भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या ५ टी२० सामन्यांच्या मालिकेला ९ जूनपासून सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी सर्वचं खेळाडू विशेष सराव करताना दिसत आहेत. या मालिकेत भारतीय संघाचे स्टार खेळाडू असणाऱ्या विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमीसह कर्णधार रोहित शर्मा यांना विश्रांती दिली असल्याने अनेक खेळाडूंना आपली चमक दाखवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या मालिकेत भारताकडून खेळत असताना या ५ खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे.
१. हार्दिक पंड्या (Hardik Pandya)
हार्दिकसाठी यंदाची आयपीएल विशेष ठरली आहे. त्याने पहिल्यांदा कर्णधार पद भुषवताना गुजरातच्या संघाला विजेता बनवले आहे. शिवाय हार्दिकने वैयक्तिकपणे गोलंदाजी आणि फलंदाजीचे योगदान दिले. एकूणच त्यांनी संघाचे नेतृत्व आघाडीवर केले. दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिक पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धेत खेळत होता. अशा परिस्थितीत त्याच्यावर स्वत:ला सिद्ध करण्याचे दडपण होते. हार्दिकने अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध अष्टपैलू खेळी केली. ज्यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. आयपीएलमध्ये हार्दिकने एकूण ४८७ धावा केल्या असून गोलंदाजीत ८ विकेट्सही घेतल्या आहेत. अशा स्थितीत हार्दिकचा आत्मविश्वास यावेळी सातव्या गगनावर आहे. त्यामुळे आगामी मालिकेत त्याच्यावर विशेष लक्ष असणार आहे.
२. केएल राहुल (KL Rahul)
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएलमध्ये लीग स्तरावर चमकदार कामगिरी केली. राहुलने या आयपीएलमध्ये दोन शतके झळकावली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेतही तो कर्णधाराची भूमिका बजावणार आहे. त्याने आयपीएल २०२२मध्ये १३५पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने एकूण ६१६ धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धही राहुल चमकदार कामगिरी सुरू ठेवेल अशी आशा सर्वांनाच आहे.
३. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)
अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना चमकदार कामगिरी केली आहे. त्याने १८३च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. फिनिशर म्हणून आरसीबीने दिनेश कार्तिकला क्रीजवर आणले. कार्तिकने त्याच्या फ्रेंचायझीला निराश केले नाही. त्याला सुपर स्ट्रायकर ऑफ द सिझनचा पुरस्कार देण्यात आला. त्याने ५५च्या सरासरीने एकूण ३३० धावा केल्या. आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कार्तिकला तब्बल ३ वर्षानंतर टी२० संघात स्थान मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे आता कार्तिक या संधीचे सोनं करेल का हे पाहण महत्तवाचे ठरेल.
४. उमरान मलिक (Umran Malik)
सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आयपीएल २०२२मध्ये १४ सामन्यांत २२ विकेट घेतल्या. २२ वर्षीय युवा वेगवान गोलंदाज टी२० लीगमध्ये सातत्याने १५० किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करत होता. उमरानने गुजरात टायटन्सविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या होत्या. या वेगाच्या बादशाहकडून संघाला मोठ्या आशा आहेत. त्याची आयपीएल २०२२मध्ये उदयोन्मुख खेळाडू म्हणून निवड झाली. अशा स्थितीत उमरानची गोलंदाजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही चमकेल अशी आशा आहे.
५. अर्शदीप सिंग (Arshdeep Singh)
पंजाब किंग्जचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने आयपीएलमधील डेथ ओव्हर्समध्ये आपल्या गोलंदाजीने छाप पाडली आहे. २३ वर्षीय अर्शदीप धोकादायक यॉर्कर गोलंदाजी करण्यातही निपूण आहे. या आयपीएल हंगामातील १४ सामन्यांत त्याने १० विकेट घेतल्या. यादरम्यान अर्शदीपची इकॉनॉमी ७.७० होती. आयपीएलमधील अखेरच्या षटकांमधील उत्कृष्ट कामगिरी पाहता अर्शदीपची भारतीय संघामध्ये निवड करण्यात आली आहे. अर्शदीपला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही आपल्या दमदार कामगिरीची पुनरावृत्ती करायची आहे.
यांच्यासह भारतीय संघातील अन्य खेळाडूंनाही विशेष कामगिरी करत ही मालिका खिशात घालायची आहे. शिवाय ९ जून रोजी होणाऱ्या पहिल्या टी२० साम्यात सलग १३ टी२० सामने जिंकत भारताला जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याची संधीही उपलब्ध आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिका- भारत मालिकेसाठी दोन्ही संघ ‘या’ दिवशी होणार मैदानात दाखल; बीसीसीआयने दिली माहिती
बिहारमधला सलूनवाला पंड्याचा जबरा फॅन; जिंकण्याच्या खुशीत स्वत:चं आणि दुकानाचं घातलं बारसं
क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी बेईमानी करणारा हॅन्सी क्रोनिए, वाचा काय केला होता राडा?