प्रशिक्षक आणि कर्णधार यांचे क्रिकेट मैदानावरील वाद होणे हे क्रिकेटमध्ये नवीन नाही. असे बरेच प्रसंग आजपर्यंत घडले आहेत. प्रत्येक प्रशिक्षकाची एक वेगळी शैली असते, तशी ती कर्णधाराचीही असते. अनेक वेळा ही भट्टी जमून येते तर कधी कधी ती जमतंही नाही. जेव्हा भट्टी जमून येते, तेव्हा संघ निश्चितच चांगली कामगिरी करत असतो, तर भट्टी जमली नाही तर त्याचे परिणाम संघाला भोगावे लागतात.
अगदी उदाहरणच घ्यायचं झालं तर भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील मतभेद ही एक अशीच घटना आहे, जेथे प्रशिक्षक व कर्णधार यांच्यात भट्टी जमलीच नाही व संघ दोन गटांत विभागला गेला.
केवळ भारतीय क्रिकेटच नाही तर जगातील अनेक क्रिकेट संघात प्रशिक्षक व कर्णधार यांच्यात अशा घटना याआधीही घडल्या आहेत.
या लेखात आपण प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यात झालेल्या वादाच्या ५ घटनांचा आढावा घेणार आहोत, ज्याने क्रिकेटविश्वात खळबळ उडवून दिली होती.
१. सौरव गांगुली आणि ग्रेग चॅपेल
ग्रेग चॅपेल (Greg Chappell) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची नावे घेतली की सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांना सर्वात प्रथम आठवते २००७ मधील विश्वचषक स्पर्धा. ग्रेग चॅपेल ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे एक महान खेळाडू आहेत. परंतु जेव्हा भारतीय क्रिकेट बोर्डाने त्यांना भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडले तेव्हापासून त्यांच्यात आणि संघातील वरिष्ठ खेळाडूंमध्ये योग्य समन्वय बसत नव्हता.
चॅपेल प्रशिक्षक झाल्यानंतर त्यांनी गांगुलीला कर्णधारपद सोडायला आणि फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायला सांगितले. गांगुलीने दोन वर्षे कसोटी शतक ठोकले नव्हते, त्यामुळे तो चॅपेल यांच्या मताशी सहमत झाला. पण त्यानंतर गांगुली संघात राहण्यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले. परंतु, परिस्तिथी तेव्हा बिकट झाली जेव्हा एक ईमेल लीक झाला. ज्यामध्ये चॅपेल यांनी बीसीसीआयला सांगितले की, गांगुली कर्णधारपद पुन्हा घेण्याचे प्रयत्न करीत आहे.
२००७ च्या विश्वचषकात लाजिरवाण्या पराभवामुळे चॅपेलचा यांचा करार संपुष्टात करण्यात आला.
२. सचिन तेंडुलकर आणि कपिल देव
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि कपिल देव (Kapil Dev) हे भारतीय क्रिकेट इतिहासातील दोन दिग्गद खेळाडू. या दोन खेळाडूंएवढं यश कोणीही गाठले नसेल. कपिल देव हा तोच कर्णधार आहे ज्याने टीम इंडियाला पहिला विश्वचषक (१९८३) जिंकून दिला होता आणि सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये जवळपास सर्वच विक्रम नोंदवले आहेत.
१९९९ मध्ये सचिनच्या कर्णधारपदाच्या दुसऱ्या दौऱ्या वेळी कपिल देव यांची प्रशिक्षक म्हणून निवड झाली होती. पण या दोन भारतीय दिग्गजांमध्ये यादरम्यान क्रिकेट मैदानावर एकमेकांशी कधीच चांगला ताळमेळ बसू शकला नाही.
कपिल देव यांच्या नेतृत्वात (प्रशिक्षणात) टीम इंडियाने ऑस्ट्रेलियामध्ये ०-३ अशी मालिका गमावली. त्यानंतर २००० मध्ये जेव्हा संघामध्ये मॅच फिक्सिंगचे वारे वाहू लागले, तेव्हा कपिल देव यांचा प्रशिक्षणाचा प्रवास संपला. सचिनने त्याच्या ऑटो बायोग्राफीमध्येही हा मुद्दा उपस्थित केला आणि लिहिले की,
“कपिल देव हे भारतासाठी क्रिकेट खेळणार्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहेत. संघाच्या यशामध्ये प्रशिक्षकाची भूमिका ही सर्वात महत्वाची आहे. असा माझा नेहमीच विश्वास आहे. परंतु, ऑस्ट्रेलियाच्या कठीण दौर्यावर कपिल देव यांच्या पेक्षा कोण चांगला प्रशिक्षक असेल असं वाटलंच नव्हतं, परंतु त्यांच्या सूचनेत मला काही विशेष दिसले नाही आणि सर्व कठीण निर्णय घेण्याचा भार कर्णधाराला सहन करावा लागला.”
कपिल देव यांना या विषयावर विचारले असता ते म्हणाले की, “या संपूर्ण प्रकरणावर मला काही सांगायचे नाही, ते त्याचे वैयक्तिक मत आहे आणि मी त्याचा आदर करतो.”
३. केविन पीटरसन आणि पीटर मूर्स
केविन पीटरसन (Kevin Pietersen) हा इंग्लंडचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. पीटरसनच्या वादळी भूमिकेमुळे इंग्लंडला एकमेव आयसीसीची स्पर्धा तेव्हा जिंकता आली, जेव्हा पॉल कॉलिंगवूड (Paul David Collingwood) याच्या नेतृत्वात संघाने २०१० मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकात केविन पीटरसन “मॅन ऑफ द टूर्नामेंट” ठरला होता.
पीटरसनलाही संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते, परंतु त्यावेळी टीमचे मुख्य प्रशिक्षक पीटर मूर्स (Peter Moores) यांच्याशी त्याचे संबंध काही खास नव्हते. इंग्लंड संघाने एशेज मालिका ०-५ ने गमावल्यानंतर आणि विश्वचषक २००७ मध्ये सुपर ८ मधून बाहेर झाल्यावर डंकन फ्लेचर (Duncan Fletcher) यांची जागा पीटर मूर्स यांनी घेतली होती.
पीटरसनने कर्णधारपद स्वीकारल्यानंतर पहिला दौरा भारताचा होता. तेथे ७ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाकडून त्यांना ०-५ असा पराभव पत्करावा लागला होता तर कसोटी मालिकेत ०-१ ने पराभव स्वीकारावा लागला होता.
त्यानंतर पीटरसनने पीटर मूर्सच्या जागी ऑस्टेलियातील महान खेळाडू शेन वॉर्न (Shane Warne) याची नेमणूक करण्याची शिफारस केली होती. पण यानंतर पीटरसनने माध्यमांसमोर सांगितले की, संघाच्या हितासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आणि पीटर मूर्स यांना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या पदावरून काढून टाकले होते.
४. गौतम गंभीर आणि के.पी. भास्कर
टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने टीम इंडियाला एक नव्हे तर दोन विश्वचषक मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर गेल्यावर गंभीर वेगळ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला होता, खरं तर त्याच्यावर दिल्ली संघाचे प्रशिक्षक केपी भास्कर यांच्यासमवेत अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप होता.
दिल्ली संघासाठी २०१६-१७ चा हंगाम अत्यंत खराब होता, केपी भास्कर यांच्या नेतृत्वाखालील संघ काही चांगली कामगिरी करू शकला नाही आणि संघाचा युवा फलंदाज उन्मुक्त चंद याला संघातून बाहेर करण्यात आले, तर नितीश राणा याला घराचा रास्ता दाखवला.
त्यानंतर गंभीर आणि भास्कर यांच्यात मतभेद झाल्याचे वृत्त समोर आले. यावर गंभीर म्हणाला,
“संघातील युवा खेळाडूंसाठी उभे राहणे जर गुन्हा असेल, तर मी कोणत्याही शिक्षेसाठी तयार आहे.” पण या व्यक्तीला (के.पी. भास्कर) नितीश राणा आणि उन्मुक्त चंद या तरूण खेळाडूंच्या करियरशी खेळू देणार नाही.
५. शाहिद आफ्रिदी आणि वकार युनूस
जेव्हा पाकिस्तान क्रिकेटचे दोन दिग्गज खेळाडू प्रशिक्षक आणि कर्णधार म्हणून एकत्र काम करण्यासाठी पुढे आले, आणि तेव्हा अशी काही घटना घडेल याचा पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापनाने विचारही केला नव्हता.
२०११ मध्ये जेव्हा पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजच्या दौर्यावर होता, तेव्हा आफ्रिदी (Shahid Afridi) आणि वकार (Waqar Younis) यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या येत होत्या. हा वाद इतका मोठा झाला की आफ्रिदीला कर्णधारपद गमवावे लागले आणि त्याने सेवानिवृत्ती जाहीर केली.
यानंतर, जेव्हा वकार २०१६ मध्ये पुन्हा संघाचे प्रशिक्षक झाले, त्यावेळी त्यांनी आफ्रिदीला लक्ष्य केले आणि त्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. ही गोष्ट आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकातील आहे. तेव्हा वकारने असा आरोप केला होता की, आफ्रिदी संघाच्या सरावाला आणि बैठकांना उपस्थित राहत नाही.
यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वकार युनूस यांना हटवून दक्षिण आफिकेच्या मिकी आर्थर (Mickey Arthur) यांना आपला नवीन प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आणि आफ्रिदीने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.