मागील अनेक वर्षांपासून क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांचा दबदबा राहिला आहे. भारतात अनेक दिग्गज फलंदाज तयार झाले आहेत. अगदी, सुनील गावसकर, दिलिप वेंगसरकर पासून सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, रोहित शर्मापर्यंत अनेक चांगले फलंदाज भारतीय संघात खेळले आहेत.
यातील काही डावखुरे फलंदाजही होते. ज्यांनी अनेक मोठे विक्रम केले. आज (13 ऑगस्ट) जागतिक डावखुरे दिवस साजरा केला जात आहे. अशात वनडेमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या डावकरी फलंदाजांबद्दल या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
भारताकडून वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे डावकरी फलंदाज (best left handed batsmen to play for India) –
5. गौतम गंभीर – भारताचा वनडेमधील एक महत्त्वाचा फलंदाज म्हणजे गौतम गंभीर. वनडेमध्ये डावकरी फलंदाज असलेल्या गंभीरने बऱ्याचदा सलामीला तर कधी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. तसेच जेव्हा गंभीर सलामीला फलंदाजी करायचा तेव्हा बऱ्याचदा त्याला साथ द्यायला सेहवाग होता.
सेहवाग हा उजव्या हाताचा फलंंदाज. त्यामुळे उजव्या आणि डाव्या हाताचे फलंदाज असल्याने उत्तम समतोल साधला जात होता. गंभीरने 2011 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. तो नंतर 2013 मध्ये भारताकडून शेवटचा वनडे सामना खेळला. गंभीरने वनडेमध्ये 147 सामन्यात 39.68 च्या सरासरीने 5238 धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या 11 शतकांचा आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे.
4. सुरेश रैना – भारताचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज सुरेश रैना हा देखील डावकरी. तो डावकरी असल्याने नंतर मधल्या फळीतील उजव्या हाताच्या फलंदाजाबरोबर फलंदाजी करताना भारताला त्याचा फायदा व्हायचा.
रैना अनेकदा मधल्या फळीत खेळताना धावफलक हलता ठेवायचा. तसेच शेवटच्या काही षटकात आक्रमक खेळण्याचीही क्षमता त्याच्याकडे आहे. 205 ते 2015 दरम्यान तो भारताच्या संघातील नियमित सदस्य होता. पण त्यानंतर तो भारतीय संघात ये-जा करत राहिला. त्याने वनडेमध्ये भारताकडून 226 सामन्यात 35.31 च्या सरासरीने 5615 धावा केल्या. यामध्ये त्याच्या 5 शतकांचा आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे.
3. शिखर धवन – मागच्या काही वर्षांपूर्वी शिखर धवन भारतीय संघाचा नियमित सलामीवीर फलंदाज होता. पण सध्या त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे. धनव देखील एक उत्तम डावखुरा फलंदाज अशून त्याचा सलामीवीर साथीदार रोहित शर्मा उजव्या हाताचा फलंदाज आहे. या दोघांची भागीदारी नेहमीच महत्वपूर्ण ठरली आहे. त्या दोघांनी मिळून अनेक मोठ्या सलामी भागीदाऱ्या करत मोठे विक्रम केले आहेत.
धवनने 2019 च्या विश्वचषकातही केवळ 2 सामने खेळताना त्याने 1 शतक केले होते. धवनने आत्तापर्यंत भारताकडून 167 वनडे सामने खेळताना 44.11 च्या सरासरीने 6793 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे भारताकडून वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 डावकरी फलंदाजामध्ये शिखरची सर्वाधिक सरासरी आहे. त्याने आत्तापर्यंत वनडेत 17 शतके आणि 39 अर्धशतके केली आहेत.
2. युवराज सिंग – भारताचा दिग्गज डावकरी अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये युवराज सिंगची गणना होते. तो भारताकडून मधल्या फळीत फलंदाजी करायचा. तसेच त्याने त्याच्या दमदार फलंदाजीने अनेकदा भारताला एकहाती सामनेही जिंकून दिले आहेत. त्याने अनेकदा मधल्या फळीत एमएस धोनीबरोबर महत्त्वाच्या भागीदाऱ्या केल्या आहेत.
2011 च्या वनडे विश्वचषकात तर तो मालिकावीर ठरला होता. त्याने 9 सामन्यात 362 धावा केल्या होत्या. युवराजने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने वनडेमध्ये भारताकडून 301 सामन्यात 36.47 च्या सरासरीने 8609 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 14 शतकांचा आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे.
1. सौरव गांगुली – भारताचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली हा भारताचा सर्वाधिक वनडे धावा करणारा डावकरी फलंदाज आहे. तसेच तो सर्वाधिक वनडे सामने खेळणाराही डावकरी भारतीय क्रिकेटपटू आहे.
गांगुलीने कर्णधार म्हणूनच नाही तर एक उत्तम फलंदाज म्हणूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावले. त्याने फिरकी गोलंदाजांविरुद्ध मारलेले षटकार आणि वेगवान गोलंदाजाविरुद्ध कव्हर ड्राइव्ह पहाण्यासारखे असायचे. गांगुलीने अनेकदा वनडेमध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांच्याबरोबर मोठ्या भागीदारी केल्या आहेत. त्याने भारताकडून 308 वनडे सामने खेळताना 40.95 च्या सरासरीने 11221 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 22 शतकांचा आणि 71 अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या –
WIvIND: कोण ठरणार टी20 मालिकेचा विजेता? फ्लोरिडात आज रंगणार ‘ग्रॅंड फिनाले’
आशिया चषकापूर्वी रोहित सहकुटुंब बालाजी चरणी, कर्णधाराला पाहण्यासाठी चाहत्यांची तुंबळ गर्दी