला भारतासाठी केवळ 3 एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली. 34 वर्षीय तिवारीनं यावर्षी फेब्रुवारीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
हेही वाचा –
“शिखर, तू नेहमीच आठवणीत राहणार”, गब्बरसाठी क्रिकेटच्या देवाचा खास मॅसेज
जो रूटने मोडला राहुल द्रविड-ॲलन बॉर्डरचा मोठा विक्रम, लवकरच रचणार इतिहास
“हा खेळाडू भविष्यात रविचंद्रन अश्विनसाठी योग्य पर्याय…”, माजी क्रिकेटपटूचा मोठा अंदाज